हर्षां गणेशपुरे या अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा गावच्या महिला शेतकरी. हर्षांताई व त्यांची फुलशेती आज अनभोरा गावाची ओळख बनलेली आहे. दहा वर्षांपूर्वी याच हर्षांताई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायच्या. मात्र काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असलेल्या हर्षांताईंनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फुलशेतीची सुरुवात केली आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं.
राष्ट्रीय फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत योजनेतून त्यांनी झेंडू, ग्लॅडिओलस, गिलाíडया, निशिगंध, गुलाब, लीली या फुलांची लागवड केली. त्यांच्या शेतीच्या प्रयत्नांना त्यांच्या पतीने आणि सासऱ्यांनी चांगली साथ दिली. फुलशेतीचे तंत्र समजून घेण्यासाठी त्यांनी यशस्वी फुलशेती केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. वेगवेगळ्या फुलांची लागवड, व्यवस्थापन, त्यांचा बाजार या गोष्टींची माहिती करून घेतली. उत्पादनाची शेतातील सगळी कामे हर्षांताई पाहातात. तर त्यांचे पती आणि मुलगा विक्रीचे काम सांभाळतात. दहा गुंठय़ांपासून सुरू झालेली त्यांची फुलशेती आता चार एकरांवर पसरली आहे. या शेतात तयार झालेली फुलं अकोला, मूर्तिजापूर आणि अमरावतीच्या बाजारात पोहोचली आहेत.
लागवडीसाठी लागणारी रोपं, कंद यांची निर्मितीदेखील हर्षांताई स्वत: करत असल्याने त्यांना उत्पादनखर्च कमी येतो. फुलांची लागवड, खतं, किटकनाशकं, तोडणी आणि वाहतूक यांवर त्यांचा वार्षकि खर्च दीड ते दोन लाख रुपये होतो. वेगवेगळ्या फुलांच्या विक्रीतून वर्षभरात त्यांना सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
हर्षांताईंच्या या प्रयोगशीलतेमुळे त्यांना सह्य़ाद्री वाहिनीचा कृषी गौरव पुरस्कार, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार, कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांना स्वामीनाथन फाऊंडेशनची फेलोशिपदेखील मिळाली आहे.
फुलशेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच हर्षांताई शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फुलशेती करू पाहाणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना त्या मोफत सल्ला देतात. इतकंच नाही तर, इच्छुक शेतकऱ्यांना त्या कमी दराने बियाणेसुद्धा देतात.
बदलत्या काळाचं भान प्रत्येक क्षेत्रात बाळगलं तरच तुमचा टिकाव लागू शकतो, हे वास्तव हर्षांताईंनी स्वतच्या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.

वॉर अँड पीस: उंची वाढविण्याकरिता : आयुर्वेदीय उपचार- भाग १
पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतीय माणसाची उंची तुलनेने कमी असते. नुकताच वृत्तपत्रांत आमचे राष्ट्रपती मान वर करून एका युरोपीय राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करताहेत, असा गमतीदार फोटो बरेच काही सांगून जातो. भारतातील काही राज्यात पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, तसेच पाकिस्तानमधील सिंध, बलुचीस्तान, सरहद्द प्रांत येथील सामान्य माणसांची उंची बहुधा सहा फुटी असते. मराठी माणूस सव्वापाच ते साडेपाच पुरुष व स्त्रिया पाच ते सव्वापाच अशा उंचीच्या सामान्यपणे आढळतात.
 मी सोळा वर्षांचा असताना उंची फक्त चार फूट १० इंच होती. लोकमान्य टिळकांची उंचीसंबंधित आठवण वाचून पुण्यातील टिळक तलावात रोज दीड-दोन तास, तीस फे ऱ्यांचे पोहणे सुरू केले. उंची पाच फूट साडेतीन इंच झाली. त्यामुळेच भारतीय विमानदलात एकोणीसाव्या वर्षी वायुसैनिक म्हणून फिट होऊ शकलो.
अलिकडे अनेकानेक पालक आपल्या लहानग्यांना घेऊन माझ्याकडे येतात. ‘उंची वाढेल असे काहीतरी करा’ असा आग्रह धरत असतात. उंची मागची शारीरिक आणि मानसिक कारणे समजून घेऊ या. ‘उंची वाढणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी मी काय करणार?’ असे म्हणून हातावर हात धरून बसण्याने काहीही होणार नाही त्यासाठी प्रयत्न धडपड, व्यायाम, योगासने, औषधे यांचा उपयोग केला पाहिजे.
आयुर्वेदिक औषधोपचारांच्या साहाय्याने उंची वाढू शकते. तीसुद्धा कोणतेही साइडइफेक्ट्स किंवा त्रास न होता. उंची या विषयाशी संबंधित सामान्य माणसांमध्ये अनेक शंका किंवा ‘मुलींची उंची पाळी आल्यानंतर वाढत नाही’ यासारख्या अनेक चुकीच्या समजुती असतात. मुलांच्या हाडांची पूर्ण वाढ लहानपणी झालेली नसते. प्रत्येक हाडाच्या दोन भागांमध्ये पोकळी असते. वयोमानानुसार शरीराच्या इतर अवयवाबरोबर या पोकळी असलेल्या भागामध्येही वाढ होत असते. त्यामुळे उंची वाढत असते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..       पाणी
हे लिहितो आहे तेव्हा २०१३ सालचा वैशाख रणरणायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांत पाण्यासाठी वणवण आहे. आश्चर्य हे की, चौतीस कोटींचा हा आपला देश होता तेव्हा आपल्यावर अन्न आयात करावे लागायचे, आता लोकसंख्या तिपटीने वाढली तरी धान्यांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत; परंतु पिण्याच्या पाण्याला मोताद झालो आहोत. जे बादलीभर जपून हळूहळू ओतले तर एका मक्याच्या दाण्यातून चार-पाच शेकडो दाण्यांची कणसे देते, त्या पाण्यावर आपण अन्याय केला असणार त्याशिवाय ते आपल्यावर उलटलेले नाही.
