News Flash

कुतूहल: गाय/म्हशीच्या विणीची वेळ

दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजे गाय/म्हशीच्या दोन वेतांतील अंतर काबूत ठेवणे (गायीत १२ ते १३ महिने व म्हशीत १३ ते १४ महिने) आणि कालवडी व पारडय़ा

| July 20, 2013 01:14 am

दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजे गाय/म्हशीच्या दोन वेतांतील अंतर काबूत ठेवणे (गायीत १२ ते १३ महिने व म्हशीत १३ ते १४ महिने) आणि कालवडी व पारडय़ा योग्य वयात गाभण राहून त्या दूध देण्यास सुरू करणे.
गाय/म्हैस विताना तिला जास्त त्रास झाला नाही, तिची वार व्यवस्थित दोन-तीन तासांत पडली, चीक एकदम काढला नाही, व्यायल्यानंतर जास्तीत जास्त दूध देण्याचा दिवस साधारणपणे २०-२२ दिवसांनी आला, तर गाय/म्हशीचे गर्भाशय सशक्त आहे, असे समजावे.
गाय/म्हशीचे निरण (योनीचा बाहेरचा भाग) फुगले, लाल झाले, ती शेपटी सतत वर करत असेल तर ती माजावर आली, असे समजावे. माजाची लक्षणे रात्रीच्या वेळी ७०-८० टक्के गायी/म्हशींमध्ये दिसतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी गोठय़ात चक्कर टाकणे आवश्यक असते. अशी लक्षणे दिसल्यास दुसऱ्या दिवशी दुधाची धार काढल्यानंतर गाय, म्हैस, कालवडी, पारडय़ा यांना रेतन (कृत्रिम वा नसíगक) करून घेणे फार महत्त्वाचे असते. दोन माजांमध्ये रेतन करून घेतल्यानंतर त्या उलटल्या तर त्या माजावर असताना तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावे. म्हणजे चालू असलेल्या माजचक्रात योग्य तो उपचार करता येतो. गायी/म्हशींचे माजचक्र १९ ते २१ दिवसांचे असते. माजचक्राच्या विशिष्ट दिवशीच औषधपाणी केल्यास बराच उपयोग होतो, असा लेखकाचा गेल्या ३५ वर्षांचा अनुभव आहे. प्ररसांचा (हार्मोनचा) उपयोगसुद्धा माजचक्राच्या कोणत्याही दिवशी करून चालत नाही. आपल्याकडे वेगवेगळ्या प्ररसांचा वापर केला जातो. त्यांचा काहीही उपयोग होत नाही. गर्भाशयात सोडण्यासाठी आयोडिनचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. त्यामुळे गर्भाशयाची अंतर्त्वचा जळते आणि गाभण राहण्याऐवजी अडचणी उभ्या राहतात.
कृत्रिम रेतन करताना कांडीतील गोठवलेले वीर्य द्रवरूप स्थितीत आणण्याकरिता कोमट (गायीच्या वळूकरिता ३५ ते ३७ अंश से., रेडय़ाकरिता ४० ते ४२ अंश सेल्सिअस) पाणी वापरतात. कोमट पाण्याच्या तापमानात दोन-तीन अंश सेल्सिअसचा फरक पडला तरी शुक्राणूंचे जिवंत राहण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्केकमी होते. यासाठी पशुपालकांनी स्वत:चा प्रयोगशाळा थर्मामीटर ठेवावा व तो पशुवैद्यकास वापरण्यास द्यावा.

