News Flash

जे आले ते रमले.. : तंजावर ग्रंथालयाचे प्रेरणास्थान – श्वार्ट्झ

श्वार्ट्झ इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचा मूळचा जाणकार होताच

 

डॅनिश मिशनचे काम करताना पुढे तंजावरच्या राजांशी मित्रत्वाचे आणि मार्गदर्शकाचे संबंध आलेला ख्रिश्चन फ्रेडरिक श्वार्ट्झ याने तंजावरचे राजे तुळसाजीराजे आणि सरफोजीराजे यांना मोठय़ा राजकीय संकटांमधून वाचवले. श्वार्ट्झ इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचा मूळचा जाणकार होताच पण भारतात आल्यावर त्याने मराठी, तमिळ, संस्कृत आणि मल्याळी या भाषा शिकून पुढे या भाषांचा व्यासंग जोपासला.

सरफोजीराजे भोसलेंचे पालकत्व स्वीकारलेल्या श्वार्ट्झने सरफोजींना युरोपियन भाषांमध्ये संभाषण करण्यास शिकवलेच परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे विविध भाषांमधले साहित्य, वाङ्मय यांविषयी आवड निर्माण करून दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते, विविध वस्तू जमा करण्याचा छंद लावला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सरफोजी मद्रासहून तंजावरात परत आले. त्यांनी सरफोजी द्वितीय या नावाने तंजावरचे राजे म्हणून राज्याच्या प्रशासनात लक्ष घालण्यास सुरुवात केली. श्वार्ट्झ प्रशासनाच्या कामातही त्यांना मदत करीत होताच. सर्व काही सुरळीत चालले असताना कंपनी सरकारला आपल्या राज्यविस्ताराची हाव सुटली आणि या ना त्या कारणाने त्यांनी भारतीय राज्यांवर कंपनी सरकारात विलीन होण्यासाठी दबाव टाकण्याचे धोरण अवलंबिले. लॉर्ड वेलस्लीने सरफोजींचे मन वळवून त्यांच्याकडून तंजावरचे प्रशासन काढून घेतले आणि तिथे आपला कमिश्नर नेमला. सरफोजींना आता नामधारी राजा म्हणून मोठी थोरली रक्कम पेन्शन म्हणून मिळू लागली.

त्यापुढील काळात सरफोजींनी उर्वरित आयुष्यभर श्वार्ट्झच्या मार्गदर्शनाखाली भाषाविद्या व्यासंग, दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथ, ताम्रलेख, शिलालेख, राजकीय दस्तावेज यांचा संग्रह करणे, युरोपियन ग्रंथांचे मराठी, तमिळ आणि संस्कृतमध्ये भाषांतरे करणे यात काळ व्यतीत केला. दुर्मीळ हस्तलिखिते, ताम्रलेख यांचा संग्रह करतानाच श्वार्ट्झनी सरफोजींना दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्याचा व्यासंग लावला. श्वार्ट्झच्या मार्गदर्शनामुळे सरफोजींनी एक भव्य सुयोजित ग्रंथालय उभे केले.

श्वार्ट्झ यांनी या ग्रंथालयाला जोडून छापखाना सुरू करण्याची अभिनव कल्पना सरफोजींना देऊन छापखान्याची यंत्रसामुग्री मिळवण्याची व्यवस्था केली. हे सर्व करीत असतानाच पायाच्या दुखण्याने १७९८ साली श्वार्ट्झचा मृत्यू झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 5:39 am

Web Title: christian friedrich schwartz thanjavur
Next Stories
1 तंजावर राज्यपालक श्वार्ट्झ
2 निऑन दिवे
3 भाषापंडित श्वार्ट्झ
Just Now!
X