03 December 2020

News Flash

कुतूहल : पर्यावरणलढय़ातील बालयोद्धय़ा..

१६ मुलांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाच देशांविरोधात याचिका दाखल केली होती.

जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, प्रदूषण, कचरा, प्लास्टिक यांसारख्या समस्यांनी मोठय़ांना ग्रासले असतानाच, लहानग्यांनाही आता त्यांच्या भविष्याविषयी काळजी वाटू लागली आहे. स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गची प्रेरणा घेऊन मणिपूरची लिसीप्रिया कंगुजम या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने संसदबाहेर बसून पंतप्रधान आणि देशातल्या खासदारांना हवामान कायदा आणण्यासाठी केलेल्या आवाहनाने देशाचे लक्ष वेधून घेतले. मंगोलिया येथे २०१८ साली झालेल्या ‘एशिया मिनिस्टेरियल कॉन्फरन्स फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन’मध्ये उपस्थित राहण्याची संधी तिला मिळाली. गतवर्षी स्पेनमध्ये झालेल्या ‘सीओपी२५’ या हवामान परिषदेमध्येही ती उपस्थित होती. साठहून अधिक देशांमधील युवा नेते तिच्या समर्थनार्थ न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासमोर जमले होते, तर तिच्या लढय़ाला ऐंशीपेक्षा अधिक देशांतून ऑनलाइन पाठिंबा मिळाला आहे.

जन्नत तारिक अहमद पतलू ही सात वर्षांची काश्मिरी मुलगी. खेळण्याबागडण्याच्या वयात ती काश्मीरच्या दल सरोवराची साफसफाई करण्यात रमली आहे. पर्यटकांनी केलेल्या कचऱ्यामुळे या सरोवराचे पाणी मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित झाले. अनावश्यक तण वाढल्याने सरोवराचा गळाच घोटला गेला. तिने पुढाकार घेत वडिलांसह सरोवराची साफसफाई सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून दर रविवारी ती आपल्या वडिलांबरोबर तलावातला कचरा गोळा करते; नंतर त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.

हवामान बदल रोखण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याबद्दल वेगवेगळ्या देशांतील १६ मुलांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाच देशांविरोधात याचिका दाखल केली होती. हरिद्वारची रिद्धिमा पांडे ही १२ वर्षांची विद्यार्थिनी या त्यांपैकी एक होती! २०१३ साली केदारनाथमध्ये आलेला प्रलय हवामान बदलाचा इशारा असल्याचे ओळखून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तिने संयुक्त राष्ट्रांत आवाज उठवला. दप्तरांऐवजी ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन शाळेत जाणारी पुढची पिढी बघायची नसेल, तर प्रदूषणाबाबत गंभीरपणे विचार करून संबंधितांना कठोर शासन करण्यासाठी कायदे करण्याची गरज असल्याचे मत तिने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात ठामपणे मांडले. प्रत्येकाने पर्यावरणासाठी वैयक्तिक पातळीवर लढले पाहिजे असा तिचा आग्रह आहे. एकूणच ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देशवासीयांना देत तिचे पर्यावरण संवर्धनाचे काम सुरू आहे.

पर्यावरणासाठी लढणाऱ्या या बालयोद्धय़ांकडून मोठय़ांनीही काही शिकावे, अशी अपेक्षा १४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘बालदिना’निमित्त करण्यास हरकत नसावी!

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:19 am

Web Title: child fighters for environmental warfare kids protest for climate law zws 70
Next Stories
1 मनोवेध : शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान
2 मनोवेध : हृदयरोग मुक्तीसाठी..
3 कुतूहल : घनकचरा व्यवस्थापन कायदा
Just Now!
X