आता आपण सर्व जण धुलाई मशीनचा वापर कपडे धुण्यासाठी नेहमीच करतो आहोत. त्यामध्ये निर्मलकाचा (डिर्टजट) वापर करतोय. कपडय़ाच्या संख्येनुसार योग्य प्रमाणात पाणीही वापरले जात आहे. आणि मशीनमुळे सर्व क्रिया पद्धतशीरपणे एकामागोमाग होत आहेत. तरीही कपडे स्वच्छ होत नाहीत, अशी तक्रार आढळते. खासकरून कॉलर साफ झाल्या नाहीत, पाठीवरचा घामाचा डाग निघाला नाही अशा तक्रारी असतात.
याचे कारण असे आहे की, इतर कापड जेवढे मळते त्यापेक्षा कॉलरवर हे प्रमाण इतर ठिकाणापेक्षा १० ते २० पट अधिक असते. घामाने ओला झालेला कपडा असेल तर तिथेही मळाचे/ धुळीचे प्रमाण ५ ते १० पट (सामान्य ठिकाणापेक्षा) अधिक असते. सामान्यत: मळलेला कपडा स्वच्छ करायला निर्मलकाचे जे प्रमाण आपण वापरतो, त्यामध्ये या किती तरी जास्त पटीने मळलेल्या कपडय़ाची अपेक्षित स्वच्छता होणार नाही. त्यासाठी थोडय़ा पाण्यात निर्मलक घालून त्यात जास्त मळलेले भाग (कॉलरसारखे) बुडवून ब्रशने घासून घ्यावेत आणि मगच ते कपडे मशीनमध्ये धुवायला टाकावेत. त्याच वेळी तुम्हाला योग्य तऱ्हेने स्वच्छ झालेले कपडे मशीन धुलाईनंतर मिळतील. जास्त मळलेले भागही स्वच्छ झालेले आढळतील. कपडय़ाचा विशिष्ट भाग ५ पट ते २० पट जास्त मळला आहे म्हणून त्या पटीत जास्त निर्मलक वापरणे शक्य नाही, ते खूप खर्चीक होईल. आणि ते कपडय़ांच्या दृष्टीनेही हानीकारक होईल.
पांढरा कपडा कालांतराने पिवळा का पडतो, असा प्रश्न आपल्याला पडला तर ते काही चूक नाही. पांढरे कपडे शुभ्र, स्वच्छ दिसावेत अशी सर्वाची अपेक्षा असते. पण थोडय़ा कालावधीनंतर हे कपडे पिवळे पडायला सुरुवात होते. त्याची कारणे असंख्य आहेत. कपडा धुतल्यावर त्यातील साबण/ निर्मलक पूर्ण निघाला नाही तर पिवळेपणा येऊ शकतो. धुण्यासाठी वापरलेल्या पाण्यात लोहाची मात्रा ०.१ भाग प्रति दशलक्ष यापेक्षा जास्त असेल, तर धुण्याच्या पाण्यात कपडे जास्त मळले आहेत म्हणून प्रमाणाबाहेर निर्मलक टाकला तर आणि ब्लिचिंग केल्यावर कापडातून सर्व ब्लिच काढून टाकले गेले नाही तर अशा कारणाने कपडा पिवळा पडतो. रंगीत कपडय़ाचा रंग पांढऱ्या कपडय़ावर सम प्रमाणात लागला असेल तर, जास्त गरम इस्त्री वापरली असेल तर किंवा निर्मलक हलक्या दर्जाचा असेल तरीसुद्धा पांढऱ्या कपडय़ाला पिवळेपणा येऊ शकतो.
विजय रोद्द (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – अवध राज्याची अखेर
अवधचा नवाब शुजा-उद-दौला याची राजकीय कारकीर्द इ.स. १७५३ ते १७७५ अशी झाली. शुजा-उद-दौलाने या काळात झालेल्या आणि भारतीय राजकीय इतिहासाला वेगळे वळण लावणाऱ्या दोन युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यापकी १७६१ साली झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने मराठय़ांच्या सत्तेला ग्रहण लागले तर बंगालमध्ये झालेल्या बक्सरच्या युद्धाने मोगल सत्ता कोलमडली जाऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजकीय सत्ता उभी राहिली. पानिपत युद्धामध्ये मराठय़ांच्या विरोधात अहमदशाह अब्दाली, शुजा-उद-दौला आणि नजिबुद्दीन रोहिला यांची युती होती. युद्धाआधी, मराठय़ांबरोबर युती करावी की अब्दालीबरोबर याविषयी शुजाची द्विधा मन:स्थिती होती. शुजाच्या वडिलांना पूर्वी मराठय़ांनी मदत केली असल्याने त्याच्या आईचा आग्रह होता की, मराठय़ांना मदत करावी. परंतु त्याचा निर्णय होण्यापूर्वी अब्दाली व रोहिल्यांची संयुक्त फौज गंगानदी पार करून अवध राज्यांत पोहोचली आणि शुजाला त्यांच्याबरोबर जावे लागले. बक्सरच्या युद्धात शुजाची युती मोगल बादशाह शाह आलम द्वितीय आणि नवाब मीर कासीम यांच्याबरोबर इंग्रजांविरुद्ध होती. पानिपतच्या युद्धात अवध नवाबाच्या युतीची सरशी झाली, तर बक्सरच्या युद्धात कंपनी सरकारच्या फौजेची सरशी झाली.
नवाब वाजिदअली शाह याची कारकीर्द इ.स. १८४७ ते १८५६ अशी झाली. नृत्यसंगीताचा शौकीन वाजिदअली कारभाराकडे दुर्लक्ष करीत असे. कंपनीचा गव्हर्नर जनरल डलहौसीचा सुपीक अशा ६२,००० चौ.कि.मी. राज्य प्रदेशाच्या अवध संस्थानावर डोळा होताच. वाजिदचे कर्तव्यशून्य, गरशासन हे त्याला आयते कारण मिळाले. ४ फेब्रुवारी १८५६ रोजी खालसा संहितेनुसार कंपनी सरकारने अवध राज्य खालसा करून त्यांच्या नार्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्समध्ये अंतर्भूत केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…