गवारीच्या शेंगांकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन गेल्या दोन-तीन वर्षांत बदलला. गवारगम हे आपण खात असलेल्या गवारीच्या शेंगांच्या जातीतील पीक; मात्र त्यात डिंकाचे प्रमाण जास्त असते. या गवारगमचा उपयोग आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विशेषत: पेट्रोल, डिझेल, गॅस उद्योगात होत असल्यामुळे हे एक नवे पीक म्हणून पुढे आले आहे.
गवारगम हे ९०-१०० दिवसांचे पीक आहे. त्याची उसात आंतरपीक म्हणून लागवड करता येते. शेंगवर्गीय पीक असल्यामुळे  याच्या मुळांना नत्राच्या गाठी असतात. त्यामुळे पीक घेतल्यानंतरही जमिनीची सुपीकता टिकून राहते. तसेच पिकांना खतांची मात्रा कमी लागते. नवीन पीक असल्यामुळे फवारण्या फारशा कराव्या लागत नाहीत. साधारणपणे एकरी पाच-सहा िक्वटल उत्पादन मिळते.
 भारत हा गवारगमचा प्रमुख निर्यातदार देश आहे. गवारगमला राजस्थानात चांगली बाजारपेठ आहे. तेथील सरकारने गवारगम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा हजारांचा हमी भाव दिला आहे. कमी खर्च, कमी देखभाल आणि कमी श्रमात मिळणारे उत्पन्न यामुळे विदर्भ, मराठवाडय़ातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. राजस्थानात गवारगमचे उद्योग आहेत. महाराष्ट्रातही असे उद्योग उभारण्यास संधी आहे.
पेटंटचा हळदीघाट जिंकल्याने हळदीचे पारंपरिक गुण आता परदेशातही पोहोचले आहेत. रोजच्या आहारात औषधे व सौंदर्यप्रसाधने तसेच जैविक कीटकनाशकांमध्ये हळदीचा उपयोग होतो.
हळदीची पावडर करताना हळकुंडे विद्युत मोटरवर चालणाऱ्या यंत्रात भरडतात. पुढे त्याची पावडर करतात. ती तीनशे मेशच्या जाळीतून चाळल्यावर बारीक हळद मिळते.
वाळलेल्या हळदीच्या पावडरपासून इथाइल अल्कोहोल वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढतात. याचा उपयोग औषधे व सौंदर्यप्रसाधने निर्मितीमध्ये केला जातो. ओल्या हळकुंडापासून लोणचे बनवतात. हळदीच्या भुकटीपासून ओलिओरेझिनची निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग औषधे व खाद्यपदार्थात करतात. औषधी तेल व मलम या स्वरूपात हळदीचा उपयोग करतात. हळदपाचक, कृमीनाशक, शक्तिवर्धक व रक्त शुद्ध करणारी आहे. हळदीचे तेल अ‍ॅण्टीसेप्टिक म्हणून वापरतात. मूत्राशयाच्या तक्रारींवर व मुतखडय़ावर हळदीचा उपयोग होतो.

वॉर अँड पीस: निरोगी हृदय – कार्यक्षम हृदय
जगभर २९ सप्टेंबरला हृदयदिन पाळण्यात येतो. अलीकडे तुम्हा आम्हा शहरवासीय, सुशिक्षित, श्रीमंत- अतिश्रीमंत मंडळींमध्ये विविध रोगांच्या धास्तीचे भ्या वाढत चालले आहे. याला अनेक कारणे आहेत. मानवी शरीराला ग्रासणारे विविध आजार दीड-दोनशेच्या आसपास आहेत. यातील सर्दी पडसे, डोकेदुखी, मलावरोध, खाज, आग, केसांचे विकार असे सामान्य विकार सोडले तर आपणा सर्वाना तीन महत्त्वाच्या अवयवांच्या आरोग्य अनारोग्य समस्यांकडे केव्हातरी गांभीर्याने लक्ष द्यायलाच लागते. शास्त्रकारांनी ‘शिरोहृदयबस्त्यादि’ या तीन मर्मस्थानांच्या कार्यक्षमतेची विशेष काळजी घ्यावयास सांगितले आहे.
आपण जन्माला आल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाची- घडय़ाळाची टिकटिक, आपल्या नकळत अखंडपणे चालू असते. तुमचे आमचे हृदय हे अखंडपणे रक्ताभिसरणाचे, अशुद्ध रक्त घेऊन, ते शुद्ध करून सर्व प्रकारच्या अडीअडचणीतही ठणठणीत राहायला हवे. तुमची आमची एवढय़ा तेवढय़ा कामाने, लहानसहान श्रमाने, दोनतीन जिने चढण्याने कमी-अधिक बोलण्याने, मानसिक दडपणाने फाफू होता कामा नये अशी मदत निरोगी हृदयाकडून होत असते. हृदयासंबंधी रोगलक्षणांचा मागोवा घेत असताना हृदयाचे शारीर, त्याचे नेहमीचे घडय़ाळाची टिकटिक अखंड चालू ठेवण्याच्या कार्यावर नजर ठेवताना, काही संबंधित अवयव, राहणीमान, वातावरणाचाही विचार आवश्यक आहे.
हृदय हा रक्तपुरवठा  करणारा  पंप मेंदू, मूत्रपिंड यांच्या अखंड सहकार्यामुळेच सक्षमपणे कार्य करतो. या कार्यात विक्षेप येऊ नये याची काळजी पन्नाशीनंतर सगळ्यांनी घ्यायला हवी. त्याचबरोबर हृदय ज्या घरात राहते त्या फुफ्फुसाचे आरोग्यही उत्तम हवे. हृदयाचे प्रमुख कार्य रक्ताभिसरण. त्यामुळे रक्ताचे व चरबीचे प्रमाण, नाडीचे ठोके,  रक्तशर्करा, पुरेशी झोप याबरोबरच आसपासचे वातावरण, दिवसभराची धावपळ, ताणतणाव,  पुरेसा व्यायाम, व्यसने या घटकांवरही लक्ष हवे. पोट सांभाळा, आपले हृदय हरवू नका.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      यज्ञ आणि पाऊस
गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या चौदाव्या श्लोकावर ज्ञानेश्वर दोनच ओव्या सांगतात याचे आश्चर्य वाटते, कारण इतरत्र आपली कल्पनाशक्ती आणि काव्याची कोंदाकोंदी  करणारे (त्यांचे स्वत:चेच शब्द आहेत हे) ज्ञानेश्वर,
 अन्नास्तव भूते। प्ररोह पावती समस्ते। मग पाउस या अन्नाते। सर्वत्र प्रसवे।।
तया पर्जन्या यज्ञी जन्म। यज्ञाते प्रगटी कर्म। कर्मासि आदि बह्म। वेदरूप।।
-एवढेच म्हणून पुढे जातात. अन्नातून माणसे (होतात) वाढतात. पाऊस अन्नाला प्रसवतो त्या पर्जन्याचा जन्म यज्ञामुळे होतो. यज्ञामध्ये कर्म प्रकट होते. कर्माचा उगम ब्रह्मात आणि  ब्रह्म वेदामधे प्रतीत होते असा अर्थ आहे.
यातले यज्ञामुळे पाऊस पडतो हे वाक्य ज्ञानेश्वरांना रुचले नाही म्हणून त्यांनी आवरते घेतले असा संशय माझ्यासारख्या थोडय़ाशा भोचक माणसाला पडला आहे. खरे तर यज्ञात ज्या क्रिया करतात त्या कर्मकांड आहेत असा थोडासा टीकेचा सूर उपनिषदांमधे उमटला आहे. तसे तर हे विश्वाचे कर्म अव्याहत चालूच आहे त्यात माणूस उगवतो आणि मावळतो. कर्म हे ब्रह्मामधून आले आहे. हे वैदिक तत्त्वज्ञानाचे गृहितक आहे. वेद ब्रह्माबद्दल बोलतात म्हणून ते ब्रह्मरूप हे सगळे समजते. परंतु यज्ञामुळे पाऊस पडतो हे वाक्य बोचत राहतेच. त्यातल्या त्यात मनुस्मृतीत अग्निमधे दिलेली आहुती सूर्याकडे पोहोचते आणि सूर्यापासून पाऊस उत्पन्न होऊन त्यातून अन्न आणि अन्नातून माणूस निर्माण होतो असे थोडेसे जास्त व्यवहारी किंवा वैज्ञानिक विधान आहे.