डॉ. वासुदेव सिधये (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस                                                      क्षय : भाग ४
अनुभविक उपचार – ९) कडकी, हातापायाची आग – प्रत्यक्षात ताप नसताना मौक्तिकभस्म पन्नास मि. ग्रॅम व दोन चमचे शतावरीघृत असे दोन वेळा सकाळ संध्याकाळी रिकाम्या पोटी घेणे.
१०) पाश्र्वशूल, बरगडय़ात दुखणे – पाणी होणे, सतत सर्दी, पडसे, बारीक ताप ही प्लुरसीची लक्षणे असताना नागरादिकषाय चार चमचे समभाग पाण्याबरोबर जेवणानंतर घ्यावे. लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, आरोग्यवर्धिनी तीन गोळ्या, ल. मा. वसंत सहा गोळ्या, दोन वेळा मध, सुंठ, आल्याच्या वा तुळशीच्या रसाबरोबर घ्याव्यात.
११) अतिसार – वारंवार जुलाब, मलप्रवृत्ती, भूकमंद अशी लक्षणे असल्यास कुटजादिकषाय ३ चमचे, संजीवनी वटी, प्रवाळपंचामृत प्र. ३ व पाचकचूर्ण अर्धा चमचा दोन वेळा घ्यावे. दाडीमाद्यावलेह सकाळी घ्यावा.
१२) प्रतिलोम क्षयातील दुबळेपणा – वजन घटणे, भूक नसणे, डोके बधीर होणे, घाबरटपणा अशी लक्षणे असल्यास च्यवनप्राश २ चमचे सकाळ सायं. १ कप दुधाबरोबर घ्यावा. सोबत चंद्रप्रभा, ब्राह्मीवटी, सुवर्णमाक्षिकादिवटी, शंृगभस्म गोळ्या प्र. ३ ,  २ वेळा घ्याव्यात. वाकेरीभातेचूर्ण एक चमचा दुधासह २ वेळा घ्यावे.
१३) दुबळेपणा – सार्वदेहिक उष्णता, रसक्षय अशी लक्षणे असल्यास कुष्मांडपाक तीन चमचे सोबत प्रवाळ, कामदुधा, शंृग, चंद्रप्रभा प्र. ३ गोळ्या दोन वेळा घेणे.
१४) श्वास – हे प्रमुख लक्षण असताना तालिसादिचूर्ण चिमूटभर मधाबरोबर वेगकाली चाटणस्वरूपात घ्यावे. शंृग, लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश प्र. तीन गोळ्या व रजन्यादि सहा गोळ्या दोन वेळा, नागरादिकषाय चार चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावे. पिंपळीचूर्ण चिमुटभर, एक कप दूध व पाणी असे उकळून दूध सिद्ध करून सकाळी प्यावे.
१५) बालकांना खोकला, कृशता, भूकमंद – ही लक्षणे असताना नवजीवन तीन चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण प्र. तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      सोज्वळ मूर्ती/ लढाऊ भाषा
ज्ञानेश्वरांच्या सोज्वळ मूर्तीमुळे होणाऱ्या मानसिक गोंधळाबद्दल मागच्या लेखात लिहिले. आता खालच्या मी ओबडधोबड केलेल्या परंतु मथितार्थ न बदललेल्या ओव्या कृपा करून वाचाव्या ही विनंती. अर्जुन लढणार नाही असा पवित्रा घेत घेत ढेपाळला आहे तेव्हाचे हे दृश्य आहे.
भलत्या वेळी। भलतीच गोष्ट। जागा हो। घात दिसतो आहे स्पष्ट।।
उगीचच हा गलबला। आपला धर्म जर आचरला। तर होणार कसा घात।।
म्हणून घे लक्षात। ठेव ध्यानात। योद्धय़ाला युद्ध। एकमेव।।
निष्कपटता बाणावी। घावांची उसनवारी परतवावी।
हे युद्ध। तुझे सुदैव। सर्व धर्माचा ठेवा। आयता आपसूक।।
हा लढा। म्हणजे स्वर्गच। पराक्रमच अवतरला। होऊन मूर्त।।
अशा युद्धाला नकार। वर शोक करशील उगाचच।
आपणहून करशील। आपला घात।।
आज शस्त्र टाकले। तर जे पूर्वजांनी मिळवले। ते फुकट गेले। ह्य़ा रणात।।