भ्रष्टाचार आहे आणि राहणारच आहे, म्हणूनच तो कायदेशीर करावा असा एक सूर आहे. पण पैसे पेरून जर कामे होणार नसतील आणि एक ना धड भाराभर चिंध्या या न्यायाने जर सगळीच धरणे अपूर्ण स्थितीत राहणार असतील तर मग पाण्याने तरी काय करावे? मोठय़ा धरणाबद्दल बराच वादविवाद आहे, पण गावपातळीवरच्या छोटय़ा योजनांचे काय झाले? लहान धरणाच्या पुरस्कर्त्यांच्या आता हे लक्षात येऊ लागले आहे की, तिथेही भ्रष्टाचार आहे. मला गंमत वाटते ती ही की, आपले राज्यकर्ते खेडय़ापाडय़ांतले. तेही आता पूर्वीसारखे अंगठाछाप नाहीत. सगळे शिकले-सवरलेले आहेत. आपण जे पाण्याच्या बाबतीत करतो आहोत किंवा करीत नाही आहोत त्याचे गंभीर दुष्परिणाम होतील. उसाच्या पिकावर पाणी ओतले तर बाकी ठिकाणी कमी पडेल. जे गावपातळीवर आपल्याला निवडून देतात त्यांना जलसंधारणाबद्दल समजावले, त्यांच्याकडून ती कामे करून घेतली, त्याला आर्थिक मदत केली तर मग हाच गावकरी आपल्याला निश्चितपणे निवडून देईल. आणि मग सत्तेवर आल्यावर आपले मनसुबे आपल्याला पाहिजे तसे रचता येतीलही याची साधी जाण या मंडळींना का नाही? मुंबई, पुणे, नागपूरला येऊन लाल दिव्याच्या गाडीतून जरूर मिरवा; परंतु ज्यांच्या जोरावर ही सत्ता आली त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत म्हणजे आपलाही स्वार्थ साधेल ही खरेतर साधी समजूत. तीही नाही. पिण्याचे पाणी नाही म्हटल्यावर आता उसाला ठिबक सिंचन वापरा असे म्हणणे म्हणजे आग लागल्यावर विहीर खणण्यासारखे झाले. हे कसले आले आहेत जाणते राजे?
 प्रत्येक नदीच्या खोऱ्याचे संरक्षण करून त्याचे पाणीवाटप करावे अशा उद्देशाने एक सल्लागार समिती नेमावी असे मधे ठरले, त्याच्यावर माझा चुलतभाऊ नियुक्त झाला. योजना कार्यान्वित करायची तर माहिती हवी, ती त्याने मागितली. त्यानंतर दोन वर्षे गेली तरी कागदाचे एक चिठूर हलले नाही. याचे कारण ती माहिती सत्ताधीशांच्या बुरुजांना सुरुंगासारखी ठरली असती.
 असे का होते, असे प्रश्न अर्जुनानेही विचारले होते. त्याबद्दल उद्यापासून.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ६ नोव्हेंबर
१८७१ > ‘आजचे महाराष्ट्रसारस्वत’ हे या सदराचे नाव ज्यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ या ग्रंथावरून देण्यात आले आहे, ते विनायक लक्ष्मण भावे यांचा जन्म. मराठी वाङ्मयाचा इतिहास त्यांनी ‘महाराष्ट्र सारस्वत’ या दीर्घ निबंधवजा ग्रंथातून मांडला होता, त्याच्या द्वितीयावृत्तीत (१९१९) महानुभाव वाङ्मयाची भर त्यांनी घातली.  नागेश कवींचे सीतास्वयंवर, रुक्मिणीस्वयंवर, तुकाराम गाथा, शिशुपालवध व वच्छाहरण हे महानुभव ग्रंथ, ‘मराठी दप्तर’ या त्यांनीच स्थापलेल्या प्रकाशनातर्फे ‘श्रीमंत महाराज भोसले यांची बखर’ व ‘सरदार गोखले यांची कैफियत’ हे आदींचे संपादन त्यांनी केले.
१९०१> ‘टीकाविवेक’, ‘उमर खय्यामची कैफियत’ आदी समीक्षापुस्तके,  आधुनिक विवाहपद्धतीतील दोष टिपणारी राक्षसविवाह ही कादंबरी, तसेच ‘आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकुर’सारखे चरित्रपुस्तक  यांचे लेखक, समीक्षक श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांचा जन्म.
१९८७> नाटय़दिग्दर्शक आणि विज्ञानलेखक भालचंद्र वामन केळकर यांचे निधन. पीडीए या नाटय़संस्थेमुळे ‘भालबा’ ओळखले जात, परंतु ‘तो तो नव्हताच’, ‘असा देव असे भक्त’ आदी पुस्तके, किशोरांसाठी विज्ञानकथा व कादंबरिका असे त्यांचे लेखन होते.
संजय वझरेकर