पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वष्रे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके  हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता. परदेशाहून परत येऊन रत्नसामींनी डेहराडूनच्या इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियममध्ये काम केले. तेथे उत्पादने होत असताना अनेक उत्प्रेरके वापरावी लागतात. उत्प्रेरके वापरल्या जाणाऱ्या या प्रक्रियांचे सुलभीकरण आणि सुरक्षितता यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नंतर याच कामासाठी पॉल रत्नसामी यांना जर्मनीतील म्युनिच विद्यापीठात प्रा. कनोझिर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर मात्र ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. १९९५ ते २००२ या काळात ते एनसीएलचे संचालक होते. येथेही त्यांनी उत्प्रेरकावरील आपले संशोधनाचे काम चालू ठेवले. परिणामी आज या विषयातील संशोधन कार्यास एनसीएलला जगन्मान्यता मिळाली आहे. यातून एनसीएलने अनेक पेटंट्स तर मिळवलीच, पण कोटय़वधी रुपयांचा व्यवसायही मिळवला.
झिओलाइट हे निसर्गात मिळणारे खनिज आहे. त्यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम सिलिकेटबरोबर इतर अल्कली मूलद्रव्येही असतात. विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळे अशा प्रकारच्या संयुगांचा उपयोग उत्प्रेरक म्हणून करता येतो. पॉल रत्नसामी यांनी एनसीएलमध्ये झिओलाइट बनवायला सुरुवात केली. त्यांनी झिओलाइटमध्ये, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखी मूलद्रव्ये घालून त्याच्या गुणधर्मात बदल घडवून आणले आणि त्याचे उपयोग वाढविले. जगभरातल्या अनेक पेट्रोरसायन कंपन्या एनसीएलची ही उत्प्रेरके नेहमी विकत घेत असतात.
पॉल रत्नसामी यांनी आजवर १६० संशोधन निबंध लिहिले, तर त्यांच्या नावावर ३५ पेटंट्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. अत्यंत अमूल्य संशोधनाने पॉल रत्नसामी यांनी भारताच्या रसायनशास्त्र संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली.  

मनमोराचा पिसारा: तुम अपना रंजोगम
एकटेपणाची वेदना फक्त विरहातच जाणवते असं नाही. अगदी आपलं माणूस आपल्याबरोबर असलं, त्या व्यक्तीचा नित्य सहवास घडत असला तरी एकटेपणा जाणवतो. प्रिय व्यक्तीने अबोला धरला तर आपल्याला एकटं वाटणं साहजिक आहे. परंतु कधी कधी असं जाणवतं की, प्रिय व्यक्तीला आपण बरोबर असूनही एकटं वाटत असेल तर आपल्याला त्याचं दु:ख होतं.
आपली वेदना दु:खदायक तर असतेच, पण समोरच्या व्यक्तीचं दु:ख आपण हलकं करू शकत नाही, हेदेखील क्लेशकारक असतं.
जरा कोडय़ात बोलतोय ना? मित्रा, तुम अपना रंजोगम, अपनी परेशानी मुझे दे दो, तुम्हें गम की कसम, इस दिल की विरानी मुझे दे दो.. हे जगजीत कौरनं खय्यामच्या संगीतानं सजलेलं गाणं ऐकलं की असे विचार मनात येतात. शगुन या १९६४ सालच्या या सिनेमातल्या कोणत्या चित्रतारकेवर हे गाणं चित्रित झालंय, याची कल्पना नाही. पण अत्यंत मासूम आणि मायूस चेहऱ्यानं तिनं हे गाणं पेश केलंय. साहिरच्या शब्दातला अर्थ सहजपणे व्यक्त केलाय. जगजीत कौर यानी आपल्या पतीच्या संगीताचंही चीज केलंय. त्यांच्या आवाजावर किरमिजी सावट आहे. गाण्यातली कशीश आणि असहाय्यतेची भावना शब्दांपलीकडे जाऊन आपल्यापर्यंत पोहोचवली आहे.
गाण्यातली नायिकेची तक्रार अशी आहे की, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू ते स्वीकारलंही आहे, पण तुझं माझं सहजीवन सुरू होत नाहीये. आपण हमकदम आहोत, हमराही आहोत; पण हमदम नाही. तुझ्या वेदनेत मला सहभागी व्हायचंय.
