26 October 2020

News Flash

कुतूहल – रसायनांच्या उत्पादनात क्लोरिन

घरी प्यायच्या पाण्याला क्लोरिनचा वास आला तर आपल्याला शंका येते की या पाण्यात क्लोरिन जास्त झालं नाही ना? कारण प्यायचं पाणी र्निजतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन वापरतात.

| July 17, 2014 12:32 pm

घरी प्यायच्या पाण्याला क्लोरिनचा वास आला तर आपल्याला शंका येते की या पाण्यात क्लोरिन जास्त झालं नाही ना? कारण प्यायचं पाणी र्निजतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन वापरतात. याशिवाय रसायनं उत्पादनात मोठय़ा प्रमाणात क्लोरिनचा वापर होतो.    
क्लोरिन हा हिरवट पिवळसर रंगाचा वायू आहे. याचा वास तीव्र, दाहक व क्षोभकारक असून हवेपेक्षा २.८ पट अधिक जड आहे. जड असल्यामुळे हा वायू जमिनीलगत जास्त वेळ राहतो. शास्त्रज्ञ शील याने १७७४ साली क्लोरिन वायू तयार केला. १७८५ साली बार्थोलेटने याची ब्लिचिंगची क्षमता दाखविली व १७९९ साली चार्ल्स टेनप्टनने पावडर करायची पद्धत शोधून काढल्यामुळे त्याला व्यापारी महत्त्व आले. क्लोरिन अ‍ॅरोमॅटिक(बेंझिन िरग असलेली हायड्रोकार्बन संयुगे) संयुगापेक्षा अ‍ॅलिफॅटिक(बेंझिन िरग नसलेली हायड्रोकार्बन संयुगे) संयुगात जास्त क्रियाशील असतो. क्लोरिन वायू क्रियाशील असल्यामुळे तो सामान्यत: शुद्ध स्वरूपात आढळत नाही. फक्त ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या अतिउष्ण वायू मिश्रणात तो दिसून येतो. पृथ्वीच्या कवचामध्ये क्लोरिनचं प्रमाण ०.०५५ टक्का आहे. समुद्रातील लवणं व खनिज मीठ यांत तो विद्राव्य क्लोराइडांच्या रूपांत विपुलतेनं आढळतो.
मिठाच्या द्रावणाच्या विद्युत विघटनात कॉस्टिक सोडय़ाबरोबर क्लोरिन हा वायू तयार होतो. क्लोरिन हे रासायनिकदृष्टय़ा हॅलोजन वर्गातलं आणि क्रियाशील मूलद्रव्य आहे. औद्योगिक क्षेत्रात क्लोरिनला एक महत्त्वाचा कच्चा माल किंवा आरंभिक रसायन म्हणून महत्त्वाचं स्थान आहे. मिठाच्या द्रावणाच्या विद्युत विघटन प्रक्रियेच्या या शोधाअगोदर क्लोरिन वायू मॅँगनीज डायऑक्साइड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यातील रासायनिक अभिक्रियेनं मिळवीत.
एक काळ असा होता की कॉस्टिक सोडय़ाच्या निर्मितीत तयार होणाऱ्या क्लोरिनचं करायचं काय? हा प्रश्न होता. आज परिस्थिती उलट आहे, अधिक क्लोरिन मिळविण्यासाठी कॉस्टिक सोडय़ासारखी कारखाने निघत आहेत. क्लोरिनचा उपयोग करून हायड्रोक्लोरिक आम्ल, व्हिनाइल क्लोराइड, डीडीटी, विरंजकचूर्ण (ब्लिचिंग पावडर), अ‍ॅल्युमिनिअम क्लोराइड, सिलिकॉन, टेट्राक्लोराइड, क्लोरोबेंझीन्स आणि इतर क्लोरो संयुगे तयार होतात. क्लोरिन हा विषारी वायू असल्याने अगदी थोडय़ा प्रमाणातील क्लोरिनमुळे श्वसनसंस्थेचा दाह होतो, खोकला येतो.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – अपराधगंड नाही, कृतज्ञता..
