18 January 2019

News Flash

कुतूहल : ताम्रयुग

आदिकालापासून मानवाने जे धातू वापरले त्यात तांब्याचा समावेश होता.

आवर्तसारणीतील २९ अणुक्रमांकाचे तांबे हे मूलद्रव्य क्युप्रम, लाल धातू किंवा ताम्र अशा विविध नावाने ओळखले जाते. हा संक्रमण धातू कमालीचा विद्युतवाहक आणि उष्णतावाहक आहे.

मानवी इतिहासात तांब्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. आदिकालापासून मानवाने जे धातू वापरले त्यात तांब्याचा समावेश होता. अश्मयुगात मानवाने हत्यारे व भांडी बनवण्यासाठी दगडाचा वापर केला. अश्मयुगाच्या शेवटी तांब्याचा शोध लागला आणि तांब्याच्या वर्धनीयता (ठोकल्यावर प्रसरण पावणे) या गुणधर्मामुळे दगडाऐवजी या धातूचा वापर करायला सुरुवात झाली. अशाप्रकारे वापरला गेलेला तांबे हा पहिलाच धातू.

तांब्याच्या या उपयुक्ततेमुळे नैसर्गिक तांब्याच्या साठय़ांचा शोध सुरू झाला. इ.स.पू. ६०००च्या सुमारास उष्णतेने तांबे वितळते व त्याला पाहिजे तो आकार देण्यात येतो, असा शोध लागला. इथूनच धातू विज्ञानाला सुरुवात झाली आणि म्हणून हा काळ ताम्रयुग म्हणून ओळखला जातो. यानंतर तांबे आणि कथिल यांचे मिश्रण करू नकास्य (bronze) तसेच तांबे व जस्त एकत्र करून पितळ (brass) हे उपयुक्त असे मिश्रधातू बनवण्यात आले. इ.स.पू. ६०० मध्ये तांब्याची नाणी चलनात आली आणि तांबे हे मूलद्रव्य नाणी-धातू (coinage metal) म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

काही वर्षांपूर्वी तांब्या-पितळेची भांडी वापरणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. वाढत्या किमतीमुळे तांब्याच्या भांडय़ांची जागा स्टील, अ‍ॅल्युमिनिअमने घेतली. तांब्याचा हवेशी संपर्क झाल्याने होणाऱ्या ऑक्सिडेशनमुळे येणारा हिरवट रंग या समस्येमुळेही ही भांडी वापरणे मागे पडले. आता पुन्हा एकदा तांब्याच्या उष्णता सुवाहकता गुणधर्मामुळे तळाला तांब्याचा लेप असलेल्या भांडय़ांचा वापर सुरू झाला आहे. आयुर्वेदात तांब्याचे महत्त्व वर्णिले असल्यानेही तांब्याची भांडी उपयोगात आणली जातात.

दैनंदिन वापरात जरी ही भांडी मागे पडली असली तरी शोभेच्या वस्तू म्हणून तांब्या-पितळेच्या भांडय़ांनी घरात तसेच महागडय़ा हॉटेलमध्ये आपली एक स्वतंत्र जागा बनवली आहे. या वस्तूंमध्ये पाणी तापवण्यासाठीचे तांब्याचे बम्ब, आंघोळीसाठी घंगाळी, हंडे, पातेली, कळशा, पराती यांचा समावेश होतो.

चांदीनंतर तांब्याचा विद्युतवाहकतेमध्ये दुसरा क्रमांक लागतो. तांब्याचा वापर विद्युततारा बनवण्यासाठी, उष्णतेवर चालणाऱ्या उपकरणामध्ये तसेच अभियांत्रिकी उद्योगात व सोन्यात काठिण्य आणण्यासाठी त्याचा सर्रास वापर केला जातो.

जोत्स्ना ठाकूर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on May 15, 2018 2:38 am

Web Title: copper chemical element