डॉ. श्रुती पानसे

दुसऱ्या माणसांच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि वाटेल त्यावर टीका करणं हा मनुष्यस्वभाव आहे. टीका केल्यामुळे ती करणाऱ्या माणसाला कदाचित बरं वाटत असेल, पण ज्याच्यावर टीका केली जाते, त्यावर काय परिणाम होतो?

‘क्ष’ व्यक्तीकडून काही तरी चूक झाली म्हणून ‘य’ व्यक्तीने त्याच्यावर टीका केली असं समजू. हे दोघंही प्रौढ आहेत असंही समजू. कारण लहान मुलांवर केलेल्या टीकेचे वेगळे परिणाम होत असतात. ‘क्ष’ व्यक्तीकडून टीका ऐकून घेतल्यावर ‘य’ व्यक्तीचा प्रतिसाद कसा असतो?

(१) अरे वा! किती बोलला मला! खूपच छान वाटलं! (२) मला कोणी तरी माझ्या चुका दाखवून द्यायलाच हव्या होत्या. (३) हं! हा कोण लागून गेलाय मला सांगणारा! मी काहीच ऐकणार नाही. (४) माझी काही चूक नव्हती. चूक खरं तर त्याचीच होती किंवा चूक त्या अमक्याची होती.

अशांपैकी काही तरी प्रतिसाद येतात. याचा अर्थ काय झाला? लोकांवर टीकेचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे इतरांवर टीका करणं यात काहीच अर्थ नसतो. टीका ही एक निर्थक गोष्ट ठरते; कारण त्यामुळे अपेक्षित परिणाम तर होत नाहीच, पण ज्या व्यक्तीवर ती केली जाते, तिचा ‘इगो’ दुखावतो.

बी. एफ. स्किनर हे जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी प्राण्यांवर अनेक प्रयोग केले आहेत. प्राण्यांना चुकीच्या वर्तनाबद्दल शिक्षा केली तर तो लवकर शिकतो, हे त्यातून पुढे आलं आहे. अशाच प्रकारचे प्रयोग जेव्हा माणसांवर केले गेले तेव्हा असं लक्षात आलं की, टीका केल्यामुळे माणसात कायमस्वरूपी बदल होत नाहीत. मनातल्या कटू भावना मात्र जास्त वाढतात.

आपण जर सतत घरच्या, सहकारी मंडळींवर टीका करत असू, स्वत:चं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात इतरांवर ओरडत असू, तर त्यामुळे या सगळ्यांच्या मनात कडवटपणा वाढतो. परिस्थितीत तर काहीच सुधारणा होत नाहीत. एखाद्या व्यक्तीनं सुधारावं असं आपल्याला वाटतं; त्यातून तिच्यावर जर आपण सतत टीका केली,

तर ती व्यक्ती सतत स्वत:चा बचाव करत राहते आणि टीकेची परतफेड म्हणून तीसुद्धा आपल्यावर टीका करायला लागते. ज्यामुळे ‘कॉर्टीसॉल’सारखं ताणकारक रसायन निर्माण होतं, आणि त्याची परतफेडही त्याच पद्धतीनं केली जाते. कॉर्टीसॉलची परतफेड ही ‘ऑक्सिटोसिन’सारख्या दिलासादायक रसायनांमुळे होणार नाही.

contact@shrutipanse.com