तुझ्याशी बोलताना, ‘दिल जो न कह सका, वोही राजे दिल कहने की रात आ गयी..’ असं वाटलं ना, आपली सिक्रेट आपल्याशी शेअर करणं म्हणजे अजब वाटतं. आपलं गुपित आपल्याकडे जाहीर करायचं, नॉट फॉर पीपल! काही तरी वेगळं वाटतं. थोडीशी भीड चेपून आपल्याशी संवाद करायचं, स्वत:ही धीटपणे वागायचं, अशी आगळीक करायची.
ऑन सीरियस नोट. मनातल्या आतल्या थरातली भावना तुझ्याकडे व्यक्त करायची आहे. कोण जाणे, केव्हापास्नं मनात कशान्कशाबद्दल अपराधी वाटतं. अपराधी म्हणजे गिल्टी वाटतं. आपल्याला कोणी विशेष मदत केली असेल तर त्याबद्दल गिल्टी वाटतं म्हणजे आपल्या पात्रतेपेक्षा अधिक मदत मिळाली, प्रेम मिळालं, आपण त्याची मनाजोगती परतफेड करू शकत नाही याबद्दल गिल्टी वाटतं. आपण कोणाला कधी तरी चुकीचं बोललो त्याबद्दल खंत वाटते, पण मी एकदा धीर करून त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि रीतसर क्षमा असावी म्हटलं. त्यामुळे खूप मोकळं वाटलं. खूप लोकांना तर तितकं करायची तयारी नसते किंवा प्रांजळपणा नसतो. त्या खंत वाटण्याचा हिशेब माझ्या मनाशी मी चुकता केलाय. मी त्याबाबतीत कम्प्लीट आहे, पण अपराधीपणा मात्र मला चिकटून राहिलाय. तुझ्याशी बोलता बोलता आणखी एक विचार सुचला. म्हणजे मी स्वत:ला अपराधी का समजतो? का समजावं? माझ्यावर प्रेम करणाऱ्या, मदत करणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा आऊट ऑफ द वे जाऊन माझी पाठराखण केलीय. प्रेमाची पखरण केलीय. त्यांनी माझ्यावर इतकं प्रेम करण्याचं, मदत करण्याचं तसं काही स्पष्ट कारण नव्हतं. त्यांचा स्वार्थी हेतू नव्हता. माझ्याकरता प्रेमाची विरासत ठेवणारे पालक, शिक्षक आणि कुटुंब खरंच निर्हेतुकपणे वागले.
अशा गोष्टींबद्दल मला अपराधी वाटतं. ‘डु आय डिझर्व धिस लव्ह?’ असं मनात येतं. मनाला बोचत राहतं. मी खूप वेळा त्या सर्वाशी संपर्क साधून माझ्या मनाची ही सल आणि अपराधगंड व्यक्त केला. त्यावर त्यांनी हसून सोडून दिलं. या अपराधगंडामुळे माझ्या मनातला मोकळेपणा आक्रसतो. अपराधी वाटत असल्याने कोणतीही मजा करताना, खळखळून हसताना मनात सुरकुती उमटते. निखळ आनंद घेता येत नाही.
मनातली ही जळमटं खचितच नाहीत, पण मनातली जाळी आहेत. अपराधगंडाच्या जाळ्यात स्वत:ला अडकवून टाकतो आणि हे सगळं उगीचच. खूप घोळ घातला आणि ठरवलं हे तुला सांगायलाच हवं.
मित्रा, काय आश्चर्य? तुझ्याशी मन मोकळं करताना मला विचार सुचला. यू नो, मला वाटतं, असा अपराधगंड सोडून द्यायचा असेल तर मला दोन गोष्टी करायला हव्यात.
पहिली गोष्ट ही की लोकांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल, मदतीबद्दल मी कृतज्ञता बाळगावी. मी त्याबद्दल कृतार्थ आहे. अपराधी नाही. त्यांच्या प्रेमाला लायक ठरावं म्हणून त्यांनी मला प्रेमस्वरूपात प्रोत्साहन दिलंय याची जाणीव ठेवावी. आय वाँट टु बी ग्रेटफुल, नॉट गिल्टी! आणि दुसरी.. येस, मीही असंच कुटुंबावर, मित्रपरिवारावर, समाजावर निर्हेतुक प्रेम करावं. प्रेमाखातर प्रेमाची पखरण करावी. दुसऱ्याला सहज मदत करावी, त्यांच्या अडचणीत साहाय्य करावं म्हणजे मदतीचा हात माझ्या हातात अलगद आला तसा त्यांचा हात हाती धरावा.
