एक नूर आदमी, दस नूर कपडा’, अशी एक म्हण प्रचलित आहे. पण आताच्या माणसाला हे वर्णनही कमी पडेल अशी परिस्थिती आहे. मध्यमवर्गीयांमध्येही एका व्यक्तीकडे कपडय़ांचे दहापेक्षा जास्त संच सहजी मिळतील. उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांकडे तर या पुढची पायरी गाठलेली असेल. बाजारात कापडाचे इतके प्रकार उपलब्ध आहेत, त्यामधून निवड करायला जायचे तर घेणाऱ्याचा गोंधळ उडेल. हे कशामुळे साध्य झाले याचे उत्तर द्यायचे झाल्यास एका शब्दात सांगता येईल ‘रसायनशास्त्र’.
याचा खुलासा करायचा झाल्यास कापूस, रेशीम, लोकर या नसíगक तंतूबरोबर किंवा काही वेळा त्यापेक्षा जास्त पॉलिस्टर, पॉलिअमाइड, अ‍ॅक्रिलिक अशा रसायनांचा वापर करून निर्मिलेले तंतू मोठय़ा प्रमाणात वापरात आले आहेत. ते सुद्ध फक्त अंगावर घालायच्या कपडय़ाबद्दल बोलतानाचे चित्र आहे. इतर अनेक वापराकरिता आणखी तंतूंचे उत्पादन झाले आहे. कधी नसíगक तंतूबरोबर मिश्रण करून या मानवनिर्मित तंतूंचा वापर केला जातो, तर कधी स्वतंत्रपणे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या वस्त्रप्रावरणांची रेलचेल बघायला मिळते. मानवनिर्मित तंतूप्रमाणेच रासायनिक प्रक्रियांचा वापरही मुबलक प्रमाणात केला जात आहे. कापड आकर्षक करायचे असेल तर त्यावर रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे असते. हे पूर्वापार सुरू आहे. सुमारे दीडशे वर्षांपासून मागावर कापड विणून झाल्यावर काही प्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामध्ये ब्लीचिंग, मर्सरायिझग, डाईंग, िपट्रिंग, इत्यादी अनेक रासायनिक प्रक्रियांचा समावेश होतो. यापेक्षा अधिक रासायनिक प्रक्रियांचा अवलंब सध्या केला जात आहे. या सर्वामागचा उद्देश, त्या कापडाचा आकर्षकपणा वाढवणे हाच आहे. सध्याचा जमाना जाहिरातीचा आहे किंवा आपल्या उत्पादनाचे गुणगान गाण्याचा आहे. त्या वेळी अशी एक विशिष्ट  प्रक्रिया घेऊन, त्याचा जाहिरातीत समावेश करून आमचे उत्पादन (इथे कापड) इतरांपेक्षा वेगळे कसे आहे, हे दाखवण्याकरता पण केला जातो. अर्थात त्या वेळी उपयुक्ततेच्या दृष्टीने एखादा जास्तीचा गुण त्या कापडात असतो, जो इतर कापडाच्या उत्पादनात नसतो. सुरकुती न पडणारे सुती कापड हे त्याचे उदाहरण म्हणून लक्षात घेता येईल.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – आधीं होतें मी दिवटी..
आठवणीतल्या कविता चाळताना, आपण माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून किंवा अगदी मानववंशाचा एक नमुना म्हणून काव्य का रचतो इत्यादी गद्य प्रश्न पडत नाहीत.
बऱ्याचशा कविता कवी मंडळींनी पाठय़पुस्तकाकरिता रचल्या नव्हत्या, हे लक्षात घेतलं, तर कविता लिहिण्याचं एक उद्दिष्ट स्पष्ट होतं. ते म्हणजे वाचकाला ‘धडा’ शिकवणे. जगायला लायक बनविण्यासाठी ‘संदेश’ देणं, बोध शिकवणं. त्यामुळे काव्याच्या कोणत्याही ‘इझम्’मध्ये न शिरता, गूढ, कठीण शब्दांची जाळी अथवा मखर न विणता कविता थेट असायच्या.
तरीही त्या कवितांमधून कवीच्या कळत नकळत तत्कालीन समाजमानसाचं प्रतिबिंब पडत असे. इतकंच काय समाजाला यापुढे कोणती आश्चर्य अपेक्षित आहेत याचीही चाहूल लागते. आता वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ ही कविता घ्या.
कविता शिकलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत का? त्या कवितेबरोबर गतस्मृती जाग्या होताहेत का? कळवाल? कसं वाटलं कविता वाचून, कळवाल?
आधीं होतें मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती
झालें इवली मग पणती, घरांघरांतून मिणमिणती! १.
समई केलें मला कुणी, देवापुढतीं नेवोनी
निघुन आलें बाहेर, सोडित काळासा धूर! २.
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो
कंदिल त्याला जन म्हणती मीच तयांतिल परि ज्योती! ३.
बत्तीचे तें रूप नवें, पुढे मिळाले मज बरवें
वरात मजवाचूंन अडे, झगझगाट तो कसा पडे! ४.
आतां झालें मी बिजली, घरें मंदिरें लखलखली
देवा ठाऊक काय पुढें, नवा बदल माझ्यांत घडें! ५.
एकच ठावें काम मला प्रकाश द्यावा सकलांला
कसलेंही मज रूप मिळो, देह जळो अन् जग उजळो! ६.
(संदर्भ : आठवणीतल्या कविता, कवितेचे सर्वाधिकार कवीच्या हाती, द्वारे आठवण. कवी : वि. म. कुलकर्णी)
कविता निरागस आहे, गोड आहे.
त्या काळात साध्या साध्या गोष्टींमधून सानथोरांस कसा आनंद मिळे, याची कल्पना येते. थोडा अचंबा आणि उत्सुकता; पण कंदील म्हणजे काचमहाल!! डोळे दाटले.
काही मंडळी म्हणतील, की आजही आपण ‘दिवटी’च्या दिवसांत जगतोय अर्थात लोडशेडिंगच्या सौजन्याने! कवीने नकळत शेतकी संस्कृतीमधून बाहेर पडून शहरीकरणाकडे समाज वळलाय असं मांडलंय. इतकंच काय नव्या काळात ‘झगझगाटा’चं आकर्षण वाढेल, असं नमूद केलंय; परंतु समईच्या प्रकाशात वा विजेच्या उजेडात अभ्यास करतोय, संशोधन करतोय असा उल्लेखही नाही!!
पण मनमोरानं पिसारा फुलवला तो निष्पापतेच्या जिवावर!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – विषमता कायम राहून पुन्हा अंधश्रद्धा पसरते आहे..
‘‘प्रामाणिकपणाने समतेचे तत्त्व स्वीकारले तर अधिकार-सवलतींची घेवाण करताना आपल्यापेक्षाही वंचित असणाऱ्यांशी देवाणही करावी लागते, औद्योगीकरणाच्या मंथनातून निघणारे अमृत विषमतेचे हलाहल पचवून मगच पिता येते, ही गोष्ट आधी फार थोडय़ा लोकांना मान्य होते आणि समता व्यवहारांत उतरवणारे तर त्याहूनही कमी असतात. .. समाजजीवनावर अगतिकतेची, वैफल्याची पुटे चढू लागतात. लक्षावधी वर्षे माणसाला प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या सारासारविवेकावरचा विश्वास उडतो. त्यानंतर दिशाहीन झालेली माणसे अंधश्रद्धेच्या वादळात सापडतात. आध्यात्मिक आणि आधिदैविक विचारांचा पगडा समाजावर बसतो. कुडुबडे जोशी, साईबाबा, ‘भगवान’ रजनीश, महेश ‘योगी’ अशा लोकांची सत्ता समाजावर चालू लागते. तिरुपतीसारखी ‘जागृत’ देवस्थाने भक्तांनी गजबजून जातात. समाजातले मागास गट त्या अंधश्रद्धेच्या पाशातून कधी पूर्णपणे मुक्त झालेले नव्हतेच. गेल्या शतकात वरिष्ठ गटातील तरुणवर्ग काही प्रमाणात अंधश्रद्धेच्या वातावरणातून बाहेर पडून बुद्धिवादाचा व तर्कनिष्ठेचा आश्रय करू लागला होता. आज या गटामध्येही अंधश्रद्धा पुन्हा पसरते आहे.’’ गीता साने ‘भारतीय स्त्रीजीवन’ (मौज प्रकाशन गृह, ऑगस्ट १९८६) मध्ये विषमताग्रस्त समाजात कशी अंधाधुंदी असते याविषयी लिहितात -‘‘वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे विज्ञानाच्या नवनवीन शोधांमध्येही आपल्याला जुन्याचे समर्थन दिसू लागते. दलित हा निसर्गत:च हीन आहे असे प्रतिपादन करताना या विधानाला विज्ञानाचे आधार शोधण्यात येतात. माल्थसचा संख्यावाढीचा सिद्धान्त मजुरांची पिळवणूक व उपासमार ह्य़ांच्या समर्थनार्थ वापरण्यात आला. आनुवंशिकतेचा उपयोग दलित समाज बुद्धीने उणा आहे हे ठरवण्यासाठी करण्यात आला. दलित या नात्याने स्त्रीलाही तोच अनुभव येत असतो. प्राण्यांच्या जगतात विषमता व उच्चनीचता सर्वत्र आढळतात आणि मादी शरीरबळात उणी म्हणून तिचा अनुक्रम नेहमीच खाली असतो, हे सांगण्यात आले; पण निसर्गामधला अग्रक्रम गुणावर अवलंबून असतो हे मात्र सांगण्यात आले नाही.’’