News Flash

कुतूहल : सर्जनशील गणिती

नोइथर यांच्या प्रबंधाचा विषय कळताच त्यांना ग्योटिंगेन येथे पुढील संशोधनासाठी बोलावून घेतले.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर हळूहळू युरोपमधील मुलींना विज्ञान आणि गणित शिकण्याची मुभा मिळाली. पण मुलींना उच्च शिक्षणाकरिता विद्यापीठात प्रवेश देण्यासाठी समाजमन तयार होण्यास १९०० साल उजाडले. अशा काळात जर्मनीतील एर्लँगन येथे एमी नोइथर यांचा जन्म झाला. वडील मॅक्स नोइथर हे एर्लँगन विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे एमी विद्यापीठात जाऊन गणिताचे उच्च शिक्षण घेऊ शकल्या. पॉल गॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली १९०७ साली एमी नोइथर यांनी अविकारी (इन्व्हेरियंट) सिद्धान्त मांडणारा पीएच.डी.चा प्रबंध विद्यापीठात सादर केला. त्यांनी मांडलेला सममिती (सिमेट्री) आणि अक्षय्यता (कॉन्झव्र्हेशन) नियम यांतील नाते स्पष्ट करणारा नोइथर सिद्धान्त सापेक्षतावादाला गणिताची बैठक देण्यासाठी खूप उपयुक्त ठरला.

ग्योटिंगेन या जर्मनीतील प्रसिद्ध विद्यापीठातील गणित विभागात डेव्हिड हिल्बर्ट आणि फेलिक्स क्लाइन हे दोघे मिळून सापेक्षतावादाच्या सिद्धान्तावर काम करीत होते. त्यांनी नोइथर यांच्या प्रबंधाचा विषय कळताच त्यांना ग्योटिंगेन येथे पुढील संशोधनासाठी बोलावून घेतले. मात्र, त्यांना प्राध्यापकाची जागा द्यावी ही हिल्बर्ट यांनी विद्यापीठाच्या कार्यकारिणीस केलेली शिफारस ‘उद्या युद्धाहून परत आलेले सैनिक या प्राचीन विद्यापीठात एका स्त्रीच्या पायाशी बसून शिक्षण घेणार की काय?’ असा शेरा मारून सपशेल नाकारली गेली. तरीही स्थायी प्राध्यापकपद अथवा नियमित वेतन यांशिवाय १९३३ पर्यंत गणिताचे अध्यापन आणि संशोधनास मार्गदर्शन करून ग्योटिंगेन विद्यापीठाला गणित संशोधनाचे प्रमुख केंद्र बनवण्यामध्ये विद्यार्थिप्रिय व गणितप्रेमी एमी नोइथर यांचा मोठा वाटा होता.

गणित सांकल्पनिक व अमूर्त असावे की अधिक रचनात्मक व वास्तविक असावे, हा वादाचा मुद्दा असण्याच्या काळी सांकल्पनिक गणिताचा आग्रह धरून क्रमसापेक्ष बीजगणितात (नॉन-कॉम्युटेटिव्ह अल्जिब्रा) गृहीतकांच्या आधाराने नोइथर यांनी मोठा विकास घडवून आणला. जर्मनीमधील नाझी राजवटीने ज्यू नागरिकांना समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून उखडून टाकायचे धोरण अवलंबल्याने १९३३ मध्ये अनेक बुद्धिवंतांप्रमाणे नोइथर यांनी अगदी नाइलाजाने अमेरिकेत आश्रय घेतला. तेथे ब्रिन मॉर महाविद्यालयाने आयुष्यातली पहिली पगारी नोकरी देऊन त्यांना मानाने वागवले; प्रतिष्ठित प्रिन्स्टन विद्यापीठाने नियमित व्याख्यानासाठी निमंत्रित केले. अल्बर्ट आइनस्टाइन त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले की, ‘‘आत्तापर्यंतच्या इतिहासात एमी नोइथर ही सर्वात प्रतिभावान स्त्री-गणितज्ञ ठरेल.’’ दुर्दैवाने १९३५ साली एका शस्त्रक्रियेनंतर वयाच्या केवळ ५४ व्या वर्षी त्यांचा दु:खद अंत झाला. तथापि, अमूर्त बीजगणितातील त्यांचे सर्जनशील योगदान शाश्वत आहे. – प्रा. संगीता जोशी    

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 12:25 am

Web Title: creative mathematics akp 94
Next Stories
1 कुतूहल : पथदर्शी रशियन स्त्रीगणिती
2 नवदेशांचा उदयास्त : सुरीनाम : उसाचे मळे, बॉक्साइटच्या खाणी
3 कुतूहल : प्रज्ञावंत मरियम मिर्झाखानी
Just Now!
X