News Flash

नवदेशांचा उदयास्त  : फिजी द्वीपराष्ट्र

फिजीची बहुतेक बेटे ज्वालामुखींच्या उद्रेकाने तयार झालेली असून फिजीचा समावेश ‘रिंग ऑफ फायर’मध्ये होतो.

प्रजासत्ताक फिजी हे दक्षिण पॅसिफिक महासागरातील ओसिआनिआ या उपखंडातील एक छोटे द्वीपराष्ट्र. ३३० लहान बेटांचा मिळून बनलेला हा देश न्यूझीलंडच्या ईशान्येला साधारणत: दोन हजार किलोमीटर दूर समुद्रात आहे. खरे तर फिजी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूरवर, अगदी जगाच्या दुसऱ्या टोकाला असल्यासारखा आहे. पण येथील ३८ टक्के लोकवस्ती मूळ भारतीय वंशाची आहे, त्यामुळे येथील समाजजीवनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर आहे. फिजीमध्ये समाविष्ट असलेल्या ३३० बेटांपैकी ११० बेटांवरच लोकवस्ती आहे आणि त्याशिवाय फिजीमध्ये अगदी लहान लहान, वस्तीसाठी अयोग्य अशी पाचशे खडकवजा टेकाडे समाविष्ट आहेत. विती लेवु आणि वेनुउ लेवु ही फिजीची दोन प्रमुख बेटे. त्यापैकी विती लेवु बेटावर फिजीची राजधानी असलेले सुवा हे शहर आहे. फिजीच्या सुमारे साडेनऊ लाख लोकसंख्येपैकी ७५ टक्के विती लेवु या बेटावर एकवटली आहे. जगातील सुप्त आणि जागृत ज्वालामुखींपैकी ७५ टक्के ज्वालामुखी पर्वत दक्षिण पॅसिफिक महासागराच्या परिसरात आहेत. हे ज्वालामुखी पर्वत असलेल्या देशांच्या आणि बेटांच्या समूहाला रिंग ऑफ फायर’ असे नाव आहे. फिजीची बहुतेक बेटे ज्वालामुखींच्या उद्रेकाने तयार झालेली असून फिजीचा समावेश ‘रिंग ऑफ फायर’मध्ये होतो.

साधारणत: शतकभर ब्रिटिशांची वसाहत बनून राहिलेली फिजी बेटे १० ऑक्टोबर १९७० रोजी स्वातंत्र्य मिळवून एक सार्वभौम नवराष्ट्र म्हणून अस्तित्वात आली. मध्ययुगीन काळात फिजी बेटांशेजारी असलेल्या टोंगा बेटावरचे राज्य प्रबळ होते आणि तिथले आदिवासी फिजी बेटांचा उल्लेख ‘फिसी’ असा करीत. तिथे आलेल्या युरोपीयांनी त्यावरून या बेटांचे नामकरण ‘फिजी’ असे केले. सन १६४३ मध्ये दक्षिणेकडील नवीन भूमीच्या शोधात या बेटांवर आलेला डच दर्यावर्दी एबल टास्मन हा पहिला युरोपीय. परंतु फिजीयन आदिवासींशी नित्याचे संबंध आले ते अठराव्या शतकाच्या अखेरीस इथे येऊ लागलेल्या युरोपीय व्यापाऱ्यांचे. हे व्यापारी चंदनाचे लाकूड, व्हेल मासे व इतर सागरी प्राण्यांचा व्यापार करण्यासाठी फिजी बेटांवर येत.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 12:01 am

Web Title: country profile of fiji islands zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : पापुआ न्यू गिनीची (अ)मानवी गोष्ट…
2 कुतूहल : व्यापारासाठी गणिताचा उपयोग
3 कुतूहल : नागरी समस्या आणि गणित
Just Now!
X