केरळच्या किनारपट्टीवरील मलबारमध्ये सातव्या शतकाच्या अखेरीस अरब मुस्लीम व्यापाऱ्यांमार्फत इस्लामचा भारतीय प्रदेशात प्रवेश झाला. त्या काळात क्रांगानूर या मलबारच्या परगाण्यावर चेरमाण पेरुमल याचे राज्य होते. काही अरब फकीर चेरमाणकडे आले. त्यांनी इस्लाम धर्माची बरीच माहिती राजास सांगितल्यावर इस्लामबद्दल त्याचे कुतूहल वाढले. चेरमाणने कोणालाही न सांगता इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आपला बेत नक्की केला. इस्लाम स्वीकारल्यावर सर्व राज्यप्रदेशाचा त्याग करून मक्केला जायचे त्याने ठरवले. सर्व नातेवाइकांत राज्याची वाटणी करून एका बंदराजवळील तीस मलांचा प्रदेश स्वत:च्या ताब्यात ठेवला. लवकरच चेरमाणने गुप्त रीतीने इस्लाम कबूल करून आपले उरलेले राज्य मानविक्रम या कर्तबगार तरुणास दिले.

आपली स्वत:ची राजवस्त्रे, तलवार, मुकुट चेरमाणने मानविक्रमला देऊन त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्याला ‘झामोरीन’ म्हणजे सामुद्री राजा म्हणून घोषित केले. त्याच्या प्रदेशातल्या बंदरातूनच चेरमाणने मक्केकडे गुप्तपणे प्रयाण केले. मक्केकडे जाताना चेरमाण अरेबियातील ‘शहर’ गावात प्रथम काही दिवस राहिला. तिथे चेरमाणची ओळख मलिक इब्नदिनार या माणसाशी झाली. त्या दोघांचे फारच चांगले संबंध प्रस्थापित झाले.काही वर्षे शहर आणि मक्केत व्यतीत केल्यावर मुस्लीम झालेल्या चेरमाण पेरुमलने केरळात इस्लाम धर्मप्रचार मोठय़ा प्रमाणात करायचं ठरवलं. इस्लाम धर्मप्रसाराचा ध्यास घेऊन जहाजाने केरळात येण्यासाठी निघालेला चेरमाण वाटेतच आजारी पडून मरण पावला. चेरमाणने मृत्युपूर्वी त्याचा मित्र मलिक इब्नदिनार यास मलबारमध्ये जाऊन तिथे इस्लाम धर्म प्रचार करून मशिदी बांधण्यास सांगितले. तिथल्या राजा झामोरीनला देण्यासाठी पत्र देऊन राज्यात मशिदी बांधून काही उत्पन्न त्यासाठी तोडून देण्याची विनंती केली. अरबस्तानातील शहर या गावात चेरमाणची कबर आहे. चेरमाण पेरुमलच्या स्मरणार्थ राजा झामोरीनने शहर वसवून त्याचे नाव ‘कोळिकोड’ ठेवले. तेच आजचे कालिकत. मलिक इब्नदिनारने ६२९ साली बांधलेली चेरमाण जुम्मा मशीद ही केरळातली पहिली मशीद.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com