कधी कधी अडचणीही जीवनाला वळण देऊ शकतात. गोटिखडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावातील एका गरीब कुटुंबाचेही असेच झाले. १९७२ सालच्या दुष्काळात आक्काताई विठ्ठल पाटील यांचे कुटुंब होरपळून निघाले. नवऱ्याची पहिली पत्नी औषधाविना वारली. कालांतराने नवराही स्वर्गवासी झाला. मोठय़ा मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत होता. परंतु कुटुंबकर्त्यां आक्काताईंनी मुलांना कल्पना दिली की, आपल्याला या परिस्थितीत उच्च शिक्षण घेता येणार नाही, तेव्हा कष्ट करून पोट भरा. मिळेल ते काम करा, मात्र एकोप्याने राहा. मुलांनी आपल्या आईचा उपदेश मानून एकोप्याने राहून कष्टाची कास धरली. शेतात स्वकष्टाने विहीर बांधली. पुढे विहिरीत आडव्या बोअर करून पाणी वाढवून बागायतीत वाढ केली. ठिबकसिंचनाचा फायदा कळल्यावर एक हेक्टरवर ठिबकसिंचन संच बसवला. त्यामुळे बागायतही वाढले व पिकाला पाहिजे तसे पाणी मिळाल्याने उत्पादनही वाढले.
 मुले सुशिक्षित असल्याने शेतीतील नव्या प्रयोगाचा मागोवा घेत गेली. शेतीच्या जोडीला जनावरे पाळून दुधाचा उद्योग सुरू केला. बारमाही हिरवी वैरण मिळावी म्हणून संकरित नेपियर गवताची लागवड केली. घरच्या जनावरांचे मलमूत्र व शेतातील काडीकचरा आणि झाडांचा पालापाचोळा यांपासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट खड्डे खणले. कुटुंबीयांनी बारमाही फळे मिळावीत म्हणून बांधावर फळझाडे लावली. घरच्या सर्वाना मनसोक्त फळे खायला मिळून उरलेल्या फळांपासून त्यांना वर्षांला पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले व ते पुढे वाढू लागले. यातून आक्काताईंनी आपले नवीन घर आधुनिक सोयींनी सुसज्ज केले. आक्काताई अशा हताश लोकांना एकच संदेश देऊ इच्छितात,  ‘टोकाच्या बिकट परिस्थितीचाही धर्याने सामना करा. अपार कष्ट, सचोटी, काटकसर व निव्र्यसनीपणा यांना पर्याय नाही. ऋण काढून सण नको. आत्महत्या हा तर त्यावरचा मार्ग नव्हेच.’

वॉर अँड पीस: सक्षम हृदयाकरिता-  मूत्रपिंडाची मदत
रक्तदाब, ईसीजी, अँजिओग्राफी, स्ट्रेसटेस्ट, लिपिड प्रोफाईल, रक्ततपासणी यांबद्दल दुमत अजिबात नाही. पण संबंधित रुग्णाला त्याच्या एकूण मूत्रवहस्रोताच्या कमी-अधिक स्वास्थ्याबद्दल  विचारण्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. आपले मूत्रपिंड म्हणजे जिवंत पाण्याचे भरपूर झरे असणारी एक विहीरच जणूकाही आहे.  मूत्रपिंडामध्ये सहजपणे भरपूर लघवी निर्माण  करण्याची क्रिया अखंडपणे चालू असते. या प्रक्रियेत विक्षेप आला की नंतर लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब  वाढतो. हृदय जोरात काम करू लागते. धाप लागते. संबंधित रुग्ण  फाफूं करतो.
अशावेळी आधुनिक वैद्यकातील तज्ज्ञ मंडळी लॅसिक्ससारख्या गोळ्या देऊन हृदयावरचा आलेला दबाव कमी होईल अशी अपेक्षा करतात. या  गोळ्यांनी थोडी अधिक  मूत्रप्रवृत्ती होऊन रुग्णाला निश्चितपणे तात्पुरते  बरे वाटते. पण आपल्या मूत्रपिंडकार्याची हानी लॅसिक्सच्या दीर्घकाळच्या वापराने नक्कीच होते. आमरसाची गोडी चाखण्याकरिता आपण चुकून कच्चा आंबा पिळला तर आमरसही मिळत नाही व आंब्याचीही हानी होते. असेच लॅसिक्सच्या अनियंत्रित वापराने हृद्रोगी मंडळींना भोगावे लागते. आयुर्वेदीय औषधी महासागरात याकरिता सोन्या-चांदीसारखी दोन निरपायी औषधे निरंतरपणे हृद्रोगी माणसाला शंभर टक्के मदत करतात.  ज्या हृद्रोग्याच्या पायावर सूज आहे, पोटरीच्या आसपास दाबले असता खड्डा पडतो, रक्तदाब सतत वाढत असतो, लघवी मोकळी होत नाही, त्याने सकाळ- संध्याकाळ गोक्षुरादीगुग्गुळ ६ गोळ्या, रसायनचूर्ण १ चमचा दोनदा अवश्य घ्यावे. लघवीला तिडीक मारत असेल तर चंदनादिवटी ६ गोळ्या दोनदा, उपळसरी चूर्ण १ चमचा ही जादा औषधे घ्यावी. कटाक्षाने मीठ टाळावे. लोणची, पापड, शिळे अन्न वज्र्य करावे. हृद्रोगाची नेहमीची औषधे अर्जुनारिष्ट, शृंगभस्म, सुवर्णमाक्षिकादि, अभ्रकमिश्रण ही औषधे  चालूच ठेवावी. मंद पचन असल्यास भोजनोत्तर आम्लपित्तवटी, मलावरोध असल्यास रात्रौ गंधर्वहरीतकी वा त्रिफळाचूर्ण घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      ज्ञानेश्वरांचा ज्ञान यज्ञ
श्रीकृष्णाने गीता संस्कृतमध्ये सांगितली ती लोकांना समजेना म्हणून ज्ञानेश्वरांच्या रूपाने त्याने मग ती मराठीत सांगितली, अशी एक भाबडी समजूत आहे; परंतु ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे आणि तो गीतेच्या श्लोकांशिवाय सलग सांगितला गेला, अशी दुसरी एक टोकाची भूमिका आहे. केळकर-मंगरूळकर यांची ज्ञानदेवी गीतेच्या श्लोकाशिवाय सलग वाचता येते हे तर खरेच; परंतु ज्ञानेश्वर गीतेहून निराळे, पुढचे सांगतात हे सुचविण्यासाठी मधून मधून श्लोक देऊन इथे ज्ञानेश्वर गीतेच्या पुढे पाऊल टाकतात, असे सुचविले आहे. त्याचे उत्तम उदाहरण नवव्या अध्यायाच्या १५ व्या श्लोकावरचे ज्ञानेश्वरांचे व्याख्यान (ओव्या) आहे. श्लोकात ज्ञान यज्ञाचा उल्लेख आहे, पण हा ज्ञानयज्ञ ज्ञानेश्वरांच्या भाषेत मानवी जीवनाचे उत्तम विश्लेषण करीत जी प्रतिमा निर्माण करते ते ‘अरूपाचे रूप बोली दाववीन’ या त्यांच्याच उक्तीला साजेसे आहे.
