श्रुती पानसे contact@shrutipanse.com

लहानपणी छोटय़ा-मोठय़ा तक्रारींसाठी मुलं आईबाबांकडे धाव घेतात. पण मोठं झाल्यावर असं करता येत नाही. मुलांना आपोआप ही समज येते.

मुलांच्या मनात असे अनेक प्रश्न उगाचच घर करून बसतात. बघायला गेलं तर काही फार गंभीर प्रश्न नसतात हे! पण ते आपल्या बाजूने. त्यांच्या बाजूने विचार केला तर या प्रश्नांनी त्यांचं पूर्ण विश्व व्यापून टाकलेलं असतं. काहींना रंगावरून, कमी किंवा जास्त उंचीवरून, कमी किंवा जास्त मार्क मिळतात म्हणून, काहींना भाषेवरून, राहण्याच्या परिस्थितीवरून, असे अनेक प्रकारे आड येतात. यामुळे त्यांची मत्री होत नाही. आपल्याला मत्री करता येत नाही, हे जाणवल्यावर नक्की काय करावं हे समजत नाही.

कधी बारीकशा मतभेदांवरून गटातून एकटं पाडलं जातं. आपल्याला गटात एकटं पाडलं याचा अर्थ आपलंच काहीतरी चूक आहे किंवा आपल्यात काहीतरी कमतरता आहेत असं मुलांना वाटायला लागतं. अगतिक वाटायला लागतं. आपल्याला कोणीतरी टाळतं आहे याचं वाईट वाटतं. मी या गटांमध्ये शिरकाव कसा करून घेऊ असे अनेक प्रश्न अशा वयातल्या मुलांच्या समोर पडलेले असतात. अशा कारणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता त्यांच्या इगोला धक्का पोचवते. सहजासहजी विसरत नाहीत. कारण या वयात िलबिक सिस्टीम म्हणजेच भावनांच्या क्षेत्राचा जोर जास्त असतो. गंमत म्हणजे आपल्या मुलामुलींच्या जगात हे काय चालू आहे, हे आईबाबांना माहीतही नसतं. माहीत असलं तरी त्याची तीव्रता लक्षात येत नाही. आईबाबा हे प्रश्न सोडवू शकत नाहीत. सोडवायला जाऊही नयेत. पण माहीत असलं तर किमान एकमेकांशी बोलता येतं.

वाढत्या वयातल्या मुलामुलींना आपल्याला काही समस्या आहेत, हे सांगायला भीड वाटते. किशोरावस्थेतल्या मुलांना इतर कोणाशीही स्वत:च्या समस्येवर बोलायला संकोच वाटतो. या वागण्यामागचं कारण एकच. ‘जगाला कशाला दाखवू मला मनातून काय वाटतंय?’ हेच बऱ्याचदा असतं. अतीव विश्वासाची जागा असेल तरच मुलं मन मोकळं करतात. अशा वेळी त्यांना पूर्णाशाने समजून घ्यायची गरज असते.