प्राणिमात्रांमध्ये अंडय़ांचे अथवा पिल्लाचे पालक म्हणून केलेले संगोपन पिल्लांची जगण्याची शक्यता वाढविते. प्राण्यांमध्ये संगोपनाच्या विविध पद्धती दिसून येतात. या विविधतेमध्ये वातावरणाशी जुळवून घेत उत्क्रांत होणाऱ्या संगोपनाच्या पद्धती दिसतात; कारण त्याचा थेट संबंध जीवांच्या ‘जगण्या’शी असतो. यात संगोपनाचा पिल्लांना होणारा फायदा आणि त्यासाठी पालकांना मोजावी लागणारी किंमत (पालकांची खर्च होणारी ऊर्जा, जगण्याची शक्यता, तसेच प्रजनन हंगामातील अंतर) याचा विचारदेखील निश्चित होत असावा. संगोपनाला परहितनिष्ठा असेही म्हणता येऊ शकते; कारण त्यात केवळ पिल्लांची जगण्याची संधी (तंदुरुस्ती) वाढविणे हा हेतू असतो. संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालक मिळून अथवा केवळ नर वा केवळ मादी उचलताना दिसतात.

७७ टक्के माशांमध्ये पिल्लांचे संगोपन केले जात नाही. उत्क्रांतीच्या नियमानुसार, अंडय़ांची संख्या आणि त्यांचे संगोपन यांचा एकमेकांशी व्यस्त संबंध दिसतो. माशांमध्ये अंडी घालण्यासाठी योग्य ठिकाण निवडून, घरटे बांधून अथवा अंडी स्वत:च्या शरीरावर ठेवून त्यांचे योग्य काळापर्यंत रक्षण करणे या गोष्टी संगोपनात प्रामुख्याने दिसतात. गोडय़ा पाण्यातील माशांमध्ये संगोपन जास्त प्रमाणात दिसते. बहुधा नर पाण्याच्या तळाशी खड्डा करून, दगडाखाली अथवा चिकट आवरणात अंडय़ांसाठी घरटे तयार करतात. ही घरे बहुधा गोल हौदासारखी असतात. दक्षिण अमेरिकी लंगफिश बोगद्यासारखे घर बनवितो. मादी एखाद्या शिंपल्यामध्ये, पाण्यातील वनस्पतीच्या पानावर अंडी घालतात.

‘साल्मन’ मादी घरटे बनविते, ‘स्टिकलबॅक’ नर पाण्यातील वनस्पतींच्या साहाय्याने घर करतो, तर ‘सियामिझबेट्टा’ नर बुडबुडे काढून ते एकत्र ठेवून या तरंगणाऱ्या बुडबुडय़ांचा घर म्हणून उपयोग करतो. ‘तिलापिया’ माशामध्ये नर आणि मादी अंडय़ांतून पिल्ले बाहेर येईपर्यंत अंडय़ांना तोंडात ठेवतात; या काळात ते अन्नही घेत नाहीत. पाण्याच्या तळाशी राहणाऱ्या ‘आसप्रेडो’ची मादी सगळ्या अंडय़ांची वळकटी करून पोटाच्या खालील मऊसर बाजूस चिकटवते, तर ‘पाइप फिश’ आणि पाण्यामध्ये उभ्या ‘समुद्र घोडय़ां’मध्ये नर पिल्लांना पोटावरील पिशवीत सांभाळतो आणि त्यांना जन्म देतो. या काळात काही नर प्रादेशिक (टेरिटोरिअल) होतात आणि त्यांच्या ठरलेल्या आवारात कोणालाही येऊ देत नाहीत.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org