News Flash

बायझंटाइन.. कान्स्टंटिनोपल.. इस्तंबूल

जगाच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शहर अशी ओळख आहे

गेटवे ऑफ युरोप, तुर्कस्थानाची आíथक आणि सांस्कृतिक राजधानी, आशिया आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये वसलेले एकमेव शहर, जगाच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शहर अशी ओळख आहे बास्फरस सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या इस्तंबूलची. जगातील सर्वप्रथम वसलेल्या पुरातन शहरांपकी एक असलेल्या इस्तंबूलच्या परिसरात इ.स.पूर्व ७००० मध्ये मानवी वस्ती होती असे उत्खननातून सिद्ध झाले आहे. सुमारे इ.स.पूर्व ५०००च्या आसपास इथे पाडय़ांच्या स्वरूपात लोकांनी वसती केली. याचाच अर्थ आजपासून मागे, सात हजार वर्षांपूर्वी इस्तंबूल वसले असे म्हणता येईल. रोमन साम्राज्यात हा प्रदेश आल्यावर कॉन्स्टंटाइन द ग्रेट या सम्राटाने इस्तंबूलला प्रथम एका गावाचे स्वरूप दिले. इस्तंबूलवर झालेल्या प्रत्येक सत्तांतरात ते शहर त्या साम्राज्याची राजधानी राहिले. इथे झालेल्या सत्तांतरात रोमन साम्राज्य, पूर्व रोमन ऊर्फ बायझंटाइन साम्राज्य, लॅटिन साम्राज्य आणि ओटोमन साम्राज्य अशा विविध सत्तांचा अंमल झाला. इ.स.पूर्व ६८० मध्ये ग्रीसमधील मेगॅरियन वंशाचे लोक इथे येऊन त्यांनी सध्याच्या इस्तंबूलच्या ठिकाणी वसती केली, तिचे नाव बायझंटाइन. लवकरच इथे व्यापारामुळे भरभराट होऊन बायझंटाइन ही ग्रीकांची एक भरभक्कम वसाहत झाली. पुढे काही काळ अलेक्झांडरचाही इथे अंमल होता. इ.स.पूर्व १४६ ते इ.स. ३९५ या काळात बायझंटाइन आणि आसपासचा प्रदेश पश्चिम रोमन साम्राज्यात होता. पुढे ३९५ ते १४५३ या काळात मधली अडीचशे वष्रे वगळता बायझंटाइनवर पूर्व रोमन साम्राज्याची सत्ता होती. रोमन सम्राट कान्स्टंटाइन प्रथम याने बायझंटाइन येथे आपली राजधानी केली. तेव्हापासून पूर्व रोमन साम्राज्य बायझंटाइन साम्राज्य म्हणून ओळखले गेले. बायझंटाइन शहराचे नाव सम्राट कॉन्स्टंटाइनने बदलून कॉन्स्टंटिनोपल केले. कॉन्स्टंटाइनच्या कारकीर्दीत कॉन्स्टंटिनोपल हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून उदय पावले. सम्राट स्वत: ख्रिस्ती धर्माचा पुरस्कर्ता होता. ख्रिश्चन धर्मप्रसाराचे कार्य करून त्याने सुप्रसिद्ध सेंट सोफिया चर्चचे बांधकाम केले. या काळात बायझंटाइन या मूळच्या रोमन शहराचे रूपांतर कॉन्स्टंटिनोपल या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन राजधानीत झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

महामार्गाच्या दुभाजकांवर झाडे

पूर्वीच्या काळी रस्त्याच्या बाजूने वाटसरूंना सावली आणि काही प्रमाणात फळे मिळावीत म्हणून झाडे लावलेली असत. वज्रेश्वरीला जाणाऱ्या जुन्या रस्त्यालगत आंबा, जांभूळ, चिंच, भोकर, पापडी, करंज, भेंड असे जुने वृक्ष अंतराअंतरावर वाढवलेले १९९० च्या एका सर्वेक्षणात नोंदवले गेले आहे. वसईकडे जाणाऱ्या पेशव्यांच्या घोडदळाला क्षणभर विश्रांतीसाठी या वृक्षांचा आसरा घेता आला असणार.

आता मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरून दिवसाला हजारो वाहने पेट्रोल-डिझेल जाळून वायुप्रदूषण करीत धावताना दिसतात. आदर्श महामार्ग प्रशासनात या महामार्गाच्या बाजूने वृक्षांचे २-३ थर लावलेले असतात. ज्यामुळे महामार्गाच्या बाजूची वस्ती, शेती, वने, बागायती यांचे रक्षण अपेक्षित असते. वाहतुकीच्या सुरक्षेसाठी महामार्गाना दुभाजक असतात. त्यांवर वाहन-सुरक्षा सांभाळून कशी व कोणती झाडे लावावीत यावर वन-पर्यावरण मंत्रालयात विचार चालू होता. त्या मंत्रालयाने एक राष्ट्रीय प्रकल्प देशातील सहा संशोधन केंद्रांत १९८५ मध्ये पुरस्कृत केला होता, त्या प्रकल्प-संशोधकांत पुढील विचारमंथन झाले- उजव्या बाजूला वाहनचालक असणारी आपली वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवतात. सर्व वाहनांतून निघणारा धूर उजव्या बाजूस फेकला जातो. मार्गाच्या दुभाजकावर जास्तीत जास्त धूर पडतो. तो प्रदूषित धूर सहन करणारी आणि १.५ ते २ मीटर उंचीपर्यंतच वाढणारी झाडे कोणती? देशांतील अनेक प्रकारच्या झाडांचे निरीक्षण आणि प्रयोग यांच्याद्वारे अशी झाडे ओळखता आली. त्यांपकी अनेकांत एक समान गुण आढळला, तो म्हणजे त्या झाडांच्या पानात, देठात, डहाळीत दुधासारखा द्रवपदार्थ (लाटेक्स) होता. हे समजल्यावर लाटेक्स असणाऱ्या आणखी झाडांवर वाहनांचा धूर टाकून अभ्यास करण्यात आला. प्रदूषण सहन करणाऱ्या झाडांची यादी पर्यावरण मंत्रालयाकडे प्रकल्पाद्वारे सादर झाली. मंत्रालयाने ती यादी प्रसृत केली. महामार्ग प्राधिकरणाने मिळालेल्या सूचनेप्रमाणे झाडे लावली.  आज आपल्याला ही झाडे मुंबई-पुणे, मुंबई-अहमदाबाद, दिल्ली-जयपूर, दिल्ली विमानतळ-दिल्ली शहर येथील मार्गाच्या दुभाजकांवर दिसतील. पुढील प्रवासात जरूर लक्ष देऊन बघा. कण्हेर, तगर, पांढरा चाफा, बिट्टी, रुई ही झाडे आणि त्यांच्या संगतीला शोभेसाठी बोगनवेल, शंखासुर इत्यादी झाडे दिसतील.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:25 am

Web Title: constantinople istanbul gateway of europe and byzantium
Next Stories
1 ब्रसेल्सची ऑड्रे हेपबर्न
2 ब्रसेल्स
3 खाऱ्या जमिनीवर उत्पादन
Just Now!
X