प्रा. हरी जीवन अर्णीकर
प्रा. हरी जीवन अर्णीकर (१९१२-२०००) यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. बनारस िहदू विद्यापीठातून एम.एस्सी. करून त्यांनी तेथेच ‘कोरोना इफेक्ट अ‍ॅन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या विषयावर पीएच.डी. केली. १९५५ मध्ये पॅरिस येथील प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्टस’ हा प्रबंध लिहिला. त्यासाठी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली.
१९५८ ते १९६२ या काळात ते बनारस िहदू विद्यापीठात अध्यापन करीत होते. या काळात त्यांनी तेथे अणुरसायनशास्त्र विभागाची उभारणी केली आणि वैद्यकशास्त्रात किरणोत्सर्गी समस्थानिकांचा यशस्वीपणे उपयोग करून दाखवला. १९६२ पासून पुढची १५ वष्रे ते पुणे विद्यापीठात रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते.  येथेही त्यांनी मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या साहाय्याने अणुरसायनशास्त्राची प्रयोगशाळा, संशोधन केंद्र व अध्यापन सुरू केले. निवृत्तीनंतरही ते विद्यापीठात संशोधन करीत असत.
त्यांनी हॉट अ‍ॅटम केमिस्ट्री, अ‍ॅक्वाल्युमिनेसंस, फ्युज्ड इलेक्ट्रोड्स, जोशी इफेक्ट या विषयांमध्ये संशोधन केले. युनिव्हर्सटिी केमिकल सोसायटीच्या वतीने त्यांनी काही उपक्रम राबवून विज्ञान प्रसारासाठी फिरत्या प्रयोगशाळेचाही उपयोग केला.
१९६२ साली फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी विस्कॉन्सिन मेडिसिन विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पातील शास्त्रज्ञ प्रा. जॉन विलार्ड यांच्या प्रयोगशाळेत संशोधन केले. रसायनशास्त्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी युनेस्कोच्या त्यांनी पायलट प्रॉजेक्ट ऑन टिचिंग केमिस्ट्री या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून काम केले. हा प्रकल्प आशियातील संस्थांसाठी होता. भारतातील विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अनेक प्रकल्पात आणि उपक्रमात त्यांनी सातत्याने भाग घेतला.
लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने त्यांना फेलोशिप दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली. ‘इसेन्शियल ऑफ न्यूक्लियर केमिस्ट्री अ‍ॅण्ड आयसोटोप्स अ‍ॅन द अ‍ॅटॉमिक एज’ या त्यांच्या पुस्तकाचे युरोपातील सहा भाषांत भाषांतर झाले.

प्रबोधन पर्व: मतभेद आणि मतप्रतिपादन करताना तारतम्य राखावे
‘‘आपल्यात हल्ली मतभेद पुष्कळ दिसतात. मतभेद असण्यात दोष काही नाही. पण असणारा मतभेद आणि दिसणारा मतभेद ह्य़ात फरक केला पाहिजे. मत म्हणजे स्वतंत्र मनाचें म्हणणों. आपलें मन स्वतंत्रपणें जें सांगेल तें आपलें मत.. मतप्रतिपादनात आपलें मत मांडणें आणि दुसऱ्याचें खोडणें असे दोन भाग कल्पिले जातात. पण ते कल्पनेचे आहेत, खरे नाहीत. दिवा लावणें व अंधार झाडून टाकणें हीं जशीं दोन कामें, तसलेच हे दोन भाग. आधी दोन भागच खोटे. त्यातही पुन्हा आपला भर बहुतेक दुसऱ्याचें मत खोडण्यावरच जास्त असतो. दुसऱ्याचें मत खोडलें की तेवढय़ाने आपलें मत सिद्ध झालेंच असें होत नाही. आणि आपलें मत सरळ मांडले म्हणजे दुसऱ्याचें मत खोडण्याची जरूर राहत नाही. भूमितीमध्ये युक्लिडने कोठेच खाडाखोड न करता थोडक्यात सरळ सिद्धान्त मांडले आहेत. त्या सिद्धान्तांची सत्ता दुनियेवर चालते.’’
मतभेद आणि मतप्रतिपादन करताना कोणते तारतम्य राखावे याविषयी आचार्य विनोबा भावे  लिहितात-  
‘‘ज्याप्रमाणे प्रसंगीं मतप्रतिपादनाची जरुरी कल्पून घेतली, त्याप्रमाणे मतप्रतिपादनातूनहि क्वचित् दुसऱ्याच्या मतातील चूक दाखविण्याचा प्रसंग कल्पिता येईल. पण दुसऱ्याचें मत खोडून काढणें निराळें आणि दुसऱ्यालाच खोडून काढणें निराळें. एखाद्या मतातील असारता दाखवितांना त्या मनुष्यालाही मध्येच गुंतवून टीका करणें गैर आहे.. मनुष्याचें मत जरी कदाचित् दूषित असलें तरी आंतला माणूस दूषित नसतो.. म्हणूनच मताचा विचार करतांना माणूस बाजूलाच राखला पाहिजे. पुष्कळ वेळा आपण असें पाहतो की जें मत आपल्याला एके काळीं खरें वाटत होतें, तेंच आज खोटें वाटतें.. आपलेंच जुनें मत, पण आज जर आपल्याला तें पसंत नाही तर तें आपण सोडून देऊ, प्रसंगीं खोडूनहि काढू. पण कशा रीतीने आणि कोणत्या भावनेने? दुसऱ्याचें मतहि खोडण्याचा प्रसंग असल्यास जणू आपलेंच जुनें मत आहे असें समजून तें खोडलें जावें.’’

