डॉ. श्रुती पानसे

कोणतीही दोन मुलं सारखी नसतात. एकाच वयाची असली तरी, सख्खी भावंडं आणि जुळी भावंडं असली तरी एकसारखी नसतात. प्रत्येकाला स्वतंत्र अनुभव येतात, त्याप्रमाणे त्यांच्या मेंदूची जडणघडण होत असते. आणि त्यामुळे दोन मुलांमध्ये कधीही तुलना करू नये हे आपल्याला माहीत असतं. पण तरीही तुलना केली जाते.

समाजमाध्यम हे काही वेळा फार चांगलं माध्यम आहे. पण सध्या काही पालकांच्या दृष्टीने हेच अस्वस्थतेचं कारण बनू पाहतंय. असं अनेकदा दिसतं की जिथे पालकांना स्वत:च्या मुलांचे दोषच दोष आणि इतरांच्या मुलांचे गुण सतत दिसत असतात. आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी पालक लहानग्यांशी संबंधित पोस्ट टाकतात आणि ती बघून आपल्या मुलाशी त्या मुलांची तुलना करण्याचा मोह पालकांना आवरत नाही.

लहान मुलांना याचं कारण समजत नाही की आपल्यावर अशा अचानक राग का निघतो आहे? इतरांची उदाहरणं का दिली जाताहेत? आपल्या मुलांचे अंगभूत गुण सुधारण्यासाठी त्याला खतपाणी घालणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्यावरून दोन मुलांमधे तुलना करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.

अशी तुलना करताना पालक काय शब्द वापरतात हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण यामुळे अनेकदा ज्या मुलांचं कौतुक  होतं, त्यांच्यातली मूळ कौशल्यं, त्यासाठी असलेली बुद्धीची चमक किंवा घेतलेली मेहनत या गोष्टी गौण राहतात आणि पालकांमुळे मुलांच्या मनात एक प्रकारची स्पर्धेची किंवा ईष्रेची भावना तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रभावना. ही अत्यंत सकारात्मक भावना आहे. पण पालकांमुळे ही भावना चांगल्या प्रकारे निर्माण होत नाही. या भावना प्रगतीकारक नाहीत. मुला-मुलींनी चांगलं काही करावं यासाठी सकारात्मक पद्धतीने प्रेरणा द्यायला हव्यात. तर अयोग्य शब्द वापरून  तुलना करणं ही निश्चितच नकारात्मक प्रेरणा आहे.

कारण दुसऱ्यांची नक्कल करून मोठं होता येत नाही तर आपल्यातल्या गुणांची ओळख पटली तर मुलांमधल्या खऱ्याखुऱ्या गुणांना योग्य न्याय मिळेल. पालकांना हव्या त्या दिशेला मूल वळत नसेल तर त्याचा प्रवाह त्यांनीच शोधावा यासाठी प्रोत्साहन आणि खरं सांगायचं तर तेवढं मोकळेपण मिळायला हवं.

contact@shrutipanse.com