वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय धर्य व शौर्य दाखविणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती अथवा संस्थेला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी कोणत्याही वयोमर्यादेची अट नाही.

राजस्थानातील जोधपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेजडली गावात १७८७ साली अमृतादेवी बिष्णोई यांच्या नेतृत्वाखाली बिष्णोई समाजातील ३६३ पुरुष, महिला आणि लहान मुलांनी झाडांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या अमृतादेवी बिष्णोई यांच्या स्मरणार्थ वने आणि वन्यजीवांच्या  संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना या पुरस्कारने सन्मानित केले जाते.  झाडे वाचवण्यासाठी १९७३ साली झालेल्या ‘चिपको आंदोलना’ची प्रेरणा अमृतादेवींच्या याच लढय़ातून घेण्यात आली होती.

बिष्णोई समाज पर्यावरणावर अतोनात प्रेम करणारा समाज असून वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो. पर्यावरण संरक्षणात या समाजाचं योगदान मोठं आहे. या समाजाचे लोक जात-पात-धर्म याच्यावर विश्वास ठेवत नाहीत.  एवढेच काय तर या समाजातील महिला हरिणाच्या पाडसांना आपल्या मुलांप्रमाणेच मानतात.

बिष्णोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्त्वे. या २९ बाबींचे पालन करणारा हा समाज बिष्णोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदारदेखील होते. ते मागे हटले नाहीत आणि तो ही केस हरला.  निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही या समाजाने आपली आद्य कर्तव्ये मानल्यानेच राजस्थानसारख्या शुष्क वाळवंटातील जैवविविधता (जीविधता) अबाधित ठेवण्यात या समाजाचा मोलाचा वाटा आहे.

– मनीष वाघ मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org