18 July 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : सहसंबंधित स्मृती

याउलट, एका सत्य घटनेत एका डिझायनरकडे एका पुस्तकाच्या डिझाइनचं काम आलं होतं

(संग्रहित छायाचित्र)

समजा ‘अ’ गटात एखादी इमारत, विशिष्ट प्रकारचा वास, कोण्या व्यक्तीचा वैशिष्टय़पूर्ण चेहरा, एखादा आवाज, गाण्याची लकेर असेल. ‘ब’ गटात भीती, आनंद, दु:ख, अस्वस्थता, उत्साह अशा काही भावना असतील. ‘अ’ गटाचा ‘ब’ गटाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. तरीसुद्धा ‘अ ’ गटापैकी कोणतीही गोष्ट समोर आली किंवा आठवली की ‘ब’ गटातली एखादी भावना मनात आपोआप जागृत होते.

अशी वेगळीच भावना आत्ता मनात का निर्माण झाली हे कित्येकदा पटकन लक्षात येत नाही. मात्र तशी परिस्थिती समोर आली की प्रत्येक वेळेला तीच भावना मनात दाटून येते. जरा शोधलं की लक्षात येतं, या भावनेच्या मुळाशी वरीलपैकी एखादी अ गटातली परिस्थिती कारणीभूत आहे. मग या परिस्थितीचा शोध घेतला तर कदाचित एखादी जुनीपुराणी प्रत्यक्ष घडलेली घटना आठवेल, कदाचित एखाद्या सिनेमातलं दृश्य किंवा पुस्तकात वाचलेला प्रसंग मनात रुतून बसलेला आहे हे सापडेल. यापैकी काहीही समोर आलं किंवा नुसतं आठवलं तरीसुद्धा मनात आपोआप त्याच्याशी संबंधित भावना निर्माण होते.  उदाहरणार्थ, रोजचं काही काम करत असताना अचानक उत्साह येतो. उत्साह येण्यासारखं काहीही घडलेलं नसतं. मग हा उत्साह आला कुठून? पाच मिनिटांपूर्वी खिडकीबाहेरून आवडतं गाणं ऐकू आलं होतं, त्यामुळे हा उत्साह आला आहे.

याउलट, एका सत्य घटनेत एका डिझायनरकडे एका पुस्तकाच्या डिझाइनचं काम आलं होतं. त्याने स्वीकारलं, पण दोन दिवसांत ते पुस्तक त्याने परत केलं. कारण हे पुस्तक गणिताचं होतं. शाळा सोडून अनेक वर्षे झाली तरी मनातून भीती गेली नव्हती.  अंतर्मनात साठवल्या गेलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावना रसायनांच्या साहाय्याने शरीरभर पसरतात. न्यूरॉन्सच्या या जोडण्या मेंदूच्या उच्च विचार करणाऱ्या क्षेत्रात तयार झालेल्या असतात. मेंदूने आपोआप त्याचा सहसंबंध जोडलेला असतो.

आत्ताही हा लेख आणि मनातल्या भावना यांचा तसा संबंध नसेल. बहिणाबाईंनी मनाची अवस्था बरोबर पकडली होती. म्हणून मनाबद्दल म्हणतात, त्या म्हणतात- आता होतं भुईवरी, गेलं गेलं आभायात..

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

First Published on March 8, 2019 12:49 am

Web Title: correlated memory and brain function