कुटुंब समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
खताची कामे झाल्यावर खरीप हंगामात समृद्धी बागेची सुरुवात करावी. या बागेची कल्पना नेहमीच्या शेतीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे कुटुंबातील स्त्रियांना सगळे लगेच जमेल असे नाही. हळूहळू त्यांना जमेल, झेपेल असे काम द्यावे.
सर्वप्रथम वेलीभाज्यांनी सुरुवात करावी. त्यांचा फायदा असा की त्यांच्यासाठी बी कमी लागते. या भाज्या चांगल्या वाढून अनेक दिवस उत्पादन देतात. बी-बियाणांच्या दुकानात अशा बहुतेक भाज्यांचे बी मिळते.
वेलीभाज्यांत काकडी वेलीभाज्या आणि दोडका वेलीभाज्या असे दोन प्रकार असतात. काकडी, वाळूक, कारली, दोडका, दुध्या, पडवळ, तांबडा भोपळा, कोहळा, घोसाळी, ढेमसे, तोंडली, परवर या भाज्या तसेच खरबूज, किलगड ही फळे लावता येतात. या भाज्यांना शेतातीलच झाडांच्या फांद्या, बांबू, मेढय़ा, तूरकाटय़ा, शेवऱ्या, पळाटय़ा अशा साहित्यापासून मांडव करता येतो. मांडवामुळे भाज्या निरोगी वाढतात. त्यांची फळेही जास्तीतजास्त मिळतात. कीड, रोग आल्याचे लगेच कळते. त्यावर ते वाढण्यापूर्वीच उपाय करता येतात.
घेवडेवर्गीय भाज्यांत सोलापुरी घेवडा, डबलबीन, लायमाबीन, वालपापडी, चवळी; शेंगभाज्यांत वाटाणा, गवार, भेडी, श्रावणघेवडा, पावटा (वाल), तूर, शेवगा, हादगा; मेथी, शेपू, चवळी, राजगिरा, करडी, अंबाडी अशा पालेभाज्या; कोिथबीर, पुदिना, कांदा, लसूण, आले अशा मसालेभाज्या; मुळा, गाजर, बीट, माईनमूळ अशा मूळ व कंद भाज्या; कोबीवर्गीय भाज्या; टोमॅटो, ढोबळी मिरची, पुंडय़ाऊस अशा फळभाज्या; कडधान्ये, तृणधान्ये, फळझाडे, फुलझाडे, इतर उपयुक्त झाडे (बांबू, साग, शिवण, शिसव, चंदन, कडुिलब), औषधी झाडे या बागेत लावता येतील.
-प्र.बा. भोसले (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – विज्ञानवृत्ति आणि विज्ञानाची भाषा
आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले म्हणून का होईना, त्यांची भाषा आपल्याला मिळाली हे आपले सुदैवच. हीच भाषा आता विश्वाची भाषा होऊ घातली आहे. इंग्रजांचा मी उदोउदो करतो असे समजू नका, कारण इतर वसाहतकारांचा आणि त्यांच्या वसाहतीमधे झालेल्या जुलमांचा, धर्मातराचा आणि स्थानिक भाषा घोटण्याच्या झालेल्या प्रकाराचा लेखाजोखा घ्यायचा असेल तर दक्षिण अमेरिकेचा इतिहास वाचावा.
काळाच्या प्रवाहात उत्तर अमेरिकेत आपली राष्ट्रभाषा कोणती असावी याची जनमत चाचणी झाली तेव्हा इंग्रजीने जर्मन भाषेवर निसटता विजय मिळवल्याची पुसटशी गोष्ट वाचल्याचे आठवते. पुढे अमेरिकेने सगळीकडेच वर्चस्व स्थापन केल्यावर तर आपल्या  पथ्यावरच पडले. शेवटी आइन्स्टाइन जर्मन असला तरी त्याला विज्ञानाच्या सिंहासनावर इंग्रजी बोलणाऱ्यांनीच बसवले आणि त्याने आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे अमेरिकेतच काढली. इंग्रजीमुळेच आपल्याकडे बोस, रामन आणि हल्लीचे नारळीकर संशोधक म्हणून नावाजले. आपले मूलभूत तत्त्वज्ञान वैज्ञानिक निकषावर आधारित आहे हे जे हल्ली दवंडी पिटल्यासारखे सांगितले जाते तेही इंग्रजी वर्तमानपत्रांमुळेच सर्वत्र पसरते. तत्त्वज्ञानावर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ज्या विलोभनीय अलंकारमंडित इंग्रजी भाषेत लिहिले ते वाचले की वाटते की त्यांनी ‘इंग्रजातेही पैजा जिंके’ अशा स्तराचे लिहिले आहे.  पण ही आणि इतर अनेक नावे आपल्या लोकसंख्येच्या मानाने अपवादात्मक आणि विरळाच. बाकीच्यांनी हेल काढत पोपट पंची केली.
पूर्वी दोन तीन प्रकारच्याच मोटर गाडय़ा मिळत असत. नवी घेणे अनेक तऱ्हेने दुरापास्तच असे तेव्हा कोपऱ्याकोपऱ्यावर गाडी दुरुस्त करण्याची गॅरेज असत. त्यातले वंगणाने मळके झालेले कपडे घालून कोठलीही गाडी वर्षांनुवर्षे चालत ठेवण्याचे, जे काम होई त्याला जी करामत लागत असे ती करामत अस्सल एतद्देशीयच. पण त्यांच्यातल्या असंख्य हुशार तरुणांच्या मनात आपणच एक नवी गाडी बांधावी असा विचार एक तर आला नाही किंवा प्रोत्साहनाविना तो मागे पडला असेच झाले..