शेवटी विश्वाचे मूळ उष्णता असेच तर सर्वत्र अग्निची उपस्थिती आहेच आणि म्हणूनच निसर्ग हाच मुळी एक यज्ञ आहे. एवढेच कशाला माणूस किंवा इतर जीवसृष्टी उष्माकांचे जळण करतच जगतात. तेव्हा तेही एकप्रकारचे यज्ञच असतात. बाष्पीभवनाची क्रिया उष्णतेमुळे आणि पुढे वाफेतून पडणारा पाऊस किंवा आकाश फारच थंड असेल तर गोठून पडणारा  गारा या शेवटी उष्णतेच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रिया आहेत. तेव्हा निसर्गातल्या या यज्ञातून पाऊस पडतो असे तर गीता म्हणत नसेल ना?
 म्हणत असणार, कारण तिसऱ्या अध्यायातल्या सोळाव्या श्लोकात या निसर्गात सुरू असलेल्या चक्राचा उल्लेख आहे आणि कदाचित अपघाताने त्या श्लोकावर सांगितलेल्या ओव्यांमध्ये जो निसर्गाला अनुरूप वागत नाही त्याचे आयुष्य (जैसे का अभ्रपटल अकाळीचे) म्हणजे भलत्याच वेळी अवतरलेली ढगांची फळी असावी असे आहे म्हणजे निष्फळ आहे. अशी ओवी येते.
निसर्गाचे चक्र समजवून घेणे हे विज्ञानातून आलेले ज्ञान असते, तसेच मनुष्यव्यापाराचेही विज्ञान शेवटी ज्ञानाप्रत नेते आणि आपल्या डोक्यातली चक्रे समजवते, त्या ज्ञान विज्ञाना बद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते
 
आजचे महाराष्ट्रसारस्वत        १४ नोव्हेंबर
१९१९ > पत्रकार, संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. ‘मराठवाडा’चे दैनिकात रूपांतर त्यांच्या कारकीर्दीत झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सक्रिय सहभागाच्या आठवणी त्यांनी ‘पेटलेले दिवस’ या पुस्तकात नोंदविल्या, प्रवासातल्या निरीक्षणांच्या पुस्तकाला ‘पळस गेला कोकणा’ असे नाव दिले. ‘आलो याचि कारणासी’ हे त्यांनी पत्रकार म्हणून केलेल्या लेखनाचे संकलन त्यांच्या हयातीत, तर ‘समग्र अनंत भालेराव’च्या दोन खंडांचे प्रकाशन अलीकडे झाले आहे.
१९२४ > संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारप्राप्त कथ्थक नृत्यांगना व नृत्यगुरू रोहिणी भाटे यांचा जन्म. त्यांचे नृत्यविषयक लिखाण संशोधनपर आणि लोकरुचिपर अशा दोन्ही प्रकारचे होते. ‘लहजा’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सन २००८ मध्ये त्या निवर्तल्या.
१९७१ > ‘कुंकू’ हा गाजलेला चित्रपट ज्यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवरून बेतला गेला, ते- तब्बल ७५ पुस्तकांचे कर्ते, कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचे निधन. उमज पडेल तर, पहाटेपूर्वीचा काळोख, एकटी आदी कादंबऱ्याही त्यांच्याच. काही ऐतिहासिक कादंबऱ्या, अनेक कथासंग्रह व बोधप्रद पुस्तके त्यांनी लिहिली होती.
संजय वझरेकर