डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मूल  लहान असतं तोपर्यंत घरातलं कोणी ना कोणीतरी त्याच्या बरोबर असतं. जसजसं तिसऱ्या – चौथ्या वर्षी आईबाबापासून सुटं होऊन शाळेत जायला लागतं, इतर मुलामुलींशी खेळायला लागतं. कधी कधी खेळताना मजा येते, हसणं- खिदळणं होतं. खूप छान मत्री होते, खेळात मस्त वेळ जातो. तशीच कधी कधी भांडणंही होतात.

अशी भांडणं होईपर्यंत आपल्या मनाचे आणि साऱ्या घराचे राजे असण्याची सवय असलेल्या मुलांना धक्का बसतो. मनाविरुद्ध घडण्याचा नवा प्रकार सुरू होतो. पण हेदेखील एक प्रकारचं शिकणं असतं. सामाजीकरण असतं. प्रत्येक मूल स्व-भावानुसार या गोष्टींना प्रतिसाद देतं. काही जण सहज विसरून खेळतात. काही जण मनात ठेवतात.

खेळ म्हटल्यावर मतभेद हे होणारच. मित्रमत्रिणींमध्ये वेगवेगळे गट पडायला लागतात. या गटांमध्ये ‘तू आमच्या गटात येऊ नकोस’ असं कधीतरी कोणीतरी सुनावतं आणि मुलांच्या ‘स्व’ला धक्का बसतो. मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. पण ती अनेकदा काही क्षणांपुरतीच असते. कारण ज्याने भांडण काढलं आहे तो किंवा तीच पुन्हा याला खेळायला घेतात. किंवा कोणीतरी मित्र किंवा मत्रीण जवळ येते आणि हात धरून खेळायला घेऊन जाते. असे प्रसंग लक्षात राहतीलच असं नाही. कदाचित विसरून जातील. त्या वेळेला भावनांची तीव्रता कशी होती, यावर अवलंबून आहे.

लहान असताना जेव्हा खेळामध्ये भांडण होतात, त्या वेळेला खूप वाईट वाटतं. पण तरीही मुलांचा मेंदू एक उपाय शोधून काढतोच. प्रॉब्लेम सॉिल्व्हग हे फार लहान वयापासून आत्मसात केलेलं असतं. ज्याला बहुआयामी बुद्धिमत्तांच्या भाषेत तार्किक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. ती बुद्धिमत्ता लवकरच्या वयात मुलं वापरायला शिकतात. आत्ताचा उपाय म्हणजे धावत धावत आई-बाबांकडे जायचं आणि भोकाड पसरून तक्रार करायची हे किती सोपं असतं. या तक्रारींचं निवारण करे करेपर्यंत पुन्हा एकमेकांशी खेळ सुरूही होतो. लिओ टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या एका गोष्टीत अकुल्या आणि मलाशा या दोघी मत्रिणी खेळता खेळता भांडतात. भांडण दोघींच्या आईपर्यंत जातं. या दोघी आया भांडत बसतात आणि तिकडे लहानग्या दोघी खेळायलाही लागतात. मतभेद संपणं हे महत्त्वाचं : मुलांचे असोत वा मोठय़ांचे! हे लहानांसाठी चांगलं आहे, तसं मोठय़ांसाठीही!