कारण आपण आत्मविश्वास गमवून बसलो होतो. आपल्यात जिद्द नव्हती आणि आपली अर्थव्यवस्था खिळखिळी होती.
मधल्याकाळात लोकानुनयनामुळे धड ना इंग्रजी धड ना मराठी असा काळ गेला. आता सर्वत्र अतिशय निकृष्ट इंग्रजी, एखाद्या तवंगासारखे पसरले आहे.
इंग्रजी हवेच पण ते चांगले हवे आणि आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय भाषा म्हणून हवे.
उद्या मातृभाषेबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ८
७५) मधुमेही जखमा, गँगरिन- चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, त्रि.चूर्ण, एकादितेल (७६) मूतखडा, लघवी कोंडणे- सूर्यक्षार, गोक्षुरादि गुग्गुळ, रसायन चूर्ण, लाह्या (७७) मूत्रप्रवृत्ती नियंत्रण नसणे-  चंद्रप्रभा, गोक्षुरादि  गुग्गुळ (७८) मलप्रवृत्ती वारंवार- चंद्रप्रभा, गोक्षुरादि (७९) मुरगळणे- लेपगोळी, मनातेल, गोक्षुरादि, तुरटी लेप
(८०) मूळव्याध रक्ती-  आरोग्यवर्धिनी, कामदुधा, मौक्तिकभस्म, गंधर्व हरितकी, शतधौतधृत(८१) मूळव्याध, साधी मोडाची- आरोग्यवर्धिनी, कामदुधा, त्रि.चूर्ण, सर्जरस मलम, घोडय़ाचा केस (८२) मार लागणे- मुका मार- गोक्षुरादी, लेपगोळी, मनातेल (८३) यकृतवृद्धी, क्षय, जलोदर- आरोग्यवर्धिनी, प्रवाळ पंचामृत, गंधर्वहरितकी (८४) रक्तदाबवृद्धी- आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादी गुग्गुळ, रसायनचूर्ण (८५) रक्तदाबक्षय- चंद्रकला, लघुसूतशेखर, गोक्षुरादी (८६) रक्त पित्ततिर्यग(त्वचेतील)- कामदुधा, त्रिफळाचूर्ण (८७) रक्तातिसार- कुटजवटी, कामदुधा, त्रि.चूर्ण (८८) रक्ताल्पता- अप्लास्टिक अ‍ॅनिमिया, ल्युकेमिया- रक्ताचा कॅन्सर- आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा (८९) रक्ताल्पता थॅलसेमिया- कुमरीआसव, रसायनचूर्ण (९०) रांजणवाडी- आरोग्यवर्धिनी, कामदुधा, त्रि.चूर्ण, द.लेप, शतधौतघृत (९१) लाल चट्टे- गोवर, कांजिण्या- कामदुधा, मौक्तिकभस्म. ९२) विटाळ अडणे- गोक्षुरादी, गंधर्वहरितकी, पिचकारी (९३) वांब येणे, पाय वळणे, पोटऱ्या वळणे- चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी. (९४) विषबाधा अन्नामुळे- कुटजवटी, बिब्याचे शेवते (९५) शरीर गार पडणे- ज्वरांकुश, दमागोळी (९६) शय्याव्रण, बेडसोअर- आरोग्यवर्धिनी, कामदुधा, त्रि.चूर्ण, शतधौतघृत (९७) शीतपित्त, गांधी, खाज- लघुसूतशेखर, त्रि.चूर्ण, कामदुधा, शतधौतघृत (९८) सूज – आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादिगुग्गुळ, रसायनचूर्ण (९९) सूज सर्वागावर- आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुग्गुळ, महानारायण तेल, रसायनचूर्ण (१००) हर्निया, आंत्रवृद्धी, अंडवृद्धी,- आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादिगुग्गुळ, गंधर्वहरितकी, सिंहनाद गुग्गुळ.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २४ डिसेंबर
१८९९> साहित्यिक, समाजवादी नेते,  समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरूजी यांचा जन्म. कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.
१९४६> नाटककार श्रीनिवास जगन्नाथ भणगे यांचा जन्म. अनेक एकांकिका आणि अरे अश्वत्थामा, त्या रात्री एक वाजता, शांतेचं करट चालू आहे आदी नाटके, तसेच तुझ्या गळा, समांतर या कादंबऱ्या आणि साक्षात्कार हा कथासंग्रह त्यांच्या नावावर आहे.
१९५५>ललित लेखक, पत्रकार अंबरीश जयदेव मिश्रा यांचा जन्म. कलावंताची व्यक्तिचित्रे रेखाटणारे शुभ्र काही जीवघेणे तसेच गांधीजींविषयीचे गंगेमध्ये गगन वितळले  ही त्यांची लोकप्रिय पुस्तके.
२००९> पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे यांचे निधन. घटना दुरुस्ती, दुसरे स्वातंत्र्य, महात्मा फुले, वारसा आणि वसा, शिक्षण आणि संस्कृती, आंबेडकरांचा वैचारिक वारसा, जातीपातीचे राजकारण, यासारखे विचार प्रवर्तक ग्रंथ त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर