बरोबर ३६ वर्षांपूर्वी, २-३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून ‘मिथाइल आइसो-सायनेट’ या विषारी वायूच्या गळतीमुळे एका रात्रीत हजारो लोक प्राणास मुकले. दुर्घटनेत बळी पडलेले बहुतेक जण रोजंदारीवर जगणारे होते. त्यामुळे अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दुरवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. या आर्थिक दुरवस्थेतून पीडितांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना कंपनीकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, साध्याशा घरात राहणाऱ्या, कोणतेही शिक्षण न घेतलेल्या रशिदाबी आणि चंपादेवी शुक्ला या दोन महिला गेली ३५ वर्षे लढा देताहेत. या दोघीही त्या वेळी एका स्टेशनरीनिर्मिती कारखान्यात काम करीत होत्या. या वायुगळतीमुळे रशिदाबींच्या कुटुंबातील सहा व्यक्ती; तर चंपादेवी शुक्ला यांचे पती बळी पडले होते, त्यांचे एक नातवंड अपंग जन्माला आले. या दुर्घटनेनंतर दहा वर्षांनी युनियन कार्बाइडने देऊ केलेली ४७ कोटी डॉलर्सची नुकसानभरपाई म्हणजे दुर्घटनाग्रस्तांवर मोठा अन्यायच होता.

कालांतराने युनियन कार्बाइड आणि डाऊ केमिकल्स या कंपन्यांचे विलीनीकरण झाले. मात्र डाऊ केमिकल्सने आधीची भरपाई देण्याबाबत हात वर केल्यावर रशिदाबी आणि चंपादेवी यांनी दिल्ली गाठली आणि थेट संसदेसमोरच उपोषणास बसल्या. या दोघींच्या प्रयत्नांनी डाऊ केमिकल्सविरोधात आंदोलन आकारास आले. २००३ साली त्यांनी डाऊ केमिकल्सच्या मुंबईतील आणि नंतर नेदरलँड्समधील कार्यालयात जाऊन विषारी प्रदूषकांनी भरलेल्या बाटल्या भेट म्हणून दिल्या. अमेरिकेच्या दहा मोठय़ा शहरांमध्ये जाऊन भोपाळच्या दुर्घटनाग्रस्तांची माहिती देणारी भाषणे दिली.

या आंदोलनामुळे रशिदाबी आणि चंपादेवी यांच्या कार्याचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित होऊन त्यांना २००४ साली ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल प्राइझ’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारातून मिळालेल्या तब्बल सव्वा लाख डॉलर्स इतक्या रकमेचा उपयोग भोपाळच्या दुर्घटनाग्रस्तांसाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी ‘चिंगारी ट्रस्ट’ची स्थापना केली. या विश्वस्त संस्थेमार्फत दुर्घटनेत अपंगत्व आलेल्यांवर उपचार केले जात आहेत. दुर्घटनाग्रस्त मुले संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात राहून उपचार घेतात, खेळतात आणि शिकतात. ज्यांना राहणे शक्य नाही त्या मुलांची त्यांच्या घरापासून पुनर्वसन केंद्रापर्यंत वाहतूक सुविधा संस्थेमार्फत दिली जाते, त्यांना दुपारचे जेवणही दिले जाते. भोपाळ वायुगळती पीडितांच्या न्यायहक्कांचा लढा आजही सुरूच आहे; मात्र पीडितांच्या आणि त्यांच्या भावी पिढीच्या आयुष्यात या संस्थेने आशेची ‘चिंगारी’ प्रज्वलित केली आहे, हे नक्की!

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org