16 February 2019

News Flash

कुतूहल  : क्रोमिअम : रंगांची दुनिया

क्रोमिअमच्या संयुगाचा शोध अठराव्या शतकातच लागला.

 

पाचू, माणकांचा मोह कुणाला होत नाही? माणकांच्या या लाल रंगामागे व पाचूच्या हिरव्या रंगामागे असणारे मूलद्रव्य म्हणजे क्रोमिअम. पृथ्वीच्या कवचात आढळणाऱ्या बॉक्साइटबरोबर क्रोमिअम असल्यास लाल माणके, हिरवे पाचू तयार होतात. क्रोमिअम हे मूलद्रव्य अतिसूक्ष्म प्रमाणात वातावरणात व पाण्यातही आढळते.

क्रोमिअमच्या संयुगाचा शोध अठराव्या शतकातच लागला. १७६१मध्ये जोहान लेहमनला उराल पर्वतात नािरगी-लाल संयुग सापडले. त्याला त्याने सायबेरियन रेड लेड असे नाव दिले. ते, खरे तर होते, लेड क्रोमेट, क्रोकाइट या नावाने ओळखले जाणारे! १७७०मध्ये पलास व लेहमन हय़ांनी क्रोकाइटपासून चमकदार पिवळा रंग निर्माण केला व तो लोकांनी फारच आवडीने वापरायला सुरुवात केली. १७९७ मध्ये लुई निकोलस व्हॅक्वेलिनने क्रोकाइटवर प्रक्रिया करून क्रोमिअम मूलद्रव्य आणि त्याची संयुगे निर्माण केली. याचे नावच रंगावरून (क्रोमा=रंग) ठेवले गेले. क्रोमिअम (Cr) मूलद्रव्याचा अणुक्रमांक २४ व अणुभार ५२ आहे. राखाडी रंगाचे हे मूलद्रव्य चकाकणारे असते. त्याचा हवेशी संयोग झाल्याबरोबर त्यावर एक संरक्षक आवरण तयार होते. ते बरेच कठीण असते. त्यामुळे त्याचा दैनंदिन वापरात उपयोग होतो (क्रोम प्लेटिंग). हा धातू त्याच्या मूळ रूपात व संमिश्राच्या रूपात बहुगुणी समजला जातो. याच्या पॅसिव्हिटीचा (संरक्षक आवरण) शोध व वापर कदाचित चीनमध्ये इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात झाला असावा. क्वीन राजसत्तेच्या काळातील जी टेराकोटा आर्मीची शिल्पे आहेत, त्यांच्या बाण व भाल्यांची टोके इतक्या वर्षांनंतरही न गंजलेली आढळली. ते क्रोमियम असावे या शक्यतेवर संशोधन चालू आहे.

या धातूचा एक मजेदार गुणधर्म म्हणजे ३८ अंश सेल्सिअस किंवा त्याखाली त्यात मुळीच चुंबकीय गुणधर्म नसतात, पण ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापवल्यावर मात्र हे मूलद्रव्य चुंबकीय होते.

क्रोमियमच्या खाणी मुख्यत्वे दक्षिण आफ्रिका (४८ टक्के), कझाकस्तान (१३ टक्के), भारत (१० टक्के), टर्की (११ टक्के) व रशियात आढळतात. येथे क्रोमिअम हे क्रोमाइट या संयुगाच्या रूपात असते.

डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on May 1, 2018 2:05 am

Web Title: chromium molecule