२८ आक्टोबर १९१८ रोजी अ‍ॅस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातून बाहेर पडून चेकोस्लोव्हाकिया हा प्रजासत्ताक देश अस्तित्वात आला. मासरीक हे या प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष. १९१८ ते १९३५ या त्यांच्या काळात तिथे संसदीय लोकशाही सरकार होते. त्यांनी नवनवीन उद्योगांना प्रोत्साहन देऊन अर्थव्यवस्था मजबूत केली. मध्य पूर्व युरोपातील एक प्रगत देश म्हणून चेकोस्लोव्हाकिया गणला जाऊ लागला. परंतु या राजकीय, सामाजिक स्थैर्य आणि सुबत्तेला ग्रहण लागेल अशा घटना शेजारच्या जर्मनीत या काळात घडल्या. १९३३ मध्ये तिकडे जर्मनीत हिटलर सत्तेवर आला. जर्मन राष्ट्रवादी आणि जर्मन वंशवादी भावनांना त्याने खतपाणी घातले. चेकोस्लोव्हाकियाच्या पश्चिमेकडच्या प्रदेशात जर्मन वंशाच्या लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती व त्यास सूदटेनलॅण्ड म्हटले जाई. सूदटेनच्या या जर्मन लोकांमध्ये लवकरच हिटलरचा नाझीवाद रुजला. या लोकांना हाताशी धरून हिटलरने सूदटेनलॅण्डमधील बोहेमिया आणि मोरावियाचा (हे दोन्ही भाग  चेकोस्लोव्हाकियात होते) मोठा प्रदेश घेऊन तो जर्मनीत समाविष्ट केला. १९३८ साली उर्वरित चेकोस्लोव्हाकियासुद्धा हिटलरच्या पंजाखाली गेला. १९३८ ते १९४५ या काळात चेकोस्लोव्हाकियावर जर्मनीचा अंमल होता. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९४५ मध्ये सोव्हिएत संघाने चेकोस्लोव्हाकियाचा पूर्वेकडचा मोठा प्रदेश रशियात समाविष्ट केला. सोव्हिएत युनियनमधील रशिया आणि पूर्व युरोपातील कम्युनिस्ट प्रभावाखाली आलेल्या देशांच्या गटाला इस्टर्न ब्लॉक असे नाव होते. यालाच सेकंड वर्ल्ड असेही म्हणत. १९४५ नंतर चेकोस्लोव्हाकिया या इस्टर्न ब्लॉकचा एक हिस्सा बनला. १९४८ ते १९९० या काळात या देशात माक्र्सवादी-लेनिनवादी विचार प्रणालीची साम्यवादी प्रजासत्ताक राजकीय व्यवस्था होती. सोव्हिएत युनियनच्या देखरेखीखाली चेकोस्लोव्हाकियातल्या सर्व उद्योगगृहांचे या काळात राष्ट्रीयीकरण आणि शेतीचे सामूहिकीकरण करण्यात आले, सर्व राजकीय विरोधकांचे आवाज दडपून टाकण्यात आले. १९६०च्या दशकात देशाची अर्थव्यवस्था ढासळायला लागल्यावर १९६८ साली स्लोव्हॅक फस्र्ट सेक्रेटरी उबसेक यांनी कार्यपद्धतीत अनेक सुधारणा करून ‘समाजाभिमुख साम्यवाद’ आणला. – सुनीत पोतनीस

unitpotnis94@gmail.com