पिकलेली केळी हे उत्तम पौष्टिक खाद्य आहे. केळफूल, कच्ची केळी आणि खोडसुद्धा विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पशुखाद्यातही केळीच्या अवशेषांचा उपयोग होतो. फुले, फळे यांचा आच्छादनांसाठी तसेच दोर बनवण्यासाठी उपयोग होतो. केरळमध्ये केळीच्या दोरापासून शोभेच्या वस्तू बनवण्याचा हस्तकला उद्योग मोठय़ा प्रमाणात चालतो.
 केळीपासून प्युरी हा पदार्थ बनवला जातो. केळी धुवून, साल काढून त्याचा लगदा करून घ्यावा. हा लगदा र्निजतुक करून हवाबंद डब्यात भरावा. मिल्क शेक, आइस्क्रीम अशी उत्पादने करताना ही प्युरी वापरतात. पिकलेल्या केळ्यांची साल काढून लगदा केल्यावर स्प्रेड्रायरमध्ये भुकटी करतात. केळ्यांपासून तयार केलेल्या चिप्स तर सर्वत्र आवडीने खाल्ल्या जातात.              
एकदा केरळमध्ये मोठे वादळ आले. केळीची झाडे घडांसह पडली. मोठे नुकसान झाले. अशा वेळी एका उद्योजकाने कच्च्या केळय़ांचे लोणचे करून आसपासच्या उपाहारगृहांतून विक्री करायला सुरुवात केली. त्याची यशोगाथा ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ या संस्थेने प्रसारित केली.
 चीनमध्ये एक मोठा टोमॅटो प्रक्रिया उद्योग आहे. पन्नास किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात फक्त टोमॅटोची वैशिष्टय़पूर्ण लागवड आणि त्यावर आधारित दिवसाला पाचशे टन टोमॅटोची उत्पादने.
महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादन करणाऱ्या प्रत्येक जिल्हय़ात असा उद्योग उभा राहिला तर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ कधीच येणार नाही. आपल्याकडे टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण फार जास्त असते. त्यामुळे कच्च्या मालापासून पक्क्या मालाचे उत्पादन कमी होते आणि त्यासाठी इंधनही जास्त खर्च होते.
 टोमॅटोपासून रस, केचप, प्युरी, पेस्ट, सूप ही उत्पादने बनवली जातात. प्रक्रिया करण्यासाठी झाडावर पिकलेल्या लाल फळांचाच उपयोग करावा आणि स्टेनलेस स्टीलचीच भांडी वापरावीत. टोमॅटोचा रस हे उत्पादन लोकप्रिय करण्यासाठी शहरांमध्ये व्हेंडिंग यंत्राचा विचार करता येईल.
फळभाज्यांमध्ये टोमॅटो हे महत्त्वाचे पीक आहे. मात्र सर्व उत्पादक एकाच वेळेस त्यांचा माल बाजारात आणतात. त्यामुळे हवी तशी किंमत मिळत नाही. या उद्योगात नुकसान होऊ नये म्हणून प्रक्रिया उद्योग वाढीस लागला पाहिजे.

वॉर अँड पीस: अतिरेकी व्यसनांची शिकार : जंकी-फंकी समस्या
देशाच्या मोठमोठय़ा शहरांत विशेषत: मुंबईसारख्या शहरांत ड्रग अ‍ॅडिक्टची संख्या वाढत आहे. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शहरातही ड्रगमाफियांच्या उत्तेजनामुळे उत्तररात्री, दूरदूरच्या वस्तीत मद्य व अन्य व्यसनांनी धुंद गुंडपुंडांमुळे स्त्रिया व मुले सतत भीतीच्या छायेखाली वावरत असतात. चरस, अफू, गांजा, दारूचे विविध प्रकार, तरुण गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी पकडले गेले तर त्यांना जामीन मिळतो. यात पालकांचे काहीच चुकत नसते. पण जी तरुण मुले दीर्घकाळ आपल्या खोटय़ा मानमरातबाच्या कल्पना, दु:ख विसरण्याकरिता किंवा क्षणिक आनंदाकरिता व्यसनांच्या अधीन होतात, त्यांना भावनिक समस्या सुरू होतात. त्याला इमोशनल विथड्रॉवल सिम्टम असे म्हणतात. खूप घाबरणे, प्रचंड अस्वस्थता, चिडचिड, विलक्षण विस्मरण, तीव्र डोकेदुखी, कशातही लक्ष न लागणे, हातपाय गळणे, सर्वापासून अलिप्त राहणे असे वागणे सुरू होते. काहीजण व्यसनांची विविध द्रव्ये नाकारल्यामुळे तोडफोड, डोके आपटणे, क्वचित आत्मघातासारखे प्रयत्न करतानाही दिसतात.
व्यसनाचे पदार्थ पूर्ण बंद झाल्याबरोबर काही वेळेस शरीरास प्रचंड घाम येतो. हृदयाची  धडधड वाढते. नाडीचे, श्वसनाचे ठोके वाढतात. स्नायू ताठतात. छातीत जडपणा येतो. श्वासाला त्रास होतो. कंप वाढतो, अन्नावरची वासना उडून जाते. शेवटी जुलाब वा उलटय़ांसारख्या रोगांनी शरीर रोडावते. माझ्या गेल्या चाळीसहून अधिक काळच्या वैद्यकीय व्यवसायात अशा जंकी, फंकी तरुण मुलांना विश्वासात घेऊन पुढील आयुष्याकरिता उपयुक्त सक्रिय मार्गदर्शन केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अशा दुर्दैवी मुलांना मुगाचे लाडू, कोहळय़ाच्या वडय़ा, नारळाच्या वडय़ा, गुलकंद,  मोरावळा, बटाटय़ाचा उपवासाचा चिवडा, शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा लाहय़ा असे विविध पदार्थ आलटून पालटून द्यावेत. प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, उपळसरीचूर्ण, मौक्तिक भस्म यांची योजना निश्चयाने फलदायी ठरते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १३ नोव्हेंबर
१८७३> लेखक, विधिज्ञ, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म. ‘स्टडीज इन वेदान्त’ या संपादित पुस्तकांसह हिंदू धर्मासंबंधीचे विचार त्यांनी ‘मराठीमंदिर’ या नियतकालिकातून मांडले. याशिवाय स्वत:चे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.
