घरबांधणीत सिमेंटचा वापर हा प्रकार अलीकडेच प्रचलित झाला. तसे पाहता हजारो वर्षांपूर्वी काही मोठय़ा वास्तू वास्तुविशारदांनी अशा बांधल्या की त्यातील काही अजूनही टिकून आहेत. त्या कशा बांधल्या असतील याविषयीचे मानवाचे कुतूहल आजही शमलेले नाही.
पाण्याबरोबर ज्या पदार्थाची रासायनिक प्रक्रिया होऊन तो पदार्थ घट्ट होताना दोन दगड अथवा दोन विटा जोडण्याचे कार्य करतो त्याला ‘सिमेंट’ म्हणतात. सिमेंट ही कोरडी, सूक्ष्मकणी व करडसर हिरवट रंगाची पूड असून ती हायड्रॉलिक आणि नॉनहायड्रॉलिक या दोन प्रकारांत मोडते. सिमेंट हे पाण्यात कठीण होत असल्याने त्याला हायड्रॉलिक (जलीय) सिमेंट म्हणतात. या सिमेंटचा पोत इंग्लंडमधील पोर्टलॅण्ड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो, म्हणून त्याला ‘पोर्टलॅण्ड सिमेंट’ म्हणतात. ‘या सिंमेटमध्ये सिलिकेट आणि ऑक्साइड यांचे मिश्रण असते. पोर्टलॅण्ड सिमेंट हे जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरतात. चुना आणि वाळू यांचे ते मिश्रण असून १४५० अंश सेल्सिअसला तापवले असता त्याचे रूपांतर कॅल्शियम ऑक्साइडमध्ये होते. त्यामध्ये जिप्सम (हायड्रेटेट कॅल्शिअम सल्फेट) आणि इतर पदार्थ मिसळतात. तसेच वाळू, अ‍ॅल्युमिना, फेरिक ऑक्साइड आणि कॅल्शियम ऑक्साइड यांचेही ते मिश्रण असते. त्यास सामान्य पोर्टलॅण्ड सिमेंट म्हणतात. पाणीविरहित सिमेंट पावडर आणि पाणी यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्याने त्यास टणकपणा येतो. या रासायनिक अभिक्रियेत हायड्रेट तयार होतात परंतु ते पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे हे सिमेंट सतत पाण्याखाली ठेवतात. तसेच ओलसर वातावरणात अधिक काळ ठेवल्याने सिमेंट आणि खडी, वाळू, विटा यामध्ये टणकपणा अधिक येतो.
नॉनहायड्रॉलिक ‘या दुसऱ्या प्रकारातील सिमेंट पाण्याखाली ठेवत नाहीत. कॅल्शियम हायड्रोऑक्साइड(स्लॅकड लाइम) आणि पाणी यांचे हे मिश्रण असते. ८२५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानास चुन्याचे दहा तास कॅल्शिनेशन केले असता कॅल्शियम ऑक्साइड तयार होते. कॅल्शिअम हायड्रॉक्साइडची हवेतील कार्बन डाय ऑक्साइडबरोबर काबरेनेशन (कार्बन डाय ऑक्साइड वायू क्राँक्रीटमध्ये शोषला जाणे) अभिक्रिया होऊन कॅल्शियम काबरेनेट तयार होते. आणि त्यात टणकपणा येतो.

मनमोराचा पिसारा: अपघातप्रवण व्यक्तिदोष
महामार्गावरून जाताना ‘अवघड वळणे, वाहने हळू चालवा, अपघातप्रवण क्षेत्र ’ अशा सूचना देणारे फलक जागोजागी दिसतात. त्याची दखल किती वाहक घेतात; याचं उत्तर रस्त्यातल्या अपघातांच्या संख्येवरून येते.
मात्र, ‘अपघातप्रवण व्यक्तिदोष’ असतात याची दाद वाहनचालकांनी घेतलेली नाही. रस्त्यावरच्या अपघातांप्रमाणे इतर ठिकाणीदेखील धडपडणं, खरचटणं, पाय मुरगळणं, कापणं, भाजणं असे अपघात घडत असतात. अशा सगळ्या अपघातांमध्ये धोकादायक परिस्थिती, बिघडलेली वाहने, निष्काळजी मेंटेनन्स, अपुरा उजेड अशी बाह्य़ कारणं असतातच. तरीही, व्यक्तिमत्त्व-दोषांमुळे अधिक अपघात होतात, हे नाकारता येत नाही. हा कुणा व्यक्तीचा नव्हे, तर टाळता येण्याजोग्या दोषांचा प्रश्न आहे. या विषयावर संशोधन करणं अतिशय कठीण असलं तरी सूक्ष्म निरीक्षण, अचूक माहिती आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण करून काही निश्चित निष्कर्ष काढता येतात.
वेगवेगळ्या संस्थांनी काढलेल्या महत्त्वाच्या अनुमानाविषयी इथे चार गोष्टी सांगता येतील. फक्त कॉमनसेन्स नाही तर, प्रत्यक्ष संशोधनावरून पुढील निष्कर्ष काढलेले आहेत.
स्पर्धात्मक वृत्ती : ठरावीक सूचनांचे पालन करून, सदसद्बुद्धी जागृत ठेवणारी माणसं अधिक काळजीपूर्वक वावरतात. त्यांना अपघात होत नाहीत, असं नाही. परंतु नियमांचं पालन न करणारे आणि कमालीची स्पर्धात्मकता असलेल्या लोकांना, वेगाचं अधिक व्यसन असतं. कोणत्याही व्यवहारात आपण इतरांपेक्षा अधिक समर्थ, सबल आणि वरचढ आहोत हे सिद्ध करण्याच्या धडपडीत परिस्थितीचं भान हरपतं आणि स्पर्धेच्या धुंदीमुळे अपघात घडतात. विशेष जोखमीची कामं करण्यासाठी अशा स्पर्धात्मक वृत्तीच्या माणसांची निवड टाळावी.
