२६ जानेवारी २०१४ ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्य़ातील ‘मसूर’ला झाला. नंतर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीएस्सी करून मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीत बीई, एमई व पीएच.डी. झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच अध्यापनाचे काम सुरू केले.
 २००४ ते २००९ या काळात ते संस्थेचे संचालक होते. रसायन अभियांत्रिकी या शास्त्रातील गेल्या ३५ वर्षांतील त्यांच्या संशोधनातून त्यांनी नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली. उपलब्ध संयंत्रात सुधारणा केल्या, त्यातील वीज व इंधन बचत करून प्रक्रिया सोप्या आणि स्वस्त केल्या. उत्पादनास लागणाऱ्या निरनिराळ्या टप्प्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून उत्पादनास लागणारा वेळ व येणारा खर्च कमी करणे हा त्यांच्या संशोधनाचा मूळ उद्देश असतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याचे गणिती प्रारूप मांडावे लागते, ते काम डॉ. जोशी सातत्याने करीत असतात. यासाठी त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आहे.
डॉ. जोशी ज्या ज्या गोष्टींचे गणिती प्रारूप मांडतात, त्या गोष्टी ते प्रायोगिक पद्धतीने सिद्ध करून दाखवतात. द्रव, घन आणि वायू या तिन्ही रूपांतील रसायनांवरील प्रक्रियेत घडून येणाऱ्या प्रवाहितेबद्दल संशोधन करून त्यात येणाऱ्या अडचणींवर त्यांनी उपाय शोधून काढले आहेत. यासाठी ते गणिताबरोबर संगणकाचाही उपयोग करतात.
दोन रसायनांच्या मिसळण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी लागणाऱ्या संयंत्रांच्या अनेक रचना त्यांनी शोधून काढल्या. प्रक्रियेतील रसायने मिसळण्याचा वेग मोजण्यासाठी त्यांनी लेझर प्रणाली वापरली. रासायनिक प्रक्रियांचा वेग, तापमान व दाब मोजण्याचे अचूक तंत्र त्यांनी शोधून काढले. ऊर्जानिर्मिती व ऊर्जाबचत यात त्यांना विशेष रस आहे. सुधारित चुली, उष्णतेची बचत, सौरऊर्जेवर चालणारे शीतीकरण, पवनशक्तीचा वापर यावर त्यांचे संशोधन चालू आहे.
त्यांच्या हाताखाली ५७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली व ५६ विद्यार्थ्यांनी एमएस्सी केले. आजवर ४००० पेक्षा जास्त अभ्यासकांनी, डॉ. जोशींनी लिहिलेले निबंध वापरले आहेत.

मनमोराचा पिसारा: उडी मारून निष्कर्ष
‘‘मानसी, तुला एक सांगायचंय. बऱ्याच दिवसांपासून विचार करतोय. म्हटलं आता सांगायलाच हवं!’’ मानस म्हणाला, ‘‘हं, माहित्येय मला काय सांगणारेस ते! तू ना आळशीपणा सोडलास तरी चेंगटपणा अजून तसाच आहे! प्रत्येक गोष्टीला विलंब करतोस. मी झटपट निर्णय घेते. हे बरोबर नाही. असंच सांगायचंय ना?’’ मानसी ठसक्यात म्हणाली.  मानस दीर्घ नि:श्वास टाकून म्हणाला, ‘‘मानसी, अगदी हीच गोष्ट मला सांगायची होती. माझ्यावरील टीकाटिप्पणी स्वीकारून असं म्हणतोय की, मला काय म्हणायचंय, हे मी न सांगताच तू ताडलंस आणि न विचार करता बोलूनही टाकलंस. अगदी याच विषयावर मला काही सांगायचंय. तुला हरवून विजय मिळवण्याकरिता सांगायचं नाही. बरं, मी आता दीर्घसूत्रीपणा न करता सांगतो. मानसी, तू ठाम निर्णय घेतेस ते उत्तम आहे, पण तू पुरेशी माहिती गोळा करण्यापूर्वीच तुझं मत बनवतेस आणि मत बनलं की, त्या मताला पुष्टी देणारी माहिती निवडतेस आणि तेवढीच माहिती पुरेशी आहे, अशी ठाम समजूत करून घेतेस. तुझे ठाम निर्णय या कारणास्तव पूर्वग्रहदूषित असतात, हे तुझ्या लक्षात येत नाही. मताचं झापड लावून तू जगाकडे पाहातेस. सोप्या मराठीत सांगायचं तर,‘मानसी, यू जम्प टु कनक्लूजन.’’
