पहिल्या महायुद्धानंतर रशियन साम्राज्य कोसळले, तसेच ऑस्ट्रो-हंगेरीचे साम्राज्यही कोसळले. यामुळे या दोन्ही साम्राज्यांच्या कब्जात असलेला युक्रेनचा प्रदेश मुक्त झाला. या महायुद्धाच्या धामधुमीत, १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती होऊन तिथे प्रथम समाजवादी क्रांतिकारी पक्षाच्या मेन्शेविक या मवाळ गटाचा नेता केरेन्सी याच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. परंतु सातच महिन्यांनी ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात दुसरी क्रांती होऊन बोल्शेव्हिक या जहाल साम्यवादी गटाचा नेता लेनिन याने हंगामी सरकार बरखास्त करून बोल्शेव्हिकांचे सरकार स्थापन केले. या क्रांतीमागली मार्क्सप्रणीत समाजवादी व्यवस्था अमलात आणू पाहणारी विचारप्रणाली १९१७ नंतर पाच-सात वर्षे इतकी प्रभावशाली होती की या काळात निम्मा युरोप आणि एकतृतीयांश आशियाई प्रदेशात कम्युनिस्ट सरकारे आली! आणि पुढे ३० डिसेंबर १९२२ रोजी रशियाच्या नेतृत्वाखाली अशा कम्युनिस्ट देशांचा संघ, सोव्हिएत युनियन या नावाने स्थापन झाला.

या सर्व घडामोडी जरी रशियाशी संबंधित आणि रशियन भूमीवर घडल्या असल्या तरी त्याचा प्रभाव आणि परिणाम रशियाला लागूनच असलेल्या युक्रेनवर मोठ्या प्रमाणात झाला. महायुद्ध आणि नागरी युद्ध यामध्ये युक्रेनचे हजारो सैनिक मारले गेले होते आणि रशियन साम्राज्यातून मुक्त झाल्यावर आता युक्रेनचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी युक्रेनमध्ये चळवळ सुरू होऊन २३ जून १९१७ रोजी ‘युक्रेनियन पीपल्स रिपब्लिक’चे सरकार स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. परंतु या सरकारच्या घोषणेमुळे युक्रेनच्या पश्चिम आणि पूर्व घटक प्रदेशांमधील सुप्त तेढ उफाळून आली. पूर्वी ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेल्या पश्चिमेकडील पोलंडला लागून असलेल्या युक्रेनी प्रदेशातल्या नेत्यांनी त्यांचे निराळे पश्चिम युक्रेनी ‘पीपल्स रिपब्लिक’ स्थापन केले, तर पूर्व युक्रेनचा मोठा प्रदेश जो रशियात होता तेथील नेत्यांनी तिथे युक्रेनी सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लिक ऊर्फ ‘सोव्हिएत युक्रेन’ स्थापन केले. या दोन सरकारांमधील संघर्ष वाढून गृहयुद्धही झाले. पण उभय नेत्यांनी यावर समझोता करून मार्च १९१९ मध्ये एकीकरणाचा करार करण्यात आला. या करारान्वये पश्चिमेकडील काही प्रदेश पोलंडला तर पूर्वेकडील काही प्रदेश रशियाच्या स्वाधीन केला गेला. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com