ही दुनिया जितकी रंगांनी सजलेली आहे, तेवढीच गंधाने भरलेली आहे. वेगवेगळ्या पदार्थाना लाभलेले गंध कळत नकळत आपल्याला काही संदेश देत असतात आणि आपला मेंदू हे संदेश वाचत, आपण काय करावं याच्या सूचना देत असतो. गमतीची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा, ज्या वस्तूंचा किंवा पदार्थाचा संपर्क आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत, त्या पदार्थामध्ये अशी काही रासायनिक प्रक्रिया होते की त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थाना घाणेरडा किंवा उग्र वास येतो. साहजिकच आपण अशा वासांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर असलेल्या केर-कुंडीजवळून जाताना किंवा सार्वजनिक मुताऱ्यांजवळून जाताना आपली चालण्याची गती वाढते, तर एखाद्या दुकानावरून जाताना आपली पावलं काही क्षण रेंगाळतात. कधी काही वास आपल्याला संभाव्य धोक्याची सूचना देतात. गळणाऱ्या गॅसचा वास हा अशातलाच एक! किंवा काहीतरी जळल्याचा वास आला की आपण घरातली विजेची उपकरणं तपासतो.
गंध आणि तो निर्माण करणारे पदार्थ किंवा रसायनं म्हणजे रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच जणू! सकाळी उठल्यावर चहा उकळताना येणारा वास, आपल्याला चहा पिण्याआधीच चहा प्यायला मिळणार असल्याचा आनंद देतो. पावभाजी किंवा बटाटावडय़ाच्या गाडीशेजारून जाताना नुसत्या वासानेच आपली भूक चाळवते. आंघोळ करताना, साबणाचा सुवास आपल्याला आल्हाददायी वाटतो. देवपूजा करताना लावलेल्या उदबत्तीचा सुगंध साऱ्या घराचं वातावरण प्रसन्न करतो. आपल्या अंगाला दिवसभर चांगला वास येत राहावा म्हणून घराबाहेर पडताना तर आपल्यापकी बरेच जण आवर्जून परफ्यूम वापरतात. बाथरूम्स, टॉयलेट्स किंवा कपाटं यांमध्ये मंद सुगंध हवेत सोडणाऱ्या फ्रेशनर्सच्या वडय़ा टांगलेल्या असतात. लादी पुसण्यासाठी तर वेगवेगळे गंध असलेली रसायनं सध्या बाजारात मिळताहेत. सौदर्यप्रसाधनं आणि सुगंध यांचंही अतूट नातं आहे. थोडक्यात काय तर गंधांचा रसायनांशी घनिष्ट संबंध आहे म्हणून गंध आहेत आणि रसायनशास्त्र आहे म्हणूनच गंधाचा उपयोग आपण पुरेपूर करून घेऊ शकतो, हेच खरं!

मनमोराचा पिसारा: दर्पणी पाहता..
मित्रा,
एक खूप जुना अनुभव आठवला, शेअर करतोय.
थांबलो, थबकलो आणि नीट पाहिलं, रोखून पाहिलं.. हे कोण पाहातंय आपल्याकडे? आणि असं निरखून का पाहातंय?
नकोय मला असं पाहणं! टक लावून पाहणं, केवळ पाहत राहणं. नाही, त्यातलं काहीच आवडत नाहीये.. ते सूक्ष्म खड्डे, ते किंचित डाग, मला नाही पसंत, त्यात काहीच एकसंधता नाहीये. डोळे मिटून पुन्हा पाहा..
पाहिलं तर तोच चेहरा, तेच तपशील. सगळं तसंच. काय करावं?
फार काही नाही, समोरचं प्रसाधनाचं साधन बदलावं म्हणजे सगळं पालटेल.
आता चेहरा परिचित, नित्याचं सगळं ठाकठीक दिसतंय.
लहानसा अनुभव. खूप बोलका!!! कोडय़ात बोलतोय ना?
समोरच्या आरशातल्या प्रतिबिंबाविषयी बोलतोय.
न्हाणीघरातल्या वॉशबेसिनसमोरचा मोठा आरसा आणि त्याच्या शेजारचा दुसरा आरसा. त्या छोटय़ा गोल आरशांची सोय विशेष. दोन्ही बाजूंनी आरसे आणि एकशे ऐंशी अंशात गर्रकन वळविता येईल, अशी त्याला सोय.
एक आरसा प्रतिबिंब दाखवितो, जशास तसे आणि दुसरा आरसा, आपलंच प्रतिबिंब तपशिलासकट दाखवितो, खूप मोठं करून. प्रसाधनाला सोयीचं व्हावं म्हणून अर्थातच. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या अतिथीला करून दिलेली ही खास सुविधा.
त्यातल्या स्वत:च्याच मोठय़ा प्रतिबिंबात चेहरा (नको इतका) स्पष्ट दिसतो. चेहऱ्यावरचे सूक्ष्म खड्डे, डाग मोठे करून दाखवणारं हे प्रतिबिंब म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रातून स्वत:कडे पाहणं.