यावर मानसी काही बोलण्यापूर्वी मानसनं तिला खुणेनं गप्प केलं. ‘‘पुन्हा त्याच ट्रॅपमध्ये अडकते आहेस. जरा थांबून विचार कर. तू झटपट निष्कर्षांप्रत येतेस. त्यामुळे साहजिकच तू निष्कारण आग्रही होतेस. राजकीय वातावरणात ज्याप्रमाणे तुम्ही डाव्या असता नाही तर उजव्या विचारसरणीचे! कामगार शब्द उच्चारलात तर डावी विचारसरणी आणि इन्व्हेस्टमेंट म्हटलं की उजव्या वळणाचे! असे झटपट अनुमान काढून लोक मोकळे होतात. असं न करता, बऱ्याच गोष्टींचा आधार घेऊन निष्कर्ष काढता येतो. हे समाजजीवनाकरिता जसं खरंय तसं व्यक्तिगत आयुष्याविषयी! ’’ मानसी विचारात पडली. ‘‘गुड! मानसी, तू यावर मनातल्या मनात खल करते आहेस. माझं म्हणणं तुला पूर्ण पटलेलं नाही म्हणून त्यावर सरसकट काट मारून अनुमान काढत नाहीयेस.’’
‘‘मानस, तुझे विचार हळूहळू जिरत आहेत. मला अशी ही सवय आहे, हे नाकारून चालणार नाही. मी त्याचा स्वीकार करत्येय, पण मला सांग, अनुमान काढण्याची घाई किंवा उडी मारून कनक्लूजनवर येण्याची सवय येते कुठून? ’’ मानसीनं शांतपणे विचारलं. ‘‘आपल्याला म्हणजे आपल्या मनाला कोणत्याही संदिग्धता, गोंधळ, अनिश्चितता, अनसर्टन्टी सहन करायची इच्छा नसते. मनाला कन्फ्यूजन कसं हाताळावं हे कळत नाही. त्यामुळे आपण पटकन अनुमान काढतो आणि संदिग्धता संपवून टाकतो..’’ मानस म्हणाला.
‘‘हाय फंडा आहे.’’ मानसी म्हणाली. ‘‘पचवावा लागेल. यावर आणखी काही सांगशील?’’
‘‘मी खूप वर्षांच्या अनुभवावरून सांगतेय, तुझं मनोविश्लेषण अचूक असतं. थँक्यू फॉर बीइंग माय फ्रेंड.’’ मानसशी हस्तांदोलन करीत मानसी म्हणाली आणि विचार करू लागली.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: स्त्री-प्रश्नांचा पहिला उद्गार – ताराबाई शिंदे
१९व्या शतकात आपल्या क्रांतिकारी विचारांनी ताराबाई शिंदे यांनी मराठी गद्यात स्त्री-प्रश्नांची स्वतंत्र चर्चा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहून केली. त्याआधी फुले, लोकहितवादी, आगरकर यांनी स्त्री-प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न केला होता, पण ताराबाई यांनी स्वानुभवाच्या आधारे मांडलेले विचार हा महाराष्ट्रीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच म्हणायला हवा. ‘‘ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेच स्त्री-पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहस दुर्गुण स्त्रियांच्याच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांच्या अंगी आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे,’’ अशी ताराबाईंनी या पुस्तकामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ताराबाईंचे हे पुस्तक १८८२ साली प्रकाशित झाले तेव्हा त्याविषयी बरीच चर्चाही झाली. या पुस्तकाने महाराष्ट्रातील स्त्री-प्रश्नाची परखड चिकित्सा करण्याचा पहिला मान ताराबाईंकडे जातो. स्त्रीने उंबऱ्यात-चारचौघांसमोर येणे, बोलणे, वावरणे निषिद्ध मानला जाण्याचा तो काळ होता. त्या पाश्र्वभूमीवर ताराबाईंचे हे अतिशय तर्कशुद्ध, युक्तिवादपूर्ण, समतेवर आधारित परखड लेखन ही खूपच धाडसाची गोष्ट होती.  भा. ल. भोळे ताराबाईंच्या लिखाणाबद्दल म्हणतात, ‘‘सतत विस्तारत जाणारी अर्थवलये घेऊन कागदावर उतरलेली ताराबाईंची शब्दकळा, पुरुषसत्तेचे दाहक अनुभवविश्व, उपहासगर्भ व आघातशील लेखनशैली, पुरुषांचा केलेला परखड पाणउतारा, आवेशपूर्ण असूनही तर्कसंगतता न सोडणारे प्रक्षोभक प्रतिपादन, ही सारी ताराबाईंच्या लेखनाची ठळक वैशिष्टय़े सांगता येतील.’’ ताराबाईंनी स्त्री-प्रश्नाकडे ज्या पद्धतीने पाहिले आहे, तसे मराठीमध्ये त्यांच्या आधी आणि नंतरही कुणाला पाहता आलेले नाही. त्यामुळे २१व्या शतकातही ताराबाईंनी केलेली स्त्री-प्रश्नांची चर्चा प्रस्तुत ठरते.