News Flash

कुतूहल : रागाचा पारा

रागाच्या पातळ्यांचंच प्रतिबिंब त्या प्रतिसादांमध्ये पडलेलं आहे या गृहीतावरून बेकनी मग एक मोजपट्टी बनवली.

रागाच्या तीव्रतेचं मोजमाप करण्यासाठी अर्नाल्ड बेकनी वेगळा विचार करीत एक ‘क्लिनिकल अ‍ॅन्गर स्केल’ तयार केलं आहे

रागाचा पारा चांगलाच चढलेला दिसतो. आपण ऐकतो. ते अलंकारिक भाषेत असलं तरी आपल्याला ते पुरतं. त्याचा अर्थ समजायला आपल्याला वेळ लागत नाही.

पण हे वैज्ञानिक कसले खट! त्यांना असलं मोघम बोलणं पटत नाही. अंग किती तापलंय किंवा रक्तदाब कुठवर पोचलाय हे अजमावण्यासाठी हातातल्या मीटरमधला पारा कोणत्या पातळीवर गेलाय. हे बघण्याची त्यांची सवय. तेव्हा रागाचा पारा किती चढलाय हे बघण्यासाठी असंच एखादं उपकरण तयार करता नाही का येणार, असा सवाल त्यांनी स्वतलाच केला. पण राग ही शारीरिक अवस्था नसून मानसिक धारणा आहे.

शिवाय प्रत्येक बाबतीत अशा निश्चित आकडय़ांमध्ये मोजमाप करता येत नाही. याचाही अनुभव त्यांना होताच. म्हणूनच तर वादळाच्या संकटासाठी जसा निरनिराळ्या क्रमांकाचा बावटा बंदरावर लावला जातो. तशाच प्रकारे रागाच्या तीव्रतेचं मोजमाप करण्यासाठी अर्नाल्ड बेकनी वेगळा विचार करीत एक ‘क्लिनिकल अ‍ॅन्गर स्केल’ तयार केलं आहे.. तेच आता प्रमाण मानलं जातं.

त्यासाठी बेक यांनी एक सर्वेक्षण करत राग येईल अशा वेगवेगळ्या घटनांचं वर्णन करून त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होईल. हे सहभागी व्यक्तींना विचारलं. स्वभावधर्मानुसार अर्थात वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. त्या घटनेनं एखाद्याचं पित्त चांगलंच खवळलेलं दिसलं तर दुसरा स्थितप्रज्ञासारखा स्वस्थच राहिला. रागाच्या पातळ्यांचंच प्रतिबिंब त्या प्रतिसादांमध्ये पडलेलं आहे या गृहीतावरून बेकनी मग एक मोजपट्टी बनवली. सौम्य प्रतिसादाला एक तर आकांडतांडव करण्याला दहा. त्याचं प्रमाणीकरण करायचं तर नेमके कोणते प्रश्न विचारायला हवेत हेही त्यांनी निर्धारित केलं. कारण ‘याचा तुला राग येईल का,’ असा थेट प्रश्न विचारल्यास ताबडतोब आणि ठामपणे होकार मिळत असे. पण त्याच घटनेसंबंधी ‘तुला काय वाटतं?’ असं थोडंसं मोघम विचारल्यास तितक्या तत्परतेनं किंवा तीव्रतेनं होकार दिला जात नसे. ही अनिश्चितता टाळण्यासाठीच बेकनी प्रमाण प्रश्नावलीही तयार केली आहे. त्याचाच वापर मनोविकारतज्ज्ञ अनावर होत असलेल्या रागानं ज्याला पछाडलं आहे अशा रुग्णावर उपचार करण्यासाठी त्याच्या रागाचा पारा या दहाच्या मोजपट्टीवर कुठवर पोचतो याचं निदान करतात. ‘आगबभूला हो गया’ असं म्हणण्याऐवजी आता आपण त्याच्या रागाच्या पर्यायानं सहाची धोकादायक पातळी ओलांडली आहे असं सांगू शकू, नाही का?

-डॉ. बाळ फोंडके , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : ‘सहृदय असल्याशिवाय समीक्षा जमणे अशक्य’

२००६ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर शास्त्रीजींनी केलेल्या प्रदीर्घ भाषणातील त्यांचे काही विचार जाणून घेऊ या.

‘‘काही वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता – ‘दि मेकिंग ऑफ पोएट’ – कवी कसा बनतो. त्यात मी म्हटले होते, की कवी बनत नाही. विशिष्ट घटक असतील तर कवी होतो, असेही नाही, तर कवी स्वयंभू असतो जो आपला काव्यसंसार निर्माण करतो.. कवी आपल्याच काव्यमय संसारात रमलेला असतो.. त्यातच तो खूश असतो; पण जेव्हा कधी त्याचं मन विचलित होतं तेव्हा बाह्य़ संसाराकडे त्याचं लक्ष जातं आणि त्यातील विषमता आणि विसंगतीमुळे तो दु:खी होतो..

प्रत्येक भाषेला आपलं एक व्यक्तित्व असते. त्याची एक ओळख असते. तेव्हा त्याच्यामध्ये मोडतोड करू नये, की ज्यामुळे त्याचे मूळ स्वरूप धूसर होऊन ती दुसऱ्याच एखाद्या भाषेसारखी वाटू लागेल. संस्कृत ही संस्कृत भाषाच वाटली पाहिजे. ती प्राकृत किंवा हिन्दीसारखी नाही. जोपर्यंत शब्दांचा प्रश्न आहे, त्यात काळानुसार, आवश्यकतेनुसार इतर भाषेतील शब्द घ्यावे लागतील आणि ते इथे रुजूही लागतील. संस्कृतसाठी हे काही नवं नाही. फार पुरातन काळापासून संस्कृतने इतर भाषांतील शब्द आत्मसात केले आहेत. अरबी भाषेतील ‘कलम’, फारसी भाषेतील ‘बन्दी’ आणि ग्रीकमधील ‘होरा’ शब्द याचेच उदाहरण आहे.

माझं लेखन दोन प्रकारचे आहे – एक मौलिक आणि दुसरे समीक्षात्मक.. एकाने मला विचारले, की यापैकी तुम्हाला काय म्हणून ओळखलेले आवडेल? कविरूपात की समीक्षक म्हणून? मला या दोन्ही रूपांतील ओळख आवडेल. संस्कृतमध्ये ‘समीक्षक’साठी ‘सहृदय’ हा सुंदर शब्द आहे. सहृदय असल्याशिवाय समीक्षा करताच येणार नाही. सहृदय तोच असतो, ज्याचे हृदय मूळ लेखकाप्रमाणे असते. ‘समानं हृदयं अस्य’ – तो समानधर्मी बनतो.

जीवनात खूप काही केलं आणि खूप काही करायचं आहे. आठवणींच्या या मालिकेत मी डोकावून बघतो, की अजून काय काय करायचं आहे?.. ज्ञानपीठाच्या या पवित्र स्थानात मी आज उभा आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यात आणखी सौभाग्यशाली काय असू शकतं? म्हणूनच मी अत्यंत विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे – यामुळे माझ्या भाषेला अधिक समृद्ध करण्याची प्रेरणा मला देत राहील.’’

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 2:04 am

Web Title: clinical anger scale
Next Stories
1 कुतूहल : लाज वाटे..!
2 डॉ. सत्यव्रत शास्त्री – संस्कृत (विभागून)
3 गेओर्क झिमोन ओहम
Just Now!
X