१९१८>  निबंधकार, भाषांतरकार काशीनाथ बाळकृष्ण मराठे यांचे निधन. सरकारी शिक्षण खात्याच्या आदेशानुसार त्यांनी ज्योतिषशास्त्र, भूवर्णन, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र ही पुस्तके इंग्रजीवरून भाषांतरित केली.
१९२८> लेखक, विचारवंत, संपादक विश्वास रघुनाथ पाटील यांचा जन्म. ‘नवी क्षितिजे’ हे नियतकालिक त्यांनी सुरू केले. प्लेटो, फ्रॉइड यासंबंधीचे त्यांचे लेखन त्यांच्या व्यासंगाची ग्वाही देते. तथापि त्यांचे पुष्कळसे लेखन अनुवादित आहे.
१९४२> कृषीविषयक लेखक गणेश केशव केळकर यांचे निधन. ‘ज्ञानकोशाचा शेतकी विभागाचे ते संपादक. ‘जमीन मशागत व शेतकीचे आडते’ या ग्रंथासह शेतीसंबंधी ८ ते ९ पुस्तके प्रकाशित.
२००१> लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन. ‘दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार.
संजय वझरेकर

जे देखे रवी.. यज्ञ
उष्णता हे आपल्या विश्वाचे गमक आहे. ब्रह्मात उत्पन्न झालेल्या उष्णतेमुळे स्फोटातून ठिकऱ्या उडाव्यात तसे हे विश्व अवतरले ती उष्णता काही काही ठिकाणी अजून धगधगते आहे. काही ठिकाणचे निखारे अजून शमलेले नाहीत आणि काही ठिकाणी नुसती राख उरली असली तरी त्या राखेतही अणूच्या आत उष्णता लवलवते आहे. आपला धगधगणारा तारा म्हणजे सूर्य. याच्यावर आपल्या पृथ्वीवरचे व्यवहार अवलंबून आहेत, असा कयास माणसाने करून काही लाख वर्षे गेली असणार जे सूर्य करतो तेच पृथ्वीवर अग्नी करतो ही खूणगाठ माणसाने वणव्यांमधल्या प्रकाशातून किंवा त्याच्या उष्णतेमधून अनुभवली असणार. पुढे ठिणगी पाडून जेव्हा त्याने अग्नी स्वत:च तयार केला तेव्हा अकलेची आणखी एक ठिणगी पडली असणार की आता थोडय़ाफार प्रमाणात आपल्या हातात आहे म्हणूनच खळग्यात पेटवलेली शेकोटी हे सूर्याचे तोंड म्हणायला त्याने सुरुवात केली. अग्नी काय किंवा सूर्य काय तो प्रकाश पाडतो म्हणून आपल्याला दिसते तेव्हा मानवी इंद्रियांमधले डोळे सूर्याचे अपत्य आहे असाही कल्पनाविलास त्याने केला. अग्नी आणि सूर्य आपल्याला उपयुक्त आहे. आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. तेव्हा त्याला काहीतरी परत करावे या दृष्टीने अग्निपूजा सुरू झाली आणि त्याचा पुढे यज्ञ झाला.
पंडित सातवळेकरांच्या मताप्रमाणे यज्ञ हा शब्द यज या धातूपासून आला आहे आणि त्याचे सन्मान करणे, त्याग करणे आणि संगतीकरण करणे, असे तीन अर्थ आहेत. संगतीकरण हा अर्थ मला शब्दकोशात सापडला नाही. दुसरे दोन सापडले.  सन्मान आपल्यापेक्षा मोठय़ा गोष्टीचा करतात तेव्हा इथे सूर्य किंवा निसर्ग किंवा देवता अभिप्रेत असणार. त्यांना जेव्हा काहीतरी दिले जाते त्याला त्यागाचे स्वरूप येते.
इथे आल्यानंतर दिले गेले की, पुढे काहीतरी मिळावे म्हणून दिले हा सूक्ष्म आणि बटबटीत फरक कळेनासा झाला असणार.
 माणसाला जन्माला घातले तेव्हा त्याला यज्ञ आणि छंद दोन गोष्टी ब्रह्मदेवाने दिल्या अशी एक जुनी गोष्ट आहे. त्याबरहुकूम या यज्ञ नावाच्या अग्नीसमोर अतिशय श्राव्य अशा संस्कृतच्या आधीच्या थोडय़ाशा आर्ष भाषेतल्या रचना म्हणण्याचा प्रघात पडला आणि या रचना सामूहिक रीतीने म्हटल्या गेल्या.
आपण सगळे काहीतरी एकत्र मिळून करू या (आणि अग्नीला देऊन झाले) की मग स्वत:सुद्धा काहीतरी खाऊ या ही प्रथा जगातल्या सर्व संस्कृतीत सापडते.
हे  एकत्रीकरण म्हणजे सातवळेकरांनी सांगितलेले संगती करणे. काय दिले काय मिळाले याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते