केमोथेरपी ही कॅन्सरवरील पद्धतशीर उपाययोजना आहे. यात वापरण्यात येणारी औषधे शरीरातल्या बऱ्याचशा भागांपर्यंत सहज पोहोचू शकतात. त्यामुळेच शरीरात वेगवेगळ्या भागांत कॅन्सर पसरला असेल किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी कॅन्सरच्या गाठी आढळत असतील किंवा ज्या शस्त्रक्रियेने काढता येत नसतील, तर अशा वेळी केमोथेरपीचा अवलंब करण्यास सांगण्यात येते. या उपचारात काही औषधे पोटात (तोंडावाटे) घ्यायची असतात, तर काही स्नायूंमध्ये, त्वचेखाली किंवा शिरेत इंजेक्शनच्या रूपात दिली जातात. पद्धत कोणतीही असो, ही औषधे रक्तात शोषली जातात आणि शरीरभर वाहून नेली जातात.
औषधात आढळणाऱ्या रासायनिक रचनेप्रमाणे व ती कोणत्या प्रकारे कॅन्सरच्या पेशीवर परिणामकारक आहेत, त्यानुसार या औषधांचे वर्गीकरण प्रामुख्याने चार प्रकारांत होते.
पहिला प्रकार आहे, अल्किलेटिंग एजंट्स. या औषधातील अल्काईल हा रासायनिक गट प्रथिने किंवा पेशीतील गुणसूत्रांमध्ये आढळणाऱ्या आम्लाबरोबर बंध निर्माण करतो, ज्यामुळे पेशींचे विभाजन होऊ शकत नाही, त्यामुळे पुढील वाढ थांबते. पेशी तिच्या जीवनचक्राच्या कोणत्याही अवस्थेत असली तरी ही औषधे प्रभावशाली ठरतात. धिम्या गतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या उपचाराकरिता ही औषधे वापरली जातात. उदा. क्लोरामबुसिल, सायक्लोफॉस्फमाइड, थायोटेपा इत्यादी.
अ‍ॅन्टिटिमेटाबोलाइट्स या वर्गातील औषधे कॅन्सर पेशींच्या वाढीला आवश्यक असलेल्या घटकांची उदा. पोषकतत्त्व, विकरे, संप्रेरकांची नक्कल करतात. त्यामुळे या कॅन्सरपेशी त्यांचा सहज स्वीकार करतात. आवश्यक क्रिया न झाल्यामुळे उपासमार होऊन कॅन्सरपेशी मरतात. ही औषधे पेशींच्या जीवनचक्राच्या विशिष्ट अवस्थेतच प्रभावी ठरतात. उदा. प्युरीन अ‍ॅन्टागोनिस्ट, पिरिमिडीन अ‍ॅन्टागोनिस्ट इ.
अ‍ॅन्टिमायक्रोटय़ुबुल एजंट्स या प्रकारातील औषधे वनस्पतीजन्य अल्कलॉइडस असतात. यात मुख्यत्वे क्षारयुक्त नायट्रोजन असतो. तसेच यात सौम्य आम्ल गुण असतात. ही विशेषत्वाने कॅन्सरच्या पेशींचे विभाजन थांबवतात. पेशींचे जीवनचक्र मध्येच थांबल्यामुळे त्या नाश पावतात. उदा. अ‍ॅक्टिनोमायसीन डी, डोक्सोरुबिसिन, मायटोनायसिन इ.
अ‍ॅन्टिटय़ूमर अ‍ॅन्टिबायॉटिक वर्गातील औषधे पेशीच्या जीवनचक्राच्या विशिष्ट अवस्थेशी निगडित नसतात. पेशीला जिवंत राहण्याकरिता लागणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीत अडथळा निर्माण करतात, त्यामुळे पेशींचे पुनरुत्पादन थांबते. उदा. मायटोझ्ॉनट्रोन, ब्लिओमायसिन इ.

मनमोराचा पिसारा तो बुरा मान गये..
रंगीत पडद्यावर शेलाटय़ा बांध्याची नाकेली सायरा बानू लटक्या घुश्शात उभी आहे आणि तिच्या भोवती राजेंद्रकुमार आता ज्याला रेट्रो म्हणतात तसं जाकीट घालून गोंडा घोळतो. महम्मद रफी आपल्या मधुर किंचित लाळघोटय़ा सुरात तिची आर्जव करीत ‘तो बुरा मान गये.’ हे गाणं शंकर जयकिशन यांच्या दिग्दर्शनासमवेत म्हणतो.
६०च्या दशकातल्या लोकप्रिय नेमस्त शंृगारानुसार थोडी पळापळी, झाडाभोवती फेरे, कपडय़ांचे जोड न बदलता गाणं पेश होतं. अखेरच्या क्षणी नायकाला नायिका पटते आणि गाणं संपतं. त्या काळी गाणं लागलं की हमखास बाहेर जाऊन बिडीचे चार झुरके मारणारे लोक होते, यावर विश्वास बसणार नाही! मन लावून गाणं ऐकलं तेव्हा अचानक लक्षात आलं की हे गाणं एक झटय़ाक गझल आहे.
गझल कशी असावी  याच्या तांत्रिक बाबी पूर्ण करणाऱ्या गाण्यानं फसवलंच म्हणायचं.
गझलची पेशकशी जरा गंभीर आणि एखाद्या मजलिसमध्ये रसिकांची परवानगी घेऊन ‘ईर्षांद’ म्हटल्यावर पेश करायचे चार शेरांची गुंफण. अर्थात ही पठडी झाली. पेशकशीमध्ये चित्रपटातल्या गझला फारशा अडकल्याही नाहीत.
आता ‘तो बुरा मान गये’ या ‘रदिफ’ वरून प्रसिद्ध पावलेला हा गझलचा मतला अगदी पर्फेक्ट आहे.
प्यार आँखो से जताया तो बुरा मान गये
हाले दिल हमने सुनाया तो बुरा मान गये
तो बुरा मान गयेचा रदिफ पुढच्या पाचही दोन चरणांच्या शेरमधल्या दुसऱ्या ओळीत रिपीट झालाय. पैकी पोथीनिष्ठ गझलमध्ये बहुधा चार शेर असतात. इथे पाच आहेत. असो.
मतल्यामध्ये नायक आपली कैफियत नजाकतीने आणि खटय़ाळपणे मांडतो. तू खूबसुरत आहेस म्हणून केवळ तुझं सगळं खपतं आणि मी आशिक असल्यानं, मात्र मी वाईट ठरतो.
हा लटक्या त्राग्याचा सूर हसरत जयपुरीनं मस्त खुलवलाय.
वो तो हर रोज रुलाते हैं घटाओं की तऱ्हा
हमने इक रोज रुलाया तो बुरा मान गये
क्या बात है!
या गझलमधून काफियाची लज्जतही खुशीनं सांभाळली आहे. रदिफपूर्वीच्या शब्दातली यमकात्मक संरचना जताया, सुनाया, दिखाया, रुलाया, आया, झुकाया या शब्दांमधून खुलते.
गाण्यातला खेळकर मूड लक्षात घेऊन गझलचा वेहेर (छंद / मीटर) आटोपता ठेवलाय त्यामुळे रफीच्या दमसांसमधून सुरांची उछलकूद आपल्याला खेळवते.
गझलमधलं प्रत्येक कडवं ही स्वतंत्र काव्यरचना होऊ शकते. उदा.
बेखुदी पर मेरी हसते रहे, शर्माते रहे
अब जरा होश में आया, तो बुरा मान गये
म्हणजे, इथला माषुक अगदीच ‘हा’ झालाय. आता करू तरी काय? होशोहवा हरवून पागल झालो तर हसं होतं आणि होश ठिकाने आये, तर त्याबद्दल बुरा मान गये. सर्व गझलमध्ये कवीच्या नावाची गुंफण करणारा ‘मक्ता असायला हवा, असं नाही.’ माझ्या लहानशा चुकीबद्दल मला दुष्मन मानतेस.  तुझ्या पायावर डोकं ठेवलं तरी तो बुरा मान गये. मेरी इतनी तो हसरत मानो, की हमे ये ना कहना पडे, तो बुरा मान गये..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व त्र्यंबक शंकर शेजवलकर : मराठा इतिहासाचा श्रेष्ठ आचार्य
त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठीतील एक श्रेष्ठ, पण काहीसे दुर्लक्षित असे इतिहासकार आहेत. त्यांचे अतिशय परखड, सडेतोड आणि काटेकोर विश्लेषण अनेकांना पेलवत नाही, पण शेजवलकर यांनी त्याची काही क्षिती बाळगली नाही. रियासतकार गोिवद सखाराम सरदेसाई यांचे ‘नानासाहेब पेशवे’ हे चरित्र १९२६ साली प्रकाशित झाल्यावर मराठीत एक नवल घडले. एका नामवंत  ग्रंथकाराच्या ग्रंथाला एका  तरुण लेखकाने ६६ पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना सरदेसाई यांच्या पुस्तकावर टीका करणारी होती. तरीही त्यांनी ती छापून तिच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्यावरून महाराष्ट्रात त्या काळी मोठेच रणकंदन माजले. तेव्हापासून त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्याकडे महाराष्ट्रातील जाणकारांचे लक्ष वेधले गेले. गं. दे. खानोलकर त्यांच्याविषयी म्हणतात, ‘महाराष्ट्रात ज्ञानाच्या एखाद्या क्षेत्रात स्वत:ला स्थिर करून घेऊन निरलसपणे, श्रेष्ठ प्रतीच्या जिज्ञासेने, कडकडीत विरागी वृत्तीने त्याची सेवा करणारे आणि त्यातून प्राप्त झालेले फळ समाजास अर्पण करण्यात परमोच्च आनंद मानणारे – नव्हे, ते तसे करणे हे आपले जीवित आहे असे मानणारे – जे काही विद्याव्यासंगी विद्वान अत्यल्प प्रमाणात आढळतात, त्यांपकी शेजवलकर हे एक होत.’ उच्च विचारांचा प्रचार करण्याच्या आणि विचाराने प्रगती घडवून आणण्याच्या उद्देशाने शेजवलकरांनी ८ मे १९२९ रोजी ‘प्रगती’ हे साप्ताहिक सुरू केले. प्रगती हे इंग्लंड-अमेरिकेतील स्पेक्टेटर नेशन या उच्च दर्जाच्या साप्ताहिकाच्या तोलाचे होते. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारच्या रोषामुळे १९३२ मध्ये प्रगती बंद करावे लागले. शेजवलकरांचे खरेखुरे प्रगल्भ स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर प्रगतीचे अंक वाचावेत, असा दाखला अनेकदा दिला जातो. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘मलाही शेजवलकरांविषयी अलोट प्रेम व अभिमान आहे. मराठय़ांच्या इतिहासात स्वत:ला जन्मभर गाडून घेणाऱ्या या नि:स्पृह, नि:स्वार्थी, स्पष्टवक्त्या, प्रज्ञावंत मीमांसकाला मी मराठा इतिहासाचा एक श्रेष्ठ आचार्य मानतो.’