स्वत:कडे असं सूक्ष्मदर्शक आरशात पाहणं, नाही आवडलं. ‘दर्पणी पाहता रूप, न आवडे हो आपुले!!’ असं वाटलं.
स्वत:कडे इतकं सूक्ष्मपणे पाहणं, स्वत:ला तपशिलात पाहणं, हे केवळ अपरिचित म्हणून नव्हे, तर स्वत:कडे असं निरखून पाहिलं की स्वत:मधले दोष खूप ढोबळ आहेत, बटबटीत आहेत असं वाटतं. स्वत:च्या प्रतिबिंबातलं म्हणजे प्रतिमेतलं काहीच आवडत नाही.
प्रत्यक्षातदेखील स्वत:कडे इतकं काटेकोरपणे पाहायची गरज नसते. उगीचच आपले दोष आणि त्रुटी आपल्याला भेडसावतात आणि सूक्ष्मदर्शक आरशात तर सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचे खाचखळगे स्पष्ट दिसतात. रूपगर्विता मेरेलिन मन्रोलादेखील ती स्वत: सुंदर दिसत नसे.
सूक्ष्मदर्शक आरशातले प्रतिबिंब पाहता पाहता वाटलं की, आपणच आपल्या अवकाशामध्ये घुसतोय. आपल्या अवकाशात व्यक्तिगत स्पेसमध्ये कोणी घुसलं तर ते अर्थातच आवडत नाही. इथे तर स्वत:च्या अवकाशात स्वत:च घुसत होतो, तेही आवडलं नाही.
माझ्या स्वत:च्या अवकाशाचा मी आदर ठेवायला पाहिजे..
चेहरा पाण्यानं स्वच्छ धुतला आणि पुन्हा स्वत:कडे नेहमीच्या आरशात पाहिलं. निथळणारं पाणी टिपलं आणि हसलो. गडय़ा, तू जसा आहेस तसा मी तुला स्वीकारतोय..
    तुझा, अर्थात मीच.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: निरोगी, जोमदार सामाजिक जीवनासाठीची पूर्वअट..
‘‘सुशिक्षित हिंदू माणसाच्या दृष्टीने हिंदू धर्म हे समाजधारणेचे, जीवनधारणेचे अधिष्ठान उरलेले नाही. मग आजचे हिंदू कोणत्या अर्थाने हिंदू आहेत? ते ह्य़ा अर्थाने हिंदू आहेत, की आदिम काळापासून जो समाज ह्या देशात नांदत आला आहे, इतिहासात ज्याला एक समाज म्हणून ओळखण्यात येत होते आणि जो एक समाज म्हणून स्वत:ला ओळखत होता त्या समाजाचे ते आहेत. ज्या अर्थाने व्यक्ती एखाद्या समाजाचा पुरतेपणे घटक असते त्या संपूर्ण अर्थाने ते ह्य़ा समाजाचे घटक आहेत. धार्मिक परंपरेच्या अधिष्ठानावर ह्य़ा समाजाची धारणा होण्याचे युग संपले. पण ऐहिक ज्ञान आणि मूल्ये ह्य़ांच्या अधिष्ठानावर जो समाज आज घडत आहे आणि घडवायचा आहे त्याच्यात, आणि इतिहासजमा होत असलेल्या हिंदू धार्मिक परंपरेने घडविलेल्या समाजात ऐतिहासिक सातत्य आहे, सामाजिक आनुवंशिकतेचे चिवट अनुबंध आहेत. माझी माझ्या समाजाची जी कल्पना आहे तिच्यात हा सर्व ऐतिहासिक वारसा अंतर्भूत आहे.’’
‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ (१९९६) या पुस्तकात मे. पुं. रेगे आजच्या हिंदू असण्याच्या अर्थाविषयी लिहितात – ‘‘अभिमान आणि लज्जा माणसाला स्वत:विषयी वाटते. इतरांविषयी आदर किंवा तिरस्कार वाटेल. म्हणून मला पाणिनीचा आणि कालिदासाचा अभिमान वाटतो आणि अस्पृश्यतेविषयी, जातिभेदाविषयी, तीर्थक्षेत्रातील गलिच्छपणाविषयी लज्जा वाटते. हा अभिमान आणि लज्जा मला वाटली नाही तर मी उपरा ठरेन.. ह्य़ा समाजात मुसलमानांचा एक प्रवाह इतिहासाच्या एका टप्प्यावर येऊन मिसळला आणि ख्रिस्त्यांचा एक प्रवाह दुसऱ्या टप्प्यावर येऊन मिसळला. यानंतर ह्या सबंध समाजाचे हिंदू हे वर्णन चूक ठरेल. त्याचे भारतीय असे वर्णन करू. पण हा प्रथमपासून शेवटपर्यंत भारतीय समाजच होता आणि राहील.. समाज धारणेचे तत्त्व म्हणून धार्मिक परंपरेचे विसर्जन केल्याशिवाय या समाजाला निरोगी आणि जोमदार सामाजिक जीवन उभारता येणार नाही; पण हे कितीही मूलगामी असले तरी परिवर्तन आहे, हा नव्याने मांडायचा नवा डाव नाही.’’