07 December 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : चूक कबूल!

आपल्या लक्षात आलं की, आपल्या हातून काही तरी चूक झालेली आहे, तर आपण स्वत:च कबूल करून टाकणं जास्त योग्य असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

हातून एखादी चूक होऊन जाणं म्हणजे नक्की काय असतं? मेंदूच्या भाषेत बोलायचं तर अनवधानाने झालेली गफलत. योग्य ठिकाणी कदाचित पुरेसं लक्ष न दिल्यानं योग्य कृती झाली नाही. लक्ष दिलं नाही, तिथं अवधान (अटेन्शन) गेलं नाही म्हणून घडून येते ती चूक.. गोंधळ.

अशा चुका प्रत्येकाकडून वारंवार होत असतात. चूक होऊ  नये, याची खबरदारी घ्यायची असते. पण चूक झालीच तर?

आपल्या लक्षात आलं की, आपल्या हातून काही तरी चूक झालेली आहे, तर आपण स्वत:च कबूल करून टाकणं जास्त योग्य असतं. पण हे कित्येकांना जमत नाही. त्यांना चूक मान्य नसते. काहींना अवघड वाटतं, तर काहींना त्यात कमीपणा वाटतो. काही जण चुकांवर पांघरूण घालायला जातात. काही तरी सारवासारवी करायला जातांत. यातून अजूनच गुंतागुंत निर्माण होते. काही जण तर स्वत:च्या चुका कबूल न करता उलट माझंच कसं बरोबर, हे सांगायला लागतात.

अशा वेळी आपण मूळ प्रश्नापासून बरेच लांब चाललो आहोत, हे लक्षात येत नाही. कारण चूक कशी लपवायची, याचा विचार मेंदू करायला लागल्यामुळे, ती सुधारायची कशी हे त्याला कसं सुचणार? कारण मेंदू एकावेळी एकच विचार करू शकतो.

असं कसं झालं? का झालं? माझ्या हातून असं झालंच कसं? नुकसान किती झालं? कोणाचं झालं? अशा प्रश्नांच्या गर्तेत राहून तेच तेच विचार मनात घोटाळत राहतात. त्यापेक्षा जे घडून गेलं आहे, त्याच्यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असते.

खरं तर, स्वत:च्या चुका मान्य करायच्या असतील तर धाडस असावं लागतं. एकदा का धाडस एकवटून चूक कबूल केली, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचा ताण जातो. हलकं वाटायला लागतं. जे काही समोर वाढून ठेवलेलं आहे, त्याला सामोरं जायची हिंमत येते. ‘कॉर्टिसॉल’ हे ताणकारक रसायन काहीही बरं सुचू देत नाही आणि मार्ग काढण्यासाठी डोकं शांत ठेवण्याची गरज असते. हे काम ‘ऑक्सिटोसिन’ हे रसायन करायला घेतं. याचा परिणाम म्हणजे-जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडवण्याचा तार्किक विचार मेंदू करायला लागतो. हेच तर त्याक्षणी सर्वात आवश्यक आहे.

contact@shrutipanse.com

First Published on October 21, 2019 12:09 am

Web Title: confess the mistake brain article abn 97
Just Now!
X