19 March 2019

News Flash

भाषापंडित श्वार्ट्झ

श्वार्ट्झ १७६९ साली प्रथम तंजावरात आला

सध्याच्या तमिळनाडूतील ट्रांकोबार ऊर्फ तरंगमबाडी येथे, १७५० साली डॅनिश मिशनमध्ये दाखल झालेला मिशनरी ख्रिश्चन श्वार्ट्झ त्याचा भाषा व्यासंग आणि तंजावरच्या भोसले राजघराण्यातल्या तुळसाजी आणि सरफोजी यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे तंजावरातच एवढा रमला की, परत मायदेशी गेलाच नाही. तमिळपाठोपाठ मराठी, मल्याळम, तेलुगु आणि हिंदी या भाषाही त्याने अल्पावधीतच आत्मसात केल्या. स्थानिक तमिळ भाषेत संभाषण केल्यामुळे धर्मप्रचाराचे त्याचे काम अधिक परिणामकारक होऊ लागले.

श्वार्ट्झ १७६९ साली प्रथम तंजावरात आला तेव्हा भोसले घराण्याचा तुळसाजी हा राजा गादीवर होता. श्वार्ट्झने राजाशी तमिळमध्ये केलेल्या अस्खलित संभाषणामुळे तो प्रभावित झाला आणि पुढे या दोघांची घट्ट मत्री जमली. तंजावर शहर ट्रांकोबारपासून जवळ असल्यामुळे श्वार्ट्झचे तंजावरात जाणे-येणे वाढले. थोडय़ाच काळात, तुळसाजीशी संबंध वाढल्यावर श्वार्ट्झ मराठी भाषाही व्यवस्थित बोलायला लागला. देवनागरी, तमिळ, मोडी, मल्याळम या लिपींचा अभ्यास केल्यावर त्याने संस्कृतचा अभ्यास करून हिंदूंचे धर्मग्रंथ, हस्तलिखिते यांचे अध्ययन सुरू केले. श्वार्ट्झच्या भारतीय भाषा आणि हस्तलिखितांच्या अभ्यासाच्या व्यासंगामुळे त्याचे मुख्य कार्य, ख्रिस्ती धर्मप्रसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले.

१७७३ साली अर्काटचा नवाब महंमदअली याने ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास रेसिडेन्सीच्या साहाय्याने तंजावरवर हल्ला करून तुळसाजीला पराभूत केले आणि कैद करून तंजावरचा राज्यप्रदेश अर्काटच्या राज्यप्रदेशात सामील करून घेतला. त्यावर तुळसाजीचा मित्र आणि शुभचिंतक श्वार्ट्झ याने ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन येथील कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे याबाबत दाद मागितली. १७७६ साली श्वार्ट्झच्या प्रयत्नांना यश मिळून तुळसाजीला तंजावरचा राज्यप्रदेश परत मिळाला. त्यानंतर श्वार्ट्झचे वास्तव्य अधिकतर तंजावरातच असे. या काळात आपले मिशनचे काम कमी करून तो तंजावरमध्ये मराठी भाषा, देवनागरी आणि मोडी लिपींच्या अभ्यासात गढून गेला.

स्थानिक तमिळभाषक लोकांमध्ये मिळून मिसळून वागण्यामुळे, त्यांची तमिळ भाषा आणि इतर जीवनशैली पूर्णपणे स्वीकारल्यामुळे श्वार्ट्झ एव्हाना पूर्णपणे भारतीयच झाला!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on March 1, 2018 2:29 am

Web Title: christian schwartz