सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

एखादा दूरदेशी, भिन्न भाषिक, वेगळ्या धर्म-संस्कृतीत वाढलेला आणि उच्चशिक्षित माणूस भारतातील दुर्गम भागातील आदिवासींशी किती समरस होऊ शकतो याचे ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फ हे उत्तम उदाहरण आहे. ख्रिस्तॉफ हे मूळचे ऑस्ट्रियन, ईशान्य भारतातील कोन्याग नाग जमातीचा अभ्यास करण्यासाठी आलेले आणि पुढे तेलंगणातील गोंड आदिवासींमध्ये समरस झाले, इतके की त्यांना ‘गोंडवनचा पीर’ हे नाव झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत, ख्रिस्तॉफ हे मूळचे ऑस्ट्रियन म्हणून त्यांना अटक करून हैदराबादेत स्थानबद्ध केले गेले. पुढे त्यांच्यावरचे निर्बंध शिथिल झाल्यावर त्यांच्या मानववंशशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग करून घ्यायचे निजामाने ठरवले. तत्कालीन हैदराबाद संस्थानातील आदिलाबादचा परिसर राजगोंड, कोलाम यांसारख्या पारंपरिक आदिवासींच्या वसाहतींनी व्यापलेला होता. या आदिवासी गटांपैकी राजगोंड हे प्रमुख आदिवासी समजले जात. गोंड आदिवासींचं सावकार, पोलिस, जंगल अधिकारी आदींकडून शोषण आणि छळ होत असे. याचा परिणाम होऊन १९४० मध्ये त्यांचा नेता कोमारम भिमूच्या नेतृत्वाखाली गोंड आदिवासींनी बंड पुकारलं. निजामानं ते बंड बळाचा वापर करून मोडून वेळ निभावून नेली, पण पुढे हेमेनडॉर्फची ओळख झाल्यावर आणि त्यांचा भारतात येण्याचा हेतू कळल्यावर त्यांच्यावर निजामाच्या हैदराबाद सरकारनं आदिवासींच्या विद्रोहामागील कारणं शोधून काढण्याची जबाबदारी सोपवली. तसेच हैदराबाद संस्थानाचा आदिवासी कल्याण विभाग सुरू करून त्याचे सल्लागार म्हणून ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फची नियुक्ती केली.

सरकारी काम म्हणून ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फ आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ यांनी तेलंगणातील आदिलाबाद आणि इतर प्रदेशातील आदिवासी वस्त्यांचा विस्तृत, दुर्गम भागात दौरा केला. दळणवळण आणि वैद्यकीय सोयी, अन्नपाणी आणि राहण्याची नीट व्यवस्था नसताना त्या काळात या परकीय, ऑस्ट्रियन दांपत्याने केवळ आदिवासींचा मानववंशशास्त्रीय आणि सामाजिक चालीरीतींचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद संस्थानातील सर्व आदिवासी पाडे पिंजून काढले!

विशेष म्हणजे काही काळ सेतु माधवराव पगडी हे ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फ यांचे या कामात साहाय्यक अधिकारी होते!