मानसिक ताण : मानसिक ताणामुळे व्यक्ती अधिक अंतर्मुख होतात किंवा अस्वस्थ होतात. त्यांच्यावरील तणावामुळे सूक्ष्म पातळीवर घ्यायचे अचूक निर्णय चुकू शकतात. त्या चुका त्यांच्या नकळत घडतात. मानसिक ताणामुळे काही व्यक्ती अतिसतर्क होतात, अशा हायपर अ‍ॅलर्ट अवस्थेमध्ये शरीरातील स्नायूंवर अचूक नियंत्रण राहात नाही आणि वस्तू पडतात, पाय घसरतो, ठसका लागतो, अशा तणावग्रस्त अवस्थेमध्ये जाता-येता खरचटणे, जीभ, ओठ चावला जाणे असे किरकोळ पण त्रासदायक अपघात घडतात.
अनेकदा, अंत्यविधीला जाणाऱ्या मंडळींना अथवा मोठय़ा संख्येने शुभकार्याला जाणाऱ्या लोकांना अपघात झाल्याचे वाचतो. अशावेळी चालकावर ताण पडतो तो हायपर अ‍ॅलर्ट असतो.
तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या गाडय़ाना होणाऱ्या अपघातांमागे काही कारणं असतात, असे लोक कमी जागरूक असतात ‘तो सर्व बघून घेईल’ या भरवशावर गाडी चालवतात.
इतर आकर्षणे : मोबाइलवर बोलणे, मेसेज वाचणे व पाठवणे या गोष्टी निष्कारण बिनधास्त राहणाऱ्या व्यक्तींमध्ये (तरुण वर्ग) आढळतात.
आत्मकेंद्री आणि आक्रमकता : फाजील आत्मविश्वास बाळगणारे आत्मकेंद्री लोक ‘स्व’तंत्राने वावरतात, त्यामुळे इतर लोक, परिस्थिती यांचं भान त्यांना राहात नाही आणि त्यामुळे अपघात घडतात.
शिकण्यास नाखूश : अनुभवावरून शिकणाऱ्या व्यक्ती स्वत:मध्ये होकारात्मक बदल करू इच्छितात आणि अधिक कुशलतेनं काम करतात. शिकण्यास राजी नसणे हा व्यक्तिदोष अपघातास कारणीभूत ठरतो.
डॉ.राजेंद्र बर्वे

प्रबोधन पर्व: सारे अनर्थ चारित्र्यहीनतेमुळे..
‘‘समाजवादी रचनेत पूर्वीपेक्षा दसपट, सहस्त्रपट कायदे जास्त करावे लागतात.. पावला-पावलाला कायद्याची जखड बंधने समाजवादी रचनेत घालावी लागतात. नाही तर अन्न, वस्त्र, घर, शिक्षण व आरोग्य यांची न्याय्य वाटणी होणे अशक्य आहे. हे कायदे पाळावयाचे म्हणजे नागरिकांचे व पोलिसांचे चारित्र्य किती निर्मळ पाहिजे याची, सध्या भारतात काय घडत आहे त्यावरून सहज कल्पना येईल.. कायदापालनाच्या कर्तव्यबुद्धीला सेवावृत्तीची जोड असली, लक्षावधी नागरिकांच्या ठायी ही वृत्ती बाणलेली असली तरच समाजवादी समाजरचना (किंवा कल्याणकारी राज्य) शक्य आहे. असे असताना जेथे कर्तव्यबुद्धीचा अभाव आहे, सर्व समाज चारित्र्यहीन आहे, दुष्काळ, महापूर, भूकंप यांसाठी द्यावयाच्या पैशांचा सुद्धा अपहार करण्याची वृत्ती लोकांत आहे, तेथे ती कशी शक्य होईल? समृद्धी कितीही आली, उत्पादन कितीही वाढले, लक्ष्मी कितीही प्रसन्न झाली तरी ती अशा स्थितीत पुरी पडणार नाही. आणि ती पुरी पडली नाही की, काळा बाजार, वशिला, अन्याय, अपहार यांचे राज्य सुरू होते.’’ समृद्धीच्या सुखाचा नायटा होऊ द्यायचा नसेल तर काय करायला हवे याविषयी पु. ग. सहस्त्रबुद्धे म्हणतात – ‘‘याचा अर्थ असा की, आज समृद्धी हा शाप ठरत आहे हा दोष समृद्धीचा नसून मनुष्याच्या चारित्र्यहीनतेचा आहे. काही चारित्र्यहीनता अनेक कारणांमुळे आधीच निर्माण झालेली होती. समाजवादी समाजरचना बेसावधपणे आणल्यामुळे तिच्यात आणखी भर पडली. यामुळे सर्व जगात आज समृद्धी व गुन्हेगारी यांत कार्यकारणसंबंध प्रस्थापित होऊ पाहात आहे. महाभारतात म्हटले आहे की, संपत्तीचा धनी असूनही मनुष्य इंद्रियांचा (व्यसनांचा) धनी नसेल, तो चारित्र्यसंपन्न नसेल तर, चारित्र्यहीनतेमुळे, इंद्रियांवर त्याची हुकमत नसल्यामुळे, तो ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.. तेव्हा समाजात क्रांती घडवून नवी व्यवस्था प्रत्यक्षात आणण्याची ज्यांना आकांक्षा आहे त्यांनी प्रथम मानवाला आपल्या इंद्रियांचा ईश्वर होण्यास शिकविणे अवश्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. हे अवधान ठेवले तर समृद्धी हा शाप न ठरता ते वरदानच ठरेल. छ’