संगणकाच्या पडद्याची रुंदी आणि उंची यांच्यात एक ठराविक प्रमाण असतं, त्याला अ‍ॅस्पेक्ट रेशो म्हणतात. मात्र या पडद्यांचं मोजमापन त्याच्या कर्णाच्या लांबीवरून करतात – १४ इंच, २० इंच असं. हे एकच माप आणि अ‍ॅस्पेक्ट रेशो वापरून संगणकाच्या पडद्याची प्रत्यक्ष रुंदी आणि उंची सहज मिळू शकते.

संगणकाच्या पडद्यावर दिसणारी अक्षरं पिक्सेलच्या स्वरूपात असतात. एखाद्या आकृतीतला किंवा चित्रातला सर्वात लहान घटक म्हणजे पिक्चर एलिमेंट किंवा पिक्सेल. पडद्याचं रेझोल्यूशन म्हणजे त्याच्यात किती पिक्सेल बसू शकतात याचं मोजमाप. सुरूवातीचे पडदे ६४० ७ ४८० रेझोल्यूशनचे होते. ते रुंदीत ६४० आणि उंचीत ४८० पिक्सेल दाखवू शकत(अ‍ॅस्पेक्ट रेशो ४:३). रेझोल्यूशन जास्त असेल तर पडद्याच्या रुंदी-उंचीत जास्त पिक्सेल बसतात आणि अक्षरं अधिक रेखीव दिसतात.

जास्त रेझोल्यूशनचे आणि अनेक रंगछटा दाखवू शकतील असे पडदे कमी किंमतीत उपलब्ध व्हायला लागल्यावर संगणकावर चित्रंही उत्तम उमटायला लागली. आज सर्वसाधारण लॅपटॉपमध्ये

१३६६ ७ ७६८ रेझोल्यूशन असतं, ज्याला एचडी – हाय डेफिनिशन म्हणतात, आणि त्याचा अ‍ॅस्पेक्ट रेशो असतो १६:९. त्याच अ‍ॅस्पेक्ट रेशोमध्ये फुल एचडी परिणाम हवा असेल तर १९२० ७ १०८० म्हणजे टू-के रेझोल्यूशनचे पडदेही सहज मिळतात. ग्राफिक्सवर काम करणारे आणि गेिमगची आवड असणारे यांचं मात्र एवढय़ाने समाधान होत नाही. त्यांना ३८४० ७ २१६० रेझोल्यूशनचे अल्ट्रा हाय डेफिनिशन म्हणजे फोर-के पडदे लागतात, आणि त्यांची भरपूर किंमत मोजायला ते तयार असतात. विडिओदेखील अशा पडद्यांवर सुरेख दिसतात.

पडद्याचं रेझोल्यूशन आणि आकार यानुसार पिक्सेलचा प्रत्यक्ष आकार ठरतो. एखाद्या मोठय़ा ५० इंची पडद्याला संगणक जोडला, तर त्यावर एचडी रेझोल्यूशन चित्रातला एक-एक पिक्सेल आपल्याला सुटासुटा दिसेल. उलट मोबाईलच्या ५ इंची पडद्यावर याच एचडी रेझोल्यूशनमधला प्रत्येक पिक्सेल अत्यंत छोटा झाल्याने आणि दोन पिक्सेलमधील अंतरही कमी झाल्याने आपल्या डोळ्यांना जास्त रेखीव चित्र दिसेल. याच कारणाने मोबाईलवर एचडी आणि फोर-के यात फार फरक वाटत नाही. लॅपटॉप / टॅबवर मात्र हा फरक डोळ्यांना जाणवण्याइतका असतो.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

वेदना जाणणारी कल्पनाशक्ती..

२००८ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात अखलाक मोहम्मद खान – ‘शहरयार’  यांनी आपले विचार मांडले. ते म्हणतात- ‘माणसाची भौतिक प्रगती ही आध्यात्मिक प्रगतीपासून दूर राहू न देण्याची खबरदारी प्रत्येक काळात माणसाने घेतलेली आहे. याला इतिहास साक्षी आहे. या दोन्हीत संतुलन राखण्याचे अवघड काम साहित्य आणि ललित कला आपल्या रीतीने करीत आलेल्या आहेत. ज्ञानपीठ ही संस्थाही हे कार्य अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून गेली ७० वर्षांपासून करते आहे- ही गोष्ट निश्चितच प्रशंसनीय आहे. भारतातील हा सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार आहे. ज्या थोर साहित्यिकांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याबरोबर आता माझेही नाव जोडले जात आहे- याचा मला अभिमान वाटतो आहे.

भौतिक प्रगतीबरोबरच साहित्य आणि ललित कलांचा सन्मान झाला तरच एखाद्या समाजासाठी ती महत्त्वाची बाब ठरते आणि हे लक्षात घेऊनच भौतिक प्रगती होत असताना मानव आणि मानवतावादी मूल्यांचे महत्त्व ज्ञानपीठ ट्रस्टने लक्षात घेतलेले दिसते.

साहित्य मानवाच्या भावनांना शब्दरूप देते. त्यामुळेच माणसाचे भविष्य उज्ज्वल होते. परमेश्वराची कृपया आहे की, आम्ही अशाच जगात जगतो आहोत की, जिथे आपल्या कल्पनाशक्तीने एक माणूस दुसऱ्याच्या व्यथा, वेदना जाणू शकतो आणि साहित्यिक या नात्याला कसे शब्दरूप देतात हे आपण जाणतोच. यामध्ये थोडा फार का होईना, माझाही हातभार लागला याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो आहे आणि या कार्यात ज्ञानपीठही सहभागी आहे याबद्दल त्यांना खास धन्यवाद. सत्यम्, शिवम आणि सुंदरमचा गाभा असलेले हिंदुस्थानातील साहित्य सर्वार्थाने बहरत आहे, त्याविषयी बोलू तेवढं कमीच आहे. पण मी एवढंच म्हणेन की,

एक ही धुन है कि इस रात को ढलता देखूँ।

अपनी इस आँखों से सूरज को निकलता देखूँ।

कला ही या दुनियेला सुंदर आणि समर्थ बनवते आणि मीही यामध्ये सामील आहे.

परमेश्वराकडे माझं एवढंच मागणं आहे की, जिवंत असेपर्यंत माझ्या हातून हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून होत राहू दे. यासाठी आपण सर्वजणही प्रार्थना करा.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com