16 December 2017

News Flash

कुतूहल : पेशींचा तुलनात्मक आकार

फलित न झालेले किंवा नुकतेच फलित झालेलं अंड हीसुद्धा एकच पेशी असते.

मुंबई | Updated: July 31, 2017 1:24 AM

आकाराने लहान असणाऱ्या जिवाणूंच्या पेशी ह्य़ा आदिकेंद्रकी प्रकारच्या असतात. त्या

एका मिलिमीटरचे जर आपण हजार समान भाग केले तर प्रत्येक भागाला एक मायक्रॉन किंवा मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. १०० मायक्रोमीटरपेक्षा आकाराने लहान असणाऱ्या वस्तू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्या पाहण्यासाठी आपल्याला अर्थातच वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो. डोळ्यांना न दिसणारे अनेक एकपेशीय किंवा बहुपेशीय सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली आढळतात. अशा प्रकारची सूक्ष्म जीवसृष्टी आपल्या अवतीभवती अस्तित्वात आहे हे सर्वप्रथम लुवेनहॉक (१६३२-१७२३) या शास्त्रज्ञानं शोधून काढलं.

आपल्या शरीरातल्या पेशींची लांबी साधारणपणे १० ते १०० मायक्रॉन असते; तर जिवाणूंच्या पेशींची लांबी १० मायक्रॉनपेक्षाही कमी असते. पॅरामेशिअम या सूक्ष्मजीवाची लांबी सुमारे १०० मायक्रॉन असते तरटायफॉइड ज्याच्यामुळे होतो तो ‘साल्मोनेला टायफी’ हा जिवाणू १ ते ३ मायक्रॉन इतक्या आकाराचा असतो. काही पेशींचा आकार याहून बराच लहान किंवा मोठा असू शकतो. ‘मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टीकम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका परजीवी जिवाणूच्या पेशीचा आकार ०.१ मायक्रॉन असतो. ती जगातली सगळ्यात सूक्ष्म पेशी आहे. हा जिवाणू मानव, माकडं इत्यादी प्राण्यांच्या मूत्राशय, आतडं, जननेंद्रिय यामध्ये सापडणारा परजीवी जिवाणू आहे.

फलित न झालेले किंवा नुकतेच फलित झालेलं अंड हीसुद्धा एकच पेशी असते. शहामृगाचे अंडे हे जगातल्या सर्वात मोठय़ा पेशीचं उदाहरण आहे. एखाद्या नारळाएवढं असणारं हे अंड साधारणपणे १८ सेंटिमीटर लांबीचं असतं. ‘कॉलेर्पा टॅक्सिफोलिया’ या नावाने ओळखलं जाणारं एकपेशीय शैवाल पंधरा ते तीस सेंटिमीटर लांबीचं असू शकतं. आपल्या शरीरातील चेतापेशी आकाराने जरी सूक्ष्म असल्या तरी त्यांच्यापासून निघणाऱ्या चेतातंतूची लांबी एक मीटरपेक्षाही अधिक असू शकते.

आकाराने लहान असणाऱ्या जिवाणूंच्या पेशी ह्य़ा आदिकेंद्रकी प्रकारच्या असतात. त्यामध्ये केंद्रक, तंतुकणिका अशा प्रकारची पेशीअंगके नसतात. पण अमिबा, पॅरामेशियमसारखे एकपेशीय सजीव आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पेशी या दृश्यकेंद्रिकी प्रकारच्या आहेत. त्यामध्ये केंद्रक, तंतुकणिका यांसारखी वेगवेगळी पेशीअंगके असतात. या पेशीअंगकांचा आकार साधारणपणे १ ते १० मायक्रॉनइतका म्हणजेच एखाद्या जिवाणूच्या पेशीएवढा असतो.

– प्रिया लागवणकर ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत – नरेश मेहता- काव्यलेखन

हिंदी नवकवितेला रचना, भाषासौंदर्य, प्रतिष्ठा प्रदान करणारे नरेश मेहता हे एक अग्रगण्य कवी आहेत. नऊ काव्यसंग्रह आणि पाच खंडकाव्ये त्यांची प्रकाशित झाली आहेत. १९३६ मध्ये त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. ‘समय देवता’ ही त्यांची हिंदीतील पहिली दीर्घ कविता. त्यातून सर्व मानवाच्या स्थितीबद्दल, सार्वभौम वास्तवाबद्दल आणि साम्राज्यवादाबद्दलची कवीची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. त्यांच्या कविता या त्यांच्यासाठी केवळ अर्थ नसून अनुभव आहेत. त्यांच्या ‘उत्सवा’ (१९७९) या कवितासंग्रहासाठी १९८८ चा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. १९५७ मध्ये ‘बनपारखी सुनो’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.

‘दुसरा सप्तक’ (१९५१)- या अज्ञेय कवींनी संपादित केलेल्या काव्यसंग्रहाचे नरेश मेहता हे पाचवे कवी आहेत. नरेश मेहता आपल्या मागच्या छायावादी तथा रहस्यवादी कवितांना कविताच मानत नाहीत. ते काव्यात प्रयोगशीलतेला महत्त्व देतात. त्यांची कविता परंपरा आणि भूतकाळात रमणारी नाही, तर वर्तमानाचं भान त्यांच्या कवितेत दिसतं. ‘सप्तक’मध्ये मेहतांच्या दहा कविता संकलित केल्या आहेत.

त्यांचा ‘बनपारखी सुनो’ हा पहिला काव्यसंग्रह म्हणजे एक प्रकारचे निसर्गकाव्यच आहे. यात, मेघ, संध्या वर्षां, चांदणं, फूल, फाल्गुन अशा निसर्गातील विविधतेचं कवीप्रती असलेलं आकर्षण व्यक्त झालं आहे. ‘बोलने दो चीडको’ (१९६१) हा ३७ कवितांचा संग्रह आहे, निसर्गाच्या प्रतिसूक्ष्म निरीक्षणशक्तीचा साक्षात्कार घडविणाऱ्या सूर्यास्ताचे चित्रण करताना ते म्हणतात-

‘नील कुहरकी मच्छरदानी

सिर पर लादें चली आ रही

वह पगली बदली बनजारिन्र।’

‘उत्सवा’ (१९७९)- या ३४ कवितांच्या संग्रहाला १९८८ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. उपनिषद आणि वैष्णवतेच्या अनुभूतीचा अपूर्व संगम आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे गौरवपूर्ण दर्शन या कवितात घडते तसेच निसर्गातील विविध रूपांचे रंगच्छटांचे चित्रणही या कवितांत कवीने केले आहे. ‘आरण्या’ (१९८५)- या ३३ कवितांच्या संग्रहातील १७ कवितांत काव्य, काव्याचा हेतू, काव्याचे स्वरूप, काव्याची भाषा हेच काव्याचे विषय बनले आहेत.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com

First Published on July 31, 2017 1:24 am

Web Title: comparative size of cells