News Flash

मेंदूशी मैत्री : रोजच असावा बालदिन!

एक दिवस बालदिन साजरा करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो विसरण्यापेक्षा, मुलांना कायमस्वरूपी समजून घेण्यातून तो साजरा होईल.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

‘बालदिन’ साजरा करणं म्हणजे मुलांना महागडय़ा वस्तू देणं, त्यांच्यासोबत छान फोटो घेऊन प्रसारित करणं, पार्टी करणं- एवढंच आहे का? हा तर ‘इव्हेन्ट’ झाला. ते करावेतच. त्यामुळे मजा येते. आपण मुलांसाठी बालदिन साजरा केल्याचा आनंद होतो. पण एक दिवस बालदिन साजरा करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो विसरण्यापेक्षा, मुलांना कायमस्वरूपी समजून घेण्यातून तो साजरा होईल.

‘मुलांना समजून घेणं’ याचा खरा अर्थ काय? त्यांचं सर्व काही ऐकणं, त्यांचे लाड करणं, त्यांना हवं ते पुरवणं हा आहे का? असं झालं तर मुलं जबाबदार होतील का? की लाडावली जाऊन बिघडतील?

तरीही मुलांना समजून घ्यायचं असेल तर?

लहान वयात मूल कुतूहलामुळे अनेक वस्तू हाताळतं. किती तरी प्रश्न विचारतं. या प्रश्नांना उत्तरं द्यायला जवळ कोणी तरी मोठं असेल, तर ती मुलांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणायला हवी. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. या काळात जर मुलांशी भरपूर बोललं नाही, तर त्यांचा भाषाविकास अपुरा राहतो. पण आज आई-बाबांना आपल्या मुलांशी गप्पा मारायला वेळच नाही. ‘गप्पा मारणं’ म्हणजे अभ्यासाची चौकशी करणं किंवा उपदेश करणं हे नाही!

गप्पा मारणं म्हणजे- आज काय काय झालं, हे एकमेकांना सहजपणे सांगणं. आपला दिवस कसा गेला, हेही मुलांशी बोलावं, त्यातून गप्पा होतात. आज हा संवाद दुर्मीळ झाला आहे.सर्व स्तरांतल्या मुलांचे स्वत:चे काही भावनिक-मानसिक प्रश्न असतात; त्यात वाढ होते आहे. लहान मुलांमध्येही मानसिक समस्या निर्माण होताहेत. मानसिक समस्यांचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. या समस्या निर्माण होण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. या सगळ्याला अनेकदा आई-वडील जबाबदार असतात. शाळा आणि कडक शिक्षक यामुळे समस्या वाढतात. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण आनंदी आहे का, हे तपासायला हवं. मुलांना ‘श्रीमंत’ आई-बाबा नको असतात; ‘आनंदी’ आई-बाबा हवे असतात. हे वातावरण निर्माण करता यावं.

केवळ आपलं मूलच नाही, समाजात अनेक वंचित मुलं आहेत, त्यांचाही विचार आणि संबंधित कृती म्हणजे बालदिन!

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 12:11 am

Web Title: childrens day brain friendship abn 97
Next Stories
1 कुतूहल : विश्वाचे प्रसरण
2 मेंदूशी मैत्री : मेंदूपूरक हक्क
3 कुतूहल : रेडिओ खगोलशास्त्राची सुरुवात
Just Now!
X