डॉ. श्रुती पानसे

माणसांना बोलता येतं. पण काही वेळा नक्की काय बोलायचं, याचा मेंदूमध्ये गोंधळ उडतो. शब्द सापडत नाहीत. योग्य अर्थ व्यक्त होईल असे शब्द त्यावेळी आठवत नाहीत. अक्षरओळख असते, वाचता येतं; पण आपण काय वाचत आहोत, याचा अर्थ नेमकेपणानं समजतोच असं नाही. इतरांचा चाललेला संवाद न समजणं, वाचन/वाचलेल्या मजकुराचा अर्थ न लागणं, अंक न समजणं अशा गोष्टी यामुळे घडून येतात. याचा माणसाच्या बुद्धिमत्तेशी काही संबंध नाही. अत्यंत बुद्धिमान माणसाला- ज्याला नव्या कल्पना सुचतात, जो त्याच्या कामात अव्वल आहे, अशा माणसालाही ही समस्या असू शकते.

काय बोलायचं आहे, हे माहीत आहे; पण शब्दांची योग्य क्रमाने जुळवाजुळवी होत नाही. त्यामुळे इतरांशी संवाद साधता येत नाही. काही वेळा प्रत्येक गोष्टीचा शब्दश: अर्थ घेतला जातो. लक्ष्यार्थ समजत नाही. माणसाला व्यवस्थित भाषा येत असते. शब्दसंपत्तीही मेंदूत साठवलेली असते. पण तरीही शब्दांशी झगडा चालू असतो. अशा माणसांना बोलण्यासाठी वेळ लागू शकतो. ते शब्द शोधत असतात. काही वेळा अर्थाचा अनर्थ होईल असेही शब्द तोंडातून बाहेर पडल्यामुळे आणि समोरच्याचा गोंधळ उडाल्यामुळे पुढच्या वेळेला ही माणसं फार जपून बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला वेग राहत नाही.

अनेकदा याचं कारण ताण हे असतं. मेंदूतल्या हिप्पोकॅम्पसमध्ये स्मरणात असलेले शब्द + वर्निक क्षेत्रात घडणारं आकलन + ताणरहित अवस्था म्हणजे अमिग्डालातल्या सर्व भावनांचं योग्य प्रकारे संतुलन. एवढय़ा किमान गोष्टींनी एकत्र येऊन नीट काम करणं आवश्यक असतं. बोलणं, गप्पा मारणं, आठवणीत रमणं, भाषण करणं, सूत्रसंचालन करणं, शिकवणं, वादविवाद घडणं ही सर्व संवादाची साधनं आहेत. संवादासाठी मेंदूतली बरीच क्षेत्रं एकत्र येऊन काम करत असतात. यातल्या एका जरी भागात लहानशा समस्या आल्या, तरी माणसांना योग्य पद्धतीनं बोलता येत नाही.

पण काही वेळा गोष्टी फारच गुंतागुंतीच्या होतात. तेव्हा वैद्यकीय भाषेत याला ‘एफेशिया’ असं म्हणतात. विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये ही समस्या येऊ लागते. ही एक प्रकारची ‘कम्युनिकेशन डिसॉर्डर’ आहे. मेंदूची समस्या आहे.

contact@shrutipanse.com