डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आपलं मूल हसरं असावं, खेळकर असावं असं पालकांना वाटतं. मुलं तशीच, नौसर्गिकपणे वागत असतात, तेव्हा त्यांच्या या नैसर्गिकतेवर बंधनं घातली जातात. यातून त्यांच्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक जण त्यांच्या छोटय़ांचा प्रत्येक क्षण अक्षरश: वापरतात. त्यांच्या प्रत्येक क्षणाचा वापर केला जातो. सतत विविध क्लासेसमध्ये अडकवून ठेवतात. यामुळे हसऱ्या खेळकर मुलावर खूप ओझं येतं.

काही घरांमध्ये पाश्चात्त्य देशातल्या पद्धतीप्रमाणे मुलांना तान्हं असल्यापासून वेगळं झोपवतात. वेगळं ठेवतात. ते रडलं तरी त्याला लगेच जवळ घेत नाहीत. चार पाच वर्षांच्या मुलाला रात्री आईबाबांच्या जवळ झोपायचं असेल तर त्याला तसं करू देत नाहीत. अशा ‘चुकीच्या’(?) वागण्याला लगेच एक नाव दिलं जातं – ‘सेपरेशन अँग्झायटी’. मूल कायम, मोठं झाल्यावरही आईबाबांना चिकटून झोपण्याचा आग्रह करणार आहे का? ते लहान आहे म्हणूनच असं वागतंय ना? मूल बाहेर जाऊन चिखलात खेळतं, असं कसं? माझ्या मुलात काही प्रॉब्लेम तर नाही? चित्र काढत नाही, अभ्यास करत नाही, बुद्धिबळ खेळत नाही त्याऐवजी चिखलात खेळतं, हे विचित्र नाही का? असं पालक विचारतात.

मूल खूप खेळतं, दमतच नाही, तेव्हा काय त्याला खरोखर ‘अटेन्शन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसॉर्डर’ (एडीएचडी) तर झालेला नाही ना, असल्या शंका-कुशंका सतत पालकांच्या मनात येत असतात.

आपलं मूल हे अगदी ‘सर्वसामान्य’ आहे, यावर विश्वास ठेवायला हवा. एखाद्या रोगाची लक्षणं वाचत असताना, ही सर्व लक्षणं आपल्यातही दिसतात, असं खूप जणांना वाटतं. नुसत्या शंकेनेच लोक गळाठून जातात. असंच मुलांच्याही बाबतीत होत नाही ना? आपलंच मूल विचित्र आहे, असं उगाच वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही.

एक लक्षात घ्यायला हवं की, मूल लहान आहे. या वयात मुलं असंच वागतात. मोठं झाल्यावर असंच वागत नाहीत. मुलांना नैसर्गिक वागू द्यायला हवं. थोडा खोडकरपणा करायला काहीच हरकत नाही, हे स्वीकारायला हवं. तसं करू दिलं नाही तर समस्याग्रस्त मुलांची संख्या भावी काळात नक्कीच वाढेल. त्यांना खरोखरच मानसोपचारांची गरज भासेल. त्यापेक्षा आत्ताच काळजी घ्यायला हवी.