उसात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि स्यूक्रोज मिळून सर्वसाधारणत: एकूण १५ टक्के साखर असते. कोकणातल्या उसातही एवढीच साखर असते; पण त्यात स्यूक्रोजचे (स्फटिक शर्करेचे) प्रमाण बरेच कमी, म्हणजे केवळ ९ ते १० टक्के इतकेच असल्यामुळे साखर किंवा गूळ करण्यासाठी कोकणातला ऊस कुचकामाचा ठरतो. सध्या कोकणात उसाचा उपयोग फक्त रसासाठीच करतात, पण हा ऊसही देशावरूनच येतो, आणि तो दुरून आणावा लागत असल्याने रसवंतीवाल्यांना तो प्रति टन रु. ४००० इतक्या चढय़ा भावाने घ्यावा लागतो.
कोकणात ऊस लागवड करण्याची एक नवी पद्धती प्रस्तुत लेखकाने विकसित केली आहे. साधारणत: एप्रिलच्या मध्याच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये उसाचे डोळे लावून केलेली रोपे जून १५च्या सुमारास शेतात लावल्यास या उसाला नोव्हेंबपर्यंत पाणीच द्यावे लागत नाही. कोकणातली हवा दमट असल्याने त्यापुढेही फक्त महिन्यातून एकदा पाणी दिले तरी चालते. डिसेंबरच्या पुढे आपण हा ऊस रसासाठी काढू शकतो.
चांगल्या जमिनीत लावलेल्या आणि चांगली मशागत केलेल्या उसाचे उत्पन्न प्रति हेक्टर १०० टनांच्या पुढे जाते, तर अगदी डोंगरउतारावरच्या हलक्या जमिनींमध्ये लावलेल्या उसापासूनही हेक्टरी ४० ते ५० टनांचे उत्पन्न मिळते. स्थानिक रसवंतीवाले तो प्रति टन रु. २५००  ते ३००० ला आनंदाने घेतील. याशिवाय इंधननिर्मितीसाठीही हा ऊस वापरता येईल. एक टन उसापासून सुमारे ७५ लिटर एथानॉल किंवा सुमारे २०० घनमीटर बायोगॅस मिळेल. बायोगॅस निर्माण करण्यावर कोणतेही र्निबध नाहीत, त्यामुळे आपण शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन आपल्या उद्योगात वापरण्यासाठी त्यापासून बायोगॅस निर्माण केल्यास आपल्याला एक टन उसापासून ७० किलोग्रॅम एल.पी.जी. इतकी ऊर्जा मिळेल. औद्योगिक एल.पी.जी.चा भाव प्रति किलोग्रॅम रु. ८० धरल्यास या बायोगॅसची किंमत रु.५६०० होते. देशावरही दुर्गम पर्वतीय भागात याच पद्धतीने ऊस पिकविता येईल. या भूभागातल्या उसात स्फटिक शर्करेचे प्रमाण चांगले असते, पण वाहतुकीच्या अडचणीमुळे जर तो साखर कारखान्यांपर्यंत नेणे शक्य होणार नसेल, तर स्थानिक पातळीवर त्याचा गूळ बनविता येईल.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:     उन्मेष
