स्थापत्य तंत्र वस्त्रांचा उपयोग कायमच्या किंवा तात्पुरत्या इमारतींच्या बांधकामासाठी तसेच विविध प्रकारचे पडदे व छत, ताडपत्री व इमारत बांधताना तिच्याभोवती लावावयाचे कापड इत्यादी गोष्टींसाठी केला जातो. तांत्रिक कारणांबरोबरच सुशोभीकरणासाठीसुद्धा स्थापत्य तंत्र वस्त्रांचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने बांधकाम, वास्तुरचना तंत्र, सांडपाण्याचा निचरा इत्यादीसाठी या वस्त्रांचा वापर होतो.
पारंपरिकपणे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकूड, सिमेंट, वीट बांधकाम आणि पोलादासारखे धातू या वस्तूंना पर्याय म्हणून उच्चतन्यता व लवचीकता असणाऱ्या कापडांचा उपयोग करण्यास मोठय़ा प्रमाणावर सुरुवात झाली आहे. या कारणांसाठी अ‍ॅरॅमिड, कार्बन व काचतंतू यासारख्या तंतूंपासून बनविलेल्या कापडांचा उपयोग केला जातो. पारंपरिक पदार्थापेक्षा या आधुनिक कापडांमध्ये ताकद व वजन तसेच कडकपणा व वजन यांचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे डिझाईनमध्ये मोठे वैविध्य शक्य होते. या तंतूंशिवाय पॉलिस्टर, पीव्हीसी आणि पॉली युरेथिन यासारख्या तंतूंचा वापरही स्थापत्य तंत्र वस्त्रे बनविताना केला जातो.
स्थापत्य तंत्रांचा वापर विमानतळ, खेळांची मदाने (स्टेडियम), हॉटेल, यांसारख्या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे.
स्थापत्य तंत्र वस्त्रांचा उपयोग पुढील कारणांसाठी केला जातो –
१) इमारत बांधकाम व पूल व इतर स्थापत्य रचनांसाठी. २) औद्योगिक इमारतींसाठी. ३) अंतर्भागातील डेकोरेशन करण्यासाठी. ४) पारंपरिक कौलारू प्रकारच्या छतासाठी.
५) ध्वनिरोधक पडद्यांसाठी.
६) सूर्यप्रकाशरोधक म्हणून.
७) इमारत बांधकामाच्या वेळी संरक्षक जाळे म्हणून.
८) खिडक्याबाहेरील छत म्हणून (कॅनॉपी). ९) बांधकामात वारण्यात येणारी ताडपत्री म्हणून. १०) विविध प्रकारचे पडद्यांचे छत बनविण्यासाठी. ११) गच्चीवर गळतिरोधक आवरण म्हणून. स्थापत्य तंत्र वस्त्रांसाठी विणाई, गुंफाई तसेच विनावीण या तीनही पद्धतीने तयार केलेले कापड वापरता येते. यासाठी उपयोगात आणले जाणारे कापड सर्वसाधारणपणे आच्छादित (कोटेड) केलेले असते.

चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 
संस्थानांची बखर – संस्थान बंगनपल्ली
सध्याच्या आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्य़ात असलेले बंगनपल्ली हे इ.स. १७९० ते १९४८ या काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. बिजापूरचा सुलतान इस्माइल अदिलशाह याने १६०१ साली राजा नंद चक्रवर्ती याच्यावर आक्रमण करून बंगनपल्ली किल्ला घेतला. अदिलशाहने हा किल्ला त्याचा विश्वासू सेनानी सिद्धू संबल याला देऊन किल्ल्याच्या आसपासच्या काही प्रदेशाची जहागिरी दिली. पुढे १६६५ मध्ये संबलशी झालेल्या मतभेदांमुळे अदिलशाहने बंगनपल्लीची जहागिरी त्याच्याकडून काढून मुहम्मद बेग खान याला सरंजामदारीने दिली. मुहम्मद बेगच्या मृत्यूनंतर त्याचा नातू फैज अलीखान बहादूर हा बंगनपल्लीच्या राजेपदावर आला. १६८६ साली मोगल बादशाह औरंगजेबाने बिजापूरची आदिलशाही सल्तनत उलथवून त्यांचा सर्व प्रदेश मोगल साम्राज्यात सामील केला. फैज अलीखानचा चुलता मोगल सनाधिकारी व पुढे सुभेदार होता. त्याच्या संबंधांमुळे औरंगजेबाने बंगनपल्लीला धक्का न लावता फैजला एक मांडलिक राजाचा दर्जा दिला. मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारलेले बंगनपल्लीचे शासक पुढे १७२४ साली हैदराबादच्या निजामाने मोगलांचे आधिपत्य झुगारल्यावर निजामाचे मांडलिक झाले. फैज अलीखानच्या मृत्यूनंतर त्याचा नातू हुसेन अलीखान हा गादीवर आला. हुसेन अलीखानने राज्याला चांगले प्रशासन दिले; परंतु त्याच काळात म्हैसूरचा सर्वेसर्वा हैदरअली हा अधिक प्रबळ झाल्यामुळे हुसेन अलीने निजामाचे मांडलिकत्व सोडून हैदरअलीचे स्वीकारले. पुढे हुसेनचा मुलगा गुलाम मुहम्मद अली याचे टिपूशी संबंध बिघडले असता गुलाम मुहम्मदाने ब्रिटिशांची मदत घेऊन टिपूचा प्रतिकार मोडून १८२२ साली त्याचा मुलगा हुसेन अली द्वितीयला बागनपल्लीच्या नवाबपदी बसविले. याच काळात त्याने ब्रिटिशांशी संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखली. १८२२ मध्ये ब्रिटिशअंकित बागनपल्लीचे राज्यक्षेत्र ७१५ चौ. कि.मी. आणि १९०१ साली लोकसंख्या ३३ हजार होती. नवाब मीर अलीखान याने आपले संस्थान १९४८ साली स्वतंत्र भारतात विलीन केले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com