 आपल्या प्रत्येकाच्या वाटेला एकटेपणाचं दु:ख अटळपणे येतं. एकमेकांशी संवाद करून. मनातलं शल्य व्यक्त करून एकमेकांना साथ करायची असते. त्यानी एकटेपणाला पूर्णविराम मिळत नाही हे खरंय, पण जवळीक साधली तरी मन हलकं होतं.
ती म्हणते, ‘मैं देखू तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती है, कोई दिन के लिए अपनी निगेबानी मुझे दे दो.’
माझ्यावर थोडा विश्वास टाकून पाहा, मला कळू दे तुझे ‘हाल’ दुनिया कशी करते! मी त्या त्रासाची सारी जिम्मेदारी सहन करू शकेन.
तुझ्या नजरेतनं जाणवतंय की मला तू काबिल समजत नाहीस. पण मला तुझी ‘हैरानी’ सांगून बघ. मी तुला वाटते तशी मी कमजोर नाही.
माझ्या प्रेमातली ताकद अजमावून बघ. मी तुझ्या दु:खाची वाटेकरी आहे याची तुला जाणीव झाली तर आपल्या प्रेमाचं आणि जीवनाचं स्वरूप बदलेल.
स्त्रीमधल्या प्रेमात खूप सामथ्र्य आहे. विश्वासाच्या नात्यानं जवळीक साधली तर जगणं सुसह्य़च नाही तर सुंदरही होतं, मनमोराच्या पिसाऱ्यासारखं!!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: मानवधर्म आणि मूर्खपणाचे र्निबध
‘‘धर्म शब्दाची थोडक्यात व्याख्या ‘देवाजवळ पोचण्याचा मार्ग’ अशी करता येईल. लंडन, मुंबई, कलकत्ता वगैरे मोठमोठय़ा शहरांस सर्व बाजूंनी रस्ते येऊन मिळतात. म्हणजे सर्व ठिकाणच्या लोकांचा उद्देश त्या त्या शहरी थोडय़ा वेळाने व थोडय़ा श्रमाने पोचण्याचा असतो; त्याचप्रमाणे निरनिराळ्या देशांत व परिस्थितीत उत्पन्न झालेल्या धर्माचा उद्देश तोच असतो. त्यामुळे भिन्न रस्त्यांनी मुख्य रस्त्यास पोचणाऱ्या लोकांना एकमेकांचा द्वेष करण्याचे जसे कारण नसते; तसेच निरनिराळे धर्म पाळून ईश्वराजवळ पोचणाऱ्या लोकांनी तरी परस्परांचा द्वेष का करावा?.. मानवी समतेवर आधारित असा दयानंद सरस्वतींचा आर्यधर्म (आर्यसमाज) हा केवळ हिंदुस्थानचा राष्ट्रधर्म व्हावा एवढय़ावरच माझे समाधान नाही, तर आर्यधर्माच्या मानवतावादी तत्त्वांचा जगभर प्रसार होऊन तो ‘विश्वव्यापी धर्म’ व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण हा स्वातंत्र्य व समतेच्या पायावर उभा असलेला मानवधर्म आहे.’’ अशी धर्माबाबतची आपली परखड मते नोंदवत शाहू महाराज त्यातल्या थोतांड गोष्टींवरही सडकून टीका करतात-
‘‘आजच्या स्थितीत अमुक एका धर्माचे आचरण करून अमुक एका देवळाजवळ पोचला आहे असे दिसत नाही. म्हणून माझा धर्म तेवढा चांगला व इतरांचा वाईट असा पोकळ अभिमान करण्याचा अधिकार कोणासही नाही.. ईश्वर चांगल्या कृत्यांचा चाहता असतो. ईश्वरप्रणीत ग्रंथ खोटे आहेत. एखाद्या उपाध्यायाजवळ आपले अपराध कबूल केल्याने आपण पापमुक्त होतो, ही कल्पना खोटी आहे.. अमक्याच्या हातचे खावे, तमक्याच्या हातचे खाऊ नये अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली लोकांवर घातलेले मूर्खपणाचे र्निबध यांचा गांभीर्याने विचार करण्याची जरुरी नाही. खऱ्या क्षात्रधर्मास जागणारे वीरच आमच्यापेक्षा धर्मपालनाच्या बाबतीत पुढे आहेत व म्हणून तेच जास्त शुद्ध आहेत..’