श्रुती पानसे contact@shrutipanse.com

बाळाच्या आयुष्यातली पहिली तीन वर्ष अतिशय महत्त्वाची असतात. या वयात व्यक्तिमत्त्वाचा पाया तयार होत असतो.या वयात मुलांना सुरक्षिततेचं आणि प्रेमाचं वातावरण मिळायला हवं. मात्र कोणत्याही कारणामुळे लहान वयात योग्य वातावरण मिळालं नाही, मुलांची हेळसांड झाली, तर  मानसिक आणि बौद्धिक हानी होते. त्यांच्यात काही समस्या निर्माण होतात. आत्मविश्वास निर्माण होत नाही. सतत मूड्स बदलतात. आकलनावर परिणाम होतो. वर्तनावर परिणाम होतो. आक्रमक पालकांमुळे मुलांना असुरक्षित वाटतं.

यासाठी खालील तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत :

– आपल्या मुला-मुलींबद्दल मनात अपार प्रेम तर असतंच. त्यांच्याकडे लक्ष हवं. असुरक्षित वाटल्यामुळे त्यांच्यात स्ट्रेस हार्मोन्स निर्माण होतात. अस्वस्थ झोप, जेवण अचानक नकोसं होणं, घाबरंघुबरं वाटणं असं होऊ शकतं. (प्रत्येक वेळेला अशी लक्षणं दिसली की ती ताणामुळेच असतील असं नाही. इतरही कारणं असू शकतील.) जर सतत अशीच परिस्थिती राहिली तर थेट न्युरॉन्सवर परिणाम होतात.

– ताण निर्माण करणाऱ्या यंत्रणेमुळे अमिग्डाला हा छोटासा अवयव क्रियाशील होतो. जेव्हा शरीराला कसलीही धोक्याची जाणीव होते, तेव्हा हा अमिग्डाला मेंदूला तशी सूचना देतो.

– या वयातली मुलं बऱ्याच गोष्टींना घाबरतात. आपल्याला त्या क्षुल्लक वाटतात. पण त्यांना त्या भरपूर भीतीदायक वाटत असतात. एखाद्या दाढीवाल्या माणसाकडे बघून मुलं घाबरतात. अंधाराला घाबरतात. कुत्र्या-मांजराला घाबरतात. मऊ केसाळ टेडी बेअर्सनाही काही जण बघूनसुद्धा लांब पळतात, हात लावणं तर दूरच! काहींना त्यात धोका वाटतो, काहींना वाटत नाही. काही घरांमध्ये माणसं जोरजोरात भांडतात. अशा वेळी तिथे असलेल्या छोटय़ा मुलांना कमालीचं असुरक्षित वाटत असतं. काय चाललंय ते कळत नसतं. धोका मात्र जाणवत असतो. आपल्या वागण्याबोलण्याचा, हसण्या-भांडण्याचा लहान मुलांवर परिणाम होणार आहे हे जाणून आपापसात व्यवहार करायला हवा. अनाथाश्रमांमध्ये, जिथे एकाच वयाची अनेक मुलं आहेत, तिथे ही काळजी दुप्पट घ्यायला हवी.