चित्र म्हणजे मुलांचं मन. बालमानसशास्त्रात मुलांच्या चित्रातून त्यांच्या भावना वाचायचा प्रयत्न केला जातो. काही मुलांच्या बाबतीत चित्रकलेचा ‘थेरपी’ म्हणूनही वापर केला जातो. मुलांना चित्रं काढायला दिली जातात, त्या चित्रांच्या विश्लेषणातून त्यांचं मन वाचायचा प्रयत्न केला जातो.

– चित्रात रंग खरडले असले म्हणजे मूड चांगला नाही, म्हणजे कोणाचा तरी राग आला आहे?

– एकच रंग वापरणं, चित्रात फारसे विषय नसणं, एकच फूल, एकच झाड, एकच मूल.. कदाचित मुलाच्या मनातला एकटेपणा व्यक्त होतोय का?

– चित्रात बारकावे असणं, म्हणजे बुद्धीची तंत्रशुद्धता दिसतेय का?

– कागदाच्या मधोमध, समतोल राखून काढलेलं चित्र मनाचाही समतोल दाखवतोय का?

अशा अनेक अंदाजांमधून मूल समजून घेता येतं. हा झाला चित्रातून मनाचा वेध घेण्याचा भाग.

मात्र, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, चित्रं ही कमालीची वैयक्तिक असतात. एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा एखाद्या ठरलेल्या प्रसंगावर चित्र काढायला सांगितलं तरी ते वेगवेगळं उतरतं. याचं कारण ज्याला जे भावलेलं, आवडलेलं किंवा जो प्रसंग / दृश्य मनावर कोरलेलं असेल, तेच चित्रातून उतरतं. म्हणूनच प्रत्येकानं काढलेलं चित्र हे वेगळंच असतं, असायलाही हवं. आणि ते प्रत्येक चित्र सुंदरच असेल, अशी आपली दृष्टी हवी!

व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, फ्री हॅन्ड, स्थिरचित्र असे वेगवेगळे विषय त्यात येतात. शिक्षकांनी दिलेल्या विषयावर चित्रं काढली जातात; इथूनच पुढं मग कोणाचं चित्र चांगलं, कोणाचं वाईट, अशा गोष्टी सुरू होतात. चित्रांवर लाल शाईच्या पेनानं गुण किंवा शेरे दिले जातात. ज्यांना चांगले गुण मिळत जातात त्यांची चित्रकला फुलते. पण कमी गुण मिळवणाऱ्यांची किंवा चांगले शेरे न मिळणाऱ्यांची चित्रकला मागं पडत जाऊन हळूहळू थांबतेच.

कमी मिळणाऱ्या गुणांमधून, आपली चित्रकला चांगली नाही यावर शिक्कामोर्तब होत जातं. स्वत:च्या आनंदासाठी, वेळ घालवण्यासाठी, छंद म्हणून चित्रकला जोपासली जात नाही. मुलांनी छान चित्रं काढावीत यासाठी त्यांच्यावर सुरुवातीच्या काळात तरी कोणतं बंधन ठेवू नये. चित्र काढणं, ती सुरेख रंगवणं ही एक कला असली, तरी निखळ आनंदासाठी चित्र काढणं हे आयुष्यभर चालू राहायला हरकत नाही!

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com