केवढा रीलिफ वाटला रे.. छान वाटतं, तुझ्याशी मनमोकळं बोललं की..
 तुझा मित्र,
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – सुस्थितीतले लोकही बुवांच्या जाळ्यात, हा मनाचा कमकुवतपणा
‘‘खरे पाहता जगात जन्माला येणारी सर्व माणसे सारखी असतात. सर्वाना निसर्गाचे नियम सारखेच लागू पडतात. जन्म, वाढ, मृत्यू कुणाला चुकत नाही. अंतर असले तर ते बुद्धीत, कलाकौशल्यात, स्वभावात किंवा गरिबी-श्रीमंतीत. तसे विशेष गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसतील तिची योग्य संभावना अवश्य झाली पाहिजे.. पण तसा कसलाही गुण अंगात नसताना समाजाच्या भोळेपणाचा फायदा घेअून त्याला नादी लावणे व आपल्याभोवती भक्तगणांचा तांडा गोळा करणे ही शुद्ध ठकबाजी आहे. अशा ठकबाजीच्या जाळ्यात सापडणारे आपल्या पैशाबरोबरच बुद्धीही गमावून बसतात. थोडक्यात सांगावयाचे तर बुवाबाजी हे आपल्या समाजाला जडलेले अेक दुर्धर व्यसनच आहे असे म्हणावे लागते. आणि धर्माच्या बुरख्याखाली ते वावरत असल्याने त्याच्यावर हत्यार अुचलण्याचे साहस कुणालाही करवत नाही.’’ बुवाशाहीचा असा पंचनामा करून शंकरराव वा. किलरेस्कर बुद्धिवादाची कास पकडत  (१९३३ साली!) लिहितात- ‘‘आपला हा असा देश आहे, की तेथे बुवाबाजीचा फैलाव व्हावयाला अतिशय अनुकूलता आहे. आपल्या पुराणात जसे अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक साधुसंतांचे चरित्र म्हणजे निरनिराळ्या चमत्कारांची व त्यांच्या दैवी सामर्थ्यांची वर्णने असलेली पोथी असते. सर्वाचा उपदेश एकच – ‘सद्गुरूला शरण जा म्हणजे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व सर्व संकटांपासून मुक्त व्हाल.’ आपल्या समाजात अंधश्रद्धा व दैववाद अशा प्रकारे सगळीकडे बोकाळल्यावर त्याचा फायदा घेणारी भोंदूगिरीही सर्वत्र फैलावल्याशिवाय कशी राहील? दारिद्रय़ाने अथवा रोगाने हैराण झालेले लोक अशा भोंदू बुवांच्या नादाला लागल्यास नवल नाही. पण पुष्कळदा सुस्थितीतले लोकही त्यांच्या जाळ्यात सापडत असतात.. स्वतंत्र बुद्धीचा व स्वाभिमानाचा त्याग करून एखाद्या ढोंगी बुवापुढे माणसाने नाक घासायला तयार व्हावे हा त्याचा केवढा अध:पात! मनुष्याने एखाद्या दगडाच्या अथवा पितळेच्या मूर्तीला देव मानून तिला शरण जाणे हे त्याच्या मनाच्या कमकुवतपणाचेच द्योतक आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2014 12:32 pm

Web Title: chlorine in the production of chemicals
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – खतनिर्मितीत फॉस्फरस
2 कुतूहल – गंधकाचा वापर
3 कुतूहल: रासायनिक उद्योगांचा कच्चा माल
Just Now!
X