असलेली लोपेल कीर्ति। जगाचे शिव्याशाप घेशी।
पापे शोधीत येतील। तुझ्या मागे।।
रानात पडलेले प्रेत। गिधाडांना उत्तम बेत। धर्मावाचून थेट। पापांचा प्रवेश।।
तु म्हणे द्वेष मुक्त। आणि दयेने परिपूर्ण।
पण हे शत्रूंना। नक्कीच नसेल पसंत।।
तुला हे घेरतील। बाणांचा वर्षांव करतील।
असशील मोठा दयावान। पण हे तुला का सोडतील।।
समजा निसटलास। तर मग उरलेला जीवन प्रवास।
म्हणजे मरणाहूनही। वाईट पाश।।
दयेपोटी जरी। फिरलास माघारी। तरी ह्य़ांचा। कसा बसेल विश्वास।।
म्हणतील पळाला रे पळाला। अर्जुन आम्हाला घाबरला।
मग फक्त उरला। निंदेचा व्याप।।
तुला पकडतील। नामुष्की करतील। आणि वरती। हिणवतील।।
या रणात लढताना। येणार असेल मृत्यू। तर भोगशील। स्वर्ग तू।।
हे विचार। सोडून दे लवकर। उचल धनुष्यबाण। लढू लाग सत्वर।।
.. माझ्या बेकार भाषांतराचे सोडून द्या. परंतु ज्ञानेश्वर जे म्हणत आहेत ते त्यांच्या छबीशी जुळते?
 शिवाय ज्ञानेश्वर इथे स्वर्गाबद्दल बोलताहेत. पुढे ते म्हणणार आहेत, कसला स्वर्ग आणि कसला नरक. ऋतुमास कोठलाही असो इथेच आणि आताच तुला मोक्ष मिळू शकतो. ज्ञानेश्वरांच्या हे बहुरूपीपणाचे कारण असे की अर्जुन अजून खालच्या इयत्तेत आहे. ज्ञानेश्वरांना त्यांच्या बहुरूपी मुद्रेत न्याहाळण्यातच खरी गंमत आहे.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २० जुलै
१८१८ > गंगाधरशास्त्री कृष्णाजीपंत पटवर्धन यांचा पंढरपुरात खून. ‘गंगाधरशास्त्री पटवर्धनांचे आत्मचरित्र’ या पुस्तकातून पेशवाई तसेच नंतरचा इतिहास समजतो.
१८९८ > वैद्यकीय पुस्तकांचे लेखक विष्णू गोपाळ आपटे यांचे निधन. डॉक्टर असणाऱ्या आपटय़ांनी ‘ग्रामवैद्य अथवा खेडय़ांतील प्रजा निरोगी राहण्याचे उपाय’, ‘न्यायवैद्यक’ तसेच ‘प्रसूतिचिकित्सा’ ही पुस्तके लिहिली.
१९१९ > महाराष्ट्र साहित्य- संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांचा जन्म. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.‘इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली’, ‘परामर्श’ व ‘थिंकर्स अकॅडमी जर्नल’ (ताज) ही नियतकालिके त्यांनी सुरू केली. डिसेंबर ’९७मध्ये त्यांचे निधन झाले.
१९४३ > तत्त्वचिंतक, कादंबरीकार, साहित्य समीक्षक वामन मल्हार जोशी यांचे निधन. ‘रागिणी ऊर्फ काव्यशास्त्रविनोद’ ही त्यांची पहिलीच कादंबरी गाजली. त्यानंतरच्या कादंबऱ्यांपैकी ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’ त स्त्रीविषयक प्रश्नांची चर्चा, तर ‘सुशीलेचा देव’ आधुनिक काळातील स्त्रीचे प्रगल्भ चित्र या कादंबरीतून रेखाटले, तर ‘इंदू काळे, सरला भोळे’ या पत्रात्मक कादंबरीतून विवाह, घटस्फोट यांवर मते व्यक्त केली.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2013 1:14 am

Web Title: curiosity delivery period of cows and buffaloes
Next Stories
1 कुतूहल – गाय/म्हशीतील वार (जार)
2 कुतूहल – गायी/म्हशींच्या वेतांतील महत्त्वाचे दिवस
3 कुतूहल – गायी-म्हशींसाठी पाणी
Just Now!
X