News Flash

कुतूहल : शिक्षणप्रवाह अखंड राहो! 

ऑनलाइन पद्धतीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे शिक्षक-विद्यार्थ्यांमधील संवाद कमी होत चालला आहे.

कुतूहल : शिक्षणप्रवाह अखंड राहो! 

कोविड-१९ चे आलेले संकट सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेले. परंतु ‘द शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने शिक्षण सुरू राहावे म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान नाकारता न येणारेच.

२०१९ साली नुकत्याच रुजलेल्या ऑनलाइन पद्धतीने २०२१ सालापर्यंत सुबक आकार घेतला. सदर काळात या पद्धतीचे फायदे-तोटेसुद्धा लक्षात आले. विद्यार्थी व शिक्षकही अभिनव पद्धतीशी जुळवून घ्यायला धडपडत होते. गणिते फळ्याशिवाय कशी सोडवावी, हा प्रश्न बऱ्याच शिक्षकांना पडला होता. काहींनी युक्ती लढवून कागदावर गणिते सोडवून दाखवण्याचा प्रयोग केला, तर काहींनी व्हाइटबोर्डसारख्या साधनांचा वापर करून मोबाइल फोनवर तास घेतले. काही शाळा-महाविद्यालयांनी आपल्या शिक्षकांकरिता पेन टॅब्लेट्स उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे शिकवणे सोपे झाले.

सुरुवातीच्या काळात खूप अवघड वाटणाऱ्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने थोडय़ा सुकर झाल्या तरी आणखी अनेक छोटेमोठे अडथळे पार व्हायचे आहेत. शाळांमध्ये कदाचित वर्गसंख्या २०-३० विद्यार्थ्यांची असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे सोपे नसले तरी निदान शक्य आहे. परंतु महाविद्यालयात, एका तासाला वर्गात कमीत कमी १०० ते १५० विद्यार्थी ऑनलाइन असल्याने ते शक्यच नाही. प्रत्यक्ष शिक्षणातही प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नसले, तरी निदान अधिकाधिक मुलांना समजले आहे किंवा नाही हे वर्गात सहज लक्षात येते. ऑनलाइन पद्धतीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे शिक्षक-विद्यार्थ्यांमधील संवाद कमी होत चालला आहे. एका वेळी १०००-१२०० मुलांची परीक्षा ऑनलाइन घेणे हा दुसरा मोठा अडथळा अनुभवास आला आहे. त्यात गणितासारख्या विषयाला ‘दिलेल्या पर्यायांतून एक निवडा’ (एमसीक्यू) पद्धतीने पडताळण्याची कसोटी गुणांच्या दृष्टीने जरी विद्यार्थ्यांना सोयीची असली तरी, नवनिर्मिती करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाला मारक आहे.

असे असले तरी ऑनलाइन पद्धत काहींसाठी वरदान ठरली. जे विद्यार्थी वर्गात सहसा अबोल होते त्यांना ‘चॅट’द्वारे का होईना वाचा फुटली. तासानंतर नोट्स अपलोड करण्याच्या सोयीने, प्राध्यापक शिकवतात ते उतरवून घेण्यापेक्षा समजून घेण्याकडे कल वाढला. त्याशिवाय, अगदी पुण्यापासून पॅरिसपर्यंत कुठल्याही महाविद्यालयाची वेब-कार्यशाळा अनुभवायची संधी सहज चालून आली. ‘फ्लिप्ड क्लासरूम’सारख्या नव्या अध्यापन पद्धती अवलंबण्यास शिक्षक आणि शिक्षण देणाऱ्या विविध अंकीय स्वयंघटकांचा (मॉडय़ूल्स) उपयोग करण्यास विद्यार्थी सक्षम झाले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करताना तंत्रज्ञानाच्या वापराची प्रत्यक्ष संवादाला जोड देऊन विद्यार्थ्यांना गणित अधिकाधिक आवडो याचा प्रयत्न करू या.

– प्रा. सई जोशी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2021 2:37 am

Web Title: contribution of teachers and non teaching staff in education during covid 19 period zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : युक्रेन
2 कुतूहल –  कृतिशील गणित शिक्षण
3 नवदेशांचा उदयास्त : स्लोव्हाकिया
Just Now!
X