कारकीर्दीच्या पहिल्याच तीन आठवडय़ांत नामुष्की आणि नाचक्की झाली आणि ज्या नायर रुग्णालयात  मी पाच-सहा वर्षे चमकत होतो तिथून परागंदा व्हावे लागले आणि मी लोकमान्य टिळक रुग्णालयात एक अगदीच जुजबी नोकरी पत्करली. त्या काळात त्या रुग्णालयाचे अधिकृत नावच Sion Hospital असे होते. नायर आणि सायन रुग्णालयात जमीन अस्मानाचा फरक होता. नायर मुंबईच्या मध्यवर्ती वस्तीत तर शीवचे हे रुग्णालय धारावीने वेढलेले. रुग्णालयाचे दोन भाग होते. दोन्ही भागांत बैठय़ा चाळी होत्या. सर्वत्र रान होते आणि तिथे गुरे चरत असत आणि क्वचित सापही दृष्टीला पडत. रुग्णांचे जेवण पळवण्यासाठी कावळ्यांची माळ येत असे. वातावरण शांत होते आणि मध्यवर्ती मुख्य मातबर रुग्णालयातली स्पर्धा, गजबजाट, शैक्षणिक वातारण याची वानवा होती. इथले सगळे काम करणारे एखाद्या मोठय़ा कुटुंबासारखे वावरत असत. याला चढव त्याला खाली पाड, असली वृत्ती इथे कधी दिसलीच नाही. ज्यांना कमी मार्क मिळाले होते जे फारसे महत्त्वाकांक्षी नव्हते असले पदव्युत्तर उमेदवार काही शिकायला मिळेल अशा इच्छेने इथे जमा झाले होते. इथल्या वातावरणात अनेक प्रेमविवाह होतात अशी त्या रुग्णालयाची ख्याती होती. इतर रुग्णालयातले तथाकथित मातबर या रुग्णालयाला नाके मुरडत. काम अफाट होते परंतु गजबज, आरडाओरडा, खेचाखेची न होता ते पार पडत असे. इथे दर मिनिटाला देखरेख असा प्रकार नव्हता. स्पर्धा कमी आणि विश्वास जास्त त्यामुळे कामाचे स्वरूप जीवघेणे नव्हते. मी तिथे रूळलो तेव्हा ‘हाच तो बदनाम आता इथे शिरला आहे’ असा भाव मला कधीच जाणवला नाही. सगळेच निरनिराळ्या कारणांमुळे पूर्वायुष्य सोडून इथे निर्वासित होऊन आले होते. इथेच  मला डॉ. डायस नावाचे एक व्यक्तिमत्त्व दिसले, मग भेटले आणि नंतर माझ्या मनाला भिडले. मितभाषी, सौम्य, मार्मिक टिप्पणी करणारे, हसतमुख आणि विषयाची उत्तम जाण असलेल्या या व्यक्तीच्या हातात जादूसारखे कौशल्य होते. लग्न करीन तर हिच्याशी किंवा याच्याशीच असे जे तरुणपणी वाटते तसेच, करीन गुरू तर हाच असा मी पण केला आणि माझ्या खटपटय़ा आणि लटपटय़ा स्वभावाचा उपयोग करत येनकेनप्रकारेण त्यांच्या विभागात मी हाउसमन (house man) म्हणून रुजू झालो. हे शिष्यत्व आजतागायत टिकायचे होते हे तेव्हा माहीत नव्हते. वेळ आली की गुरू आपणहून भेटतो असे ज्ञानेश्वर म्हणतात.
 रात्रीचे चार प्रहर संपता। जसा उगवतो सूर्य।
किंवा फळांचा घड लगडता। केळीची वाढ होते बंद।।
तसे भेटतात गुरू। साधकाचे संपते कर्मकर्तृत्व।
जसे पौर्णिमेच्या चंद्राचे। पूर्णत्व।।
गुरुविषयी उद्या.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

वॉर अँड पीस : दातांचे विकार : उपचार भाग ३
७) लहान मुलांचे दाताचे विकार – बालकांचे किडके दात पडून जाऊन चांगले व सरळ दात यावे; याकरिता चोपचिन्यादि चूर्ण, पाव चमच्यापर्यंत नित्य द्यावे.
८) सामान्य तक्रारी – शौचास साफ न होणे, उष्णता वाढणे, गुळाचे पदार्थ अधिक खाणे यामुळे दाढदुखी असल्यास झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा चांगले तूप व गरम पाण्याबरोबर घ्यावे.
