डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

जगात सर्वत्र एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे. आपण मागे पडता कामा नये, आपली चिमुकली मुलंही मागे पडू नयेत, यासाठी काही पालक भयंकर सजग असतात. आपल्या लहानग्यांचा प्रत्येक क्षण चतुराईनं वापरायचा, असं ते ठरवून टाकतात. मुलांचा रिकामा वेळ डोळ्यांत खुपायला लागतो.

असे आई-बाबा मुलांना सतत उपक्रमांमध्ये अडकवून ठेवतात. शाळा, क्लासेस्, छंदवर्ग.. सतत शिकायला पाठवायचं. एक क्लास झाल्यावर दुसरा क्लास! असं मुलांचं सुरू असतं. सगळीकडे सोडायला-आणायला पालक स्वत: वेळ काढतात किंवा काही ना काही व्यवस्था करतात.

बेतून दिल्याप्रमाणे, म्हणजेच या क्लासला जाऊन मुलांना कंटाळा येत असेल, ते त्या क्लासमध्ये रमत नसेल, तर ‘असं का?’ असा प्रश्न पालकांना पडतो. कंटाळा आल्यामुळे मूल अशा ठिकाणी जायला नाही म्हणालं, तिथं जायचं टाळून घरात खेळत राहिलं, तर आपल्याच मुलांमध्ये काहीतरी समस्या आहे असं मनापासून वाटणारे कित्येक पालक आहेत. यामुळे या ‘स्पर्धाग्रस्त’ पालकांचं रूपांतर ‘समस्याग्रस्त’ पालकांमध्ये होतं. आपलं मूल छान, हसरं, खेळकर आहे यावर त्यांचा विश्वास नसतो. उलट, त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं वाटत राहतं, तेही उगाचच.

मुलांचं हे खरंच विचित्र वागणं आहे का?

ते लहान मूल आहे, त्यालाही कंटाळा येऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. ते कायम सुतासारखं सरळ वागणार नाही. त्याला त्याच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांनी कधी ‘नाही’ म्हणायचंच नाही का? याउलट, असं म्हणता येईल की, अनेकदा पालकांच्या अशा स्पर्धाग्रस्त आणि समस्याग्रस्त वागण्यामुळे आणि त्यांनी केलेल्या अतिरिक्त काळजीमुळे मुलांवर वेगळाच परिणाम होत असतो.

मूल त्याच्या वयोगटानुसार व्यक्त होत असतं. त्याला आई-बाबांच्या मांडीवर झोपायचं असतं, म्हणून मूल कायम पालकांना चिकटून राहणार आहे का? यामुळे मूल जगाच्या स्पर्धेत लगेच मागे पडणार आहे का? दिवसभर कुठे कुठे फिरणाऱ्या मुलांना आई-बाबांचा सहवास हवा असतो, स्पर्श हवा असतो. आपल्यावर आई-बाबांचं फार प्रेम आहे, ही भावना मुलांना हवी असते. केवळ यामुळे मुलांच्या मेंदूत ‘ऑक्सीटोसिन’ तयार होतं. यातूनच प्रेम आणि सुरक्षिततेची शिदोरी मिळते. यावरच मुलांचं भावनिक संतुलन अवलंबून असतं.