डॉ. यश वेलणकर  yashwel@gmail.com

सिग्मंड फ्रॉइड यांनी असे मत मांडले होते की, सुप्त मनात ‘इड’ (म्हणजे माणसामध्ये असलेल्या कामभावनाविषयक मूळ प्रेरणा) आणि ‘सुपर इगो’ (म्हणजे सामाजिक मान्यता) यांचा संघर्ष चालू असतो. ‘इगो’ हा त्यांच्यातील मध्यस्थ; तो हा संघर्ष मर्यादेत ठेवू शकला नाही, तर मानसिक विकृती निर्माण होतात. एरिक बर्न यांनी ‘इड’ऐवजी ‘चाइल्ड इगो’ (म्हणजे बालक) हा शब्द वापरला आणि केवळ कामभावनांना महत्त्व न देता ‘मजा करण्याची वृत्ती’ असा त्याचा अर्थ लावला. ‘सुपर इगो’ऐवजी ‘पॅरेन्ट’ (म्हणजे पालक) आणि ‘इगो’साठी ‘अ‍ॅडल्ट’ (म्हणजे प्रौढ) हा शब्द वापरला.

प्रत्येक व्यक्तीत या तीन वृत्ती असतात; पण त्यातील एखादी अधिक प्रभावी असू शकते. एखाद्या माणसातील बालक प्रभावी असेल, तर तो कोणतीच जबाबदारी घेत नाही, सतत मजा करण्याची त्याची प्रवृत्ती असते. पालक अधिक प्रभावी असेल, तर तो माणूस दुसऱ्याची काळजी वाटून सतत उपदेश करणारा असू शकतो. आणि केवळ प्रौढ वृत्ती प्रभावी असेल, तर ती व्यक्ती भावनाशून्य संगणकासारखी असते!

हे टाळायचे असेल, तर प्रौढ वृत्तीने बालक आणि पालक वृत्तींचे ऐकून घेऊन योग्य निर्णय घ्यायला हवा. समजा, मी रस्त्याने जात असताना मला आइस्क्रीमचे दुकान दिसले आणि आइस्क्रीम खाऊ या असा विचार मनात आला, की ते आपल्यातील बालक आहे हे समजून घेऊन मी दुकानात जातो. तेथे खिशातील पैसे आणि किंमत यांचा विचार करून एक आइस्क्रीम निवडतो, तो निर्णय प्रौढ वृत्तीचा असतो. एक खाऊन झाल्यानंतर माझ्यातील बालक म्हणते आणखी एक.. दिल मांगे मोअर! त्याच वेळी माझ्यातील पालक सांगतो- जास्त आइस्क्रीम खाल्ले की सर्दी होते, आणखी नको! या वेळी माझ्यातील प्रौढ वृत्ती विकसित असेल, तर तो योग्य निर्णय घेऊ शकेल.

आपल्याला निरोगी आणि आनंदी राहायचे असेल, तर आपल्यातील बालकाचे ऐकून थोडीशी मजा करायला हवी; पालक होऊन जबाबदारी घ्यायला हवी; पण काय करायचे आणि किती करायचे, याचा निर्णय प्रौढ म्हणजेच अ‍ॅडल्ट इगोने घ्यायला हवा!