काहीतरी संकल्प होता म्हणून विश्व अवतरले असे आपल्यात काही लोक मानतात ब्रह्माला संकल्प विकल्प नसतो हे गृहीतक बाजूला ठेवून केलेले हे दोषपूर्ण वेदोक्त आहे. यज्ञात जो प्राणी बळी देत त्याला एका खांबाला बांधत असत. हा संकल्प म्हणजे तो खांब (युपू) असे विधान या ओव्यांमध्ये येते (आदी संकल्पु हा युपू आणि त्याला जो पशु बांधायचा आहे त्याला भेद म्हटले आहे. (भेद म्हणजे आपपर किंवा दुजा भाव) हा यज्ञ पंच महाभूतांच्या मांडवाखाली होणार आहे. वरील संकल्पाचे पहिले निर्माण पंच महाभूते होती. पंचमहाभूतांमध्येच गुणांनी युक्त सृष्टी निर्माण झाली. त्यातच प्राण अवरला आणि इंद्रियेही आली. यज्ञाचे सामान म्हणजे ही इंद्रिये आणि प्राण आहेत आणि जर ज्ञानाचा अग्नी पेटायचा असेल तर त्याला तूप लागते ते तूप म्हणजे अज्ञान जळण म्हणून वापरायचे (अज्ञात घृत) आपल्याला मन आणि बुद्धी आहे. ती स्वतंत्रपणे विचार करताना बहिर्मुख होतात तिथे जग बघतात आपण निराळे आहोत, अशी समजूत होते किंवा करून घेतात म्हणून मन बुद्धी यांना भिंती असतात असे म्हटले आहे, पण मनबुद्धीच्या आतले चैतन्य हा उघड अग्नी आहे आणि बाहेरच्या यज्ञाचे जे कुंड आहे ते समतेचे आहे, अशी कल्पना मांडली जाते. (साम्य ही वेदी जाण. वेदी यज्ञकुंडाचा चौकोन) बुद्धी ही गोष्ट नुसती निरीक्षणापुरती मर्यादित नसते त्या निरीक्षणातून भेदापलीकडचा ऐक्यभावनेचा समतेचा विवेकही जागृत होऊ शकतो. हा विवेक जागृत झालेला जीव यज्ञ करतो आहे, अशा प्रतिमेतून मग या ओव्या आटोपल्या जातात.
या यज्ञाचा यजमान (लिंग) जात, धर्मई वर्णवंश, यावर ठरत नाही. पंचमहाभूतांच्या मांडवाखाली जन्मलेल्या प्रत्येक मानवाला किंवा मानवीला हा यज्ञ करण्याचा अधिकार आहे.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १६ नोव्हेंबर
१८९४ > काव्यविहार, स्फूर्तिलहरी, स्फूर्तिनिनाद आणि स्फूर्तिविलास हे चार काव्यसंग्रह व माझे वाङ्मयीन जीवन, नाटय़सुगंध तसेच नाटककार गो. ब. देवल व्यक्ती आणि कार्य ही गद्य पुस्तके लिहिणारे ‘कवी काव्यविहारी’ – धोंडो वासुदेव गद्रे- यांचा जन्म. त्यांचे निधन १९७५ मध्ये झाले.
१९०८ > संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर यांचा जन्म. परामर्श, तरंग आणि तुषार ही त्यांच्या समीक्षालेखांची संकलित पुस्तके, तर ‘हरिभाऊ : काळ आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ त्यांनी संपादित केला होता.
१९७६ > कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार, तसेच ‘माणूस’ या टोपणनावाने वृत्तपत्रीय लेखन करणारे अंबादास शंकर अग्निहोत्री यांचे निधन. मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह.
१९३०> लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक निर्मलकुमार जिनदास फडकुले यांचा जन्म. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘साहित्यातील प्रकाशधारा’, ‘लोकहितवादी : काळ आणि कर्तृत्व’, ‘चिपळूणकरांचे तीन निबंध’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘संत चोखामेळा आणि इतर समकालीन संतांच्या रचना’, ‘संत तुकाराम: एक चिंतन’ आदी पुस्तके महत्त्वाची आहेत.
संजय वझरेकर