९) तीव्र वेदना (दांत काढल्यानंतर) – काही वेळा किडका किंवा हालणारा दांत काढतांना जवळच्या नसांना धक्का लागतो व तीव्र वेदना सुरू होतात. फक्त पेनकिलरचा मारा सुरू होतो. त्याकरिता पुढील उपचार करावे. नाकात चांगल्या तुपाचे किंवा अणुतेलाचे २/३ थेंब दोनदा सोडावे. रात्रौ ठरवून त्रिफळा चूर्ण घ्यावे. आतून इरिमेदादि तेल दुखऱ्या दात वा हिरडय़ांना लावावे. पोटांत प्रवाळ, कामदुधा, ब्राह्मीवटी व लघु सूतशेखर लक्षणपरत्वे घ्याव्या. खूपच वेदना होत असल्यास तुप कापूर कापूस बोळा ठेवावा.
किडके दात, इतर दातांना बिघडवत असतील तर सूज ओसरल्यावर काढून टाकावेत. भरण्यासारखे असतील तर वेळीच अवश्य भरून घ्यावेत. काढलेल्या दाताचे जागी कृत्रिम दात वेळीच बसवून घ्यावेत.
दातांच्या आरोग्य अनारोग्य समस्येकरिता सुमारे ४० वर्षांपूर्वी जर्मनीत खूप मोठे संशोधन झाले. वेगवेगळ्या देशात दाताकरिता वापरणाऱ्या विविध वनस्पती व द्रव्यांचे प्रयोगशालेय परीक्षण दीर्घकाळ चालले. कडुनिंबाच्या आंतसालीच्या गुणांसारखे ‘दंतारोग्य’ राखण्याकरिता अन्य कोणतीही वनस्पती किंवा द्रव्य नाही असा निष्कर्ष निघाला. कडुनिंबाला पारिभद्र (कल्याणकारक) असे सार्थनाव आहे. दातांचे व दातांच्या आवरणांचे, हिरडय़ांचे आरोग्य राखण्याकरिता ‘इरीमेदादी’ या तेलाचे योगदान विलक्षण आहे. गल्लोगल्ली डेंटलसर्जन खूप आहेत. ती मंडळी रुग्णांच्या आग्रहाखातर विविध टूथपेस्ट सुचवितात; ब्रश वापरायला सांगतात. त्या ऐवजी एकवेळ कडूनिंब साल, बाभळीच्या मऊ काडय़ा, करंजवृक्षाची मऊ काडी सकाळी सकाळी दातांनी चघळून पाहावयाचा सल्ला देतील काय?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ४ एप्रिल
१९१९ > लोकनायक बापूजी अणे यांनी संपादित केलेल्या ‘लोकमत’ साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित
१९३६ > ‘गोपाळ कृष्ण गोखल्यांचे चरित्र’ १९१५ साली लिहिणारे, ‘राष्ट्रीय सभा, तिची उत्पत्ति व वाढ’ किंवा ‘दुष्काळ’ (स्वरूप, कायदा व दुष्काळ फंड) अशी पुस्तके लिहिणारे कायदेतज्ज्ञ, वक्ते व लेखक गणेश रघुनाथ अभ्यंकर यांचे निधन. त्यांनी इंग्रजी नियतकालिकांतूनही विपुल लेखन केले होते.
१९४६ > एकांकिकाकार, नाटककार, कथाकार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचा जन्म. ‘अथं मनुस जगन हं’ या नाटकाच्या यशानंतर  व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी ‘अग्निपंख’, ‘रातराणी’, ‘पांडगो इलो बा इलोऽ’, ‘रमले मी’, ‘गंध निशिगंधाचा’ आदी नाटके लिहिली आहेत.
१९९६ > ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ व ‘आनंदध्वजाच्या कथा’ या पुस्तकांतून पुराणे व महाकाव्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊ पाहणारे लेखक आत्माराम नीलकंठ साधले- म्हणजेच ‘आनंद साधले’ यांचे निधन. ‘महाराष्ट्र रामायण’ हे खंडकाव्य, रुक्मिणी स्वयंवराचा अनुवाद व काही बालसाहित्य अशी त्यांची बहुविध निर्मिती होती.
२००० > लोकगीतांचे संग्राहक, अनुवादक, कथाकार नरेश कवडी यांचे निधन.  
– संजय वझरेकर