मनमोराचा पिसारा: तू गाये जा
कृष्णधवल स्क्रीनवरील अशोककुमारची बोटं पियानोवर काही क्षण थबकतात आणि मग सुरांच्या लहरी उमटतात. आत्ममग्न चेहऱ्यानं नायक गाऊ लागतो किशोरकुमारच्या आवाजात-  बेकरार दिल तू गाये जा.. खुशीयोंसे भरे वो तराने.. ते सूर ऐकून अन्यत्र बसलेली नायिका अंमळ थांबते आणि झपाटय़ानं तिथे जाऊन सुलक्षणा पंडितच्या आवाजात किशोरकुमारला साथ करते. तीन-साडेतीन मिनिटात ते सूर प्रेक्षकाला एका आगळ्या दुनियेत घेऊन जातात.
‘दूर का राही’ या किशोरकुमार निर्मित, दिग्दर्शित, संगीत दिग्दर्शित चित्रपटातलं हे गाणं असल्यानं संपूर्ण चित्रपट पाहिलेला नाही. प्रशांत नामक एका गायक, भटक्या माणसाला आलेल्या अनुभवांची या सिनेमात मांडणी आहे. सिनेमापेक्षा या गाण्यातल्या किशोरकुमारच्या आवाजाविषयी अधिक काही म्हणावंसं वाटतं.
मुळात किशोरकुमार हा विस्मयकारक गायक होता. त्याच्या गाण्यातली आणि गायकीतील विविधता आणि सुरांवरची पकड अचंबित करते. गंमत म्हणजे किशोरकुमार फक्त निरनिराळ्या प्रकारची गाणी गात नव्हता तर आवाजाच्या किमयेनं गाणं, शब्द ,अगदी सुरांपलीकडे जाऊन रसनिष्पत्ती करीत असे. गाण्यातला मूडच नव्हे तर गाण्यांचा अवकाश निर्माण करीत असे. गाणं मोकळ्या जागी आहे की बंद खोलीत, याचा आभास निर्माण करीत असे.
ज्या अभिनेत्याकरता तो गाणं म्हणतोय याचंही भान आपल्याला नकळत येत असे. ‘ये दिल न होता बेचारा’ देवानंद (ज्युवेल थीफ) म्हणतोय हे कळतं, तर ‘खई के पान बनारसवाला’ हे गाणं अमिताभ बच्चन गातोय असं वाटतं. अर्थात, ही जादुगिरी संगीतकाराच्या सहाय्यानं घडत असे, पण ती गाणाऱ्याला, ऐकणाऱ्याच्या पूर्वग्रहांबद्दल- श्रोत्याला काय वाटेल याची पुरेपूर कल्पना असल्याखेरीज घडूच शकत नाही. किशोरकुमारच्या आवाजामध्ये अशा क्ऌप्त्या होत्या. सुदैवानं त्या त्याच्या मर्यादा झाल्या नाहीत.
किशोरकुमारच्या आवाजातली आणखी गंमत म्हणजे सुरांचा बदलणारा पोत. वेगवेगळ्या गाण्यात नाही तर एकाच गाण्यात! म्हणजे एक चतुर नारमधली विविधता ऐका. तो पोत कधी किंचित जाडाभरडा (सीएटी कॅट.. न्यू दिल्ली) होतो, कधी मुलायम विरविरणारा (वो शाम कुछ अजीब.. खोमोशी) तर कधी रेशमी शालीसारखा (आ, चल के तुझे..) होत असे. सुरामधला पिच बदलून तो पुरुषाखेरीज स्त्रीच्याही नाटकी आवाजामधलं (ओ गुजरिया.. हाफ टिकट) गाणं गात असे. तो केवळ विनोदी प्रयोग नव्हता तर ते आव्हान होतं. (मल्टी ट्रॅक डिजिटल रेकॉर्डिग नव्हतं!)
तो कधी खेळकर नि उच्छृंखल मूडमध्ये गात असे तर कधी उदास मूडमध्ये. हे तर उघडच आहे. पण सफरमधल्या ‘जीवनसे भरी तेरी आँखे’ म्हणताना त्या आवाजातल्या ‘मजबुरी’चा एहसास होतो.
किशोरकुमारच्या आवाजातली आणखी एक आयाम म्हणजे तो कधी संपूर्ण बहिर्मुख (देखाना हायरे सोचा ना. बॉम्बे टु गोवा) होतो, तर कधी अंतर्मुख होतो. (ये जीवन है इस. पिया का घर) परंतु, किशोरकुमार भावतो, मीठी छुरी होतो जेव्हा त्याच्या आवाजातली ‘स्वीट मेलँकली’ (मधुर विषण्णता) प्रतीत होते.
बेकरार दिलमध्ये जीवनाभिमुख होऊन आनंदानं गाणी म्हणा, प्रेमानं गा असा संदेश आहे. परंतु, त्या सुरांनी युगायुगांचा विशाद पचवल्याचं जाणवतं. आपल्यावर ओढवलेल्या दु:खद घटनांनी आलेलं नैराश्य मनात जिरवलंय. त्या दु:खातून उमटलेला हा सूर आहे. या सुरानं खूप सोसलंय, खूप भोगवटा सहन केलाय असं जाणवतं. त्यामुळे गाणं मनात कधी भिनून जातं कळत नाही.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com