03 August 2020

News Flash

कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले.

| April 12, 2014 01:01 am

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही केली. त्यानंतर ते इंग्लंडच्या सालफोर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी पॉलिमर इंजिनिअिरगमध्ये संशोधन केले. तेथून परत आल्यावर ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. सहा वष्रे ते या लॅबोरेटरीचे संचालक होते. नंतर ते काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (उरकफ) या संस्थेचे महासंचालक झाले .
डॉ. माशेलकरांनी, ‘द्रवांवर दाब दिला असता त्यांच्या प्रवाहीपणात होणारे बदल’ याविषयी संशोधन केले. हे फुगणाऱ्या आणि आक्रसणाऱ्या बहुवारीकांच्या (पॉलिमर्स) उष्मागतिकी आणि वहन पद्धतीबद्दलचे संशोधन आहे. जेव्हा एखादा पदार्थ विद्रावकात विरघळतो तेव्हा त्या द्रावणाचे तापमान, दाब, त्यातील क्षारांचे प्रमाण वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतात. काही विशिष्ट पदार्थाचे  प्रवाहितेच्या संबंधीचे काही आगळेवेगळे गुणधर्म असतात, जे औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे ठरतात. काही द्रावणावरील दाब जसा वाढतो तसतशी त्याची वाहकता किंवा प्रवाहीपणा वाढत जातो. रंगारी जेव्हा रंगामध्ये ब्रश बुडवतो तेव्हा डब्यातील रंग घट्ट असतो. पण जेव्हा रंगारी िभतीवर ब्रश दाबून रंग देतो तेव्हा तो रंग तेवढय़ा क्षणी काहीसा पातळ होतो. येथे ब्रशने दाब दिल्यावर दाब असेपर्यंत रंगाचा प्रवाहीपणा वाढतो. चॉकलेट तोंडात टाकल्यावर आपण ते जिभेने टाळूवर दाबतो तेव्हा ते काहीसे विरघळते. पण, जिभेवर नुसते चॉकलेट ठेवले तर ते हळूहळू विरघळते. नेहमीचे पाणी असे गुणधर्म दाखवीत नाही. काही बहुवारीक रसायने पाणी शोषून घेतात व ती फुगतात तर काही आक्रसतात. हे गुणधर्म रसायनांच्या आण्विक किंवा रेणवीय पातळीवरील संरचनेशी संबंधित असतात. माशेलकरांनी ही संरचना समजून घेऊन, इतर विविध रसायने तयार केली.
डॉ. माशेलकरांनी अमेरिकेच्या ताब्यात गेलेली हळद, कडुिलब व बासमती तांदळाची पेटंट्स परत मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतात फार मोठय़ा प्रमाणावर पेटंट शिक्षणाचा प्रचार केला.

प्रबोधन पर्व: आधी राजकीय नाही, आधी सामाजिक सुधारणाच
‘‘राजकीय आणि सामाजिक सुधारणा बरोबरच झाल्या पाहिजेत. या सुधारणा स्वतंत्र नाहीत. या दोन सुधारणा राष्ट्रोन्नतीच्या गाडय़ाची दोन चाकेच आहेत. पण त्यातही आधी-मग पाहावयाचे झाल्यास आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत.. समाजसुधारणारूपी सायकलचे मागील चाक राजकीय व पुढील चाक सामाजिक सुधारणा आहे, यात शंका नाही.. कोणत्याही देशाची राजकीय भवितव्यता त्यातील लोकांच्या सुचारित्र्यावर अवलंबून असते. म्हणून आपण सर्वानी शील सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. आजवरचा अनुभव मला असे सांगतो की, माणसाजवळ मिळते घेण्याचा समंजसपणा असल्याखेरीज त्याला यश आणि सुख मिळणे दुरापास्त आहे.’’
टिळक-आगरकर यांच्या ‘आधी राजकीय की आधी सामाजिक सुधारणा?’ या जाहीर वादासंदर्भात शाहू महाराजांनी आगरकरांच्या बाजूने आपले मत दिले होते. या सुधारणांना चालना आणि गती मिळण्यासाठी काय करायला हवे याविषयी दिग्दर्शन करताना शाहू महाराज म्हणतात –
‘‘तोंडाने केवळ बडबडणारे पुढारी आम्हाला नको आहेत. कृतीने जातिभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील असे पुढारी पाहिजेत.. शीलवान नागरिकांशिवाय राष्ट्र बनणे अगर उदयाला येणे या गोष्टी शक्यच नाहीत.. ज्या समाजात आपण वाढलो, त्या समाजाची उन्नती करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे; याची विस्मृती होऊ देऊ नका.. सामाजिक समता व संघटना यासाठी ऐक्य, विश्वास, परस्पर प्रेम आणि चिकाटीने केलेले दीर्घ प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत.. आपण आपल्या निसर्गदत्त मानवी हक्कांना जपले पाहिजे. आपली प्रगती साधण्याचा विसाव्या शतकातील मार्ग दंगेधोपे व बंडाळी हा नाही. शांततेने व व्यवस्थितपणे आपण आपला विकास करून घेणे हा मार्ग आहे.. विसाव्या शतकात राष्ट्राची उन्नती व्यापार आणि तत्संबंधीची चळवळ यावर अवलंबून आहे.. व्यापार करण्याचे साहस आम्ही केले नाही तर आमच्या सर्व चळवळी निस्तेज व निर्थक होतील.’’

मनमोराचा पिसारा: झेन – इथे आणि आत्ता
‘झेन’ हा शब्द आपल्याकडे जपानी सुझुकी गाडीत बसून अडीच-तीन दशकांपूर्वी आला. मात्र, मुळात आपण म्हणजे भारतीय बुद्धिझम (बुद्धविचार)ने ही संकल्पना चीनमार्गे जपानमध्ये पोहोचवली. त्या वेळी अर्थातच गाडीघोडय़ातून नव्हे, तर ‘बोधीधर्म’ नावाच्या बुद्धभिक्षूने आपल्याबरोबर ती संकल्पना आणि प्रक्रिया (बहुतेक दक्षिण भारतातून) चीनमध्ये नेली. उत्तर भारतातून सिल्क रूटमार्गे बुद्धविचार तिथे पोहोचले होतेच. इथे ‘बुद्धविचार’ हा शब्द वापरत आहे कारण आधुनिक काळी ‘इझम’ या प्रत्ययाला राजकीय अर्थ चिकटलेला आहे. तशा प्रकारचे ‘प्रसारवादी’ निरूपण होऊ नये म्हणून ‘बुद्धविचार’ या शब्दाचे विशेष प्रयोजन आहे. चीनमधले बुद्धविचार अर्थातच तत्कालीन भाषेत त्यापूर्वी भाषांतरित झाले. आणि त्यांच्या अर्थनिरूपणाद्वारे बुद्धविचारांच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. शब्दांचा अचूक अर्थ, समकालीन धार्मिक (ताओ, कन्फ्यूशस) विचारव्यूह, सामाजिक चालीरीती यांचा त्या निरूपणावर परिणाम झाला.
बुद्धविचारांचा नेमका अर्थ काय? त्यातून कोणते तत्त्वज्ञान मांडलेले आहे यावर आधी बौद्धिक चर्चा, काथ्याकूट आणि चर्वितचर्वणे होऊ  लागली. याच काळात वंदनीय बोधीधर्माचे आगमन तिथे झाले आणि त्यांनी विचारांना वेगळी दिशा दिली. बुद्धविचाराचे अंतिम सार आणि ध्येय अशा तात्त्विक, मौखिक पीठाधिष्ठित चर्चेत नसून त्याचा प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात अवलंब व्हायला हवा असा आग्रह केला. बुद्धविचार हे केवळ तत्त्वज्ञान नसून बुद्धआचार आहेत आणि त्याचा प्रत्यय गुहेमध्ये बसून, समाजविन्मुख होऊन अथवा सुत्तपठ्ठन करूनच येतो असे नव्हे. आपल्या रोजच्या व्यवहारातून, वावरण्यातून त्याची स्वप्रचीती येते. अशा रीतीने आपण बुद्धविचारानुसार आचरण आणि विहार करतो आहोत याची कदाचित व्यक्तिगत पातळीवर जाणीवही होणार नाही. अंतर्मनातून मात्र प्रत्येक क्षणी आपल्या मनात बुद्धाने सांगितलेली प्रणाली जागृत असेल. प्रज्ञेचा अनुभव क्षणोक्षणी होत असेल. प्रत्येक श्वासाचा क्षण एवढाच केवळ अनुभव असतो, बाकी सारे विचार आणि तृष्णा अनित्य आहेत, टिकणाऱ्या नव्हेत याचे भान असेल. विचार आणि आचारांमधली ही एकरूपता, अतूटपणा, अखंडता क्षणोक्षणी अनुभवत येणे हा मूळ बुद्घविचार आहे अशी विचारप्रणाली चीनमध्ये प्रस्थापित झाली.
वादविवाद, बौद्धिक चर्चा यापासून मुक्त होऊन भिक्खूंनी, आचार्यानी (पॅट्रिआर्क-मठातील मुख्य आचार्य) सगळे लक्ष ‘ध्यान’ या शब्दांवर केंद्रित केले.
चिनी मंडळींनी ‘ध्यान’चा उच्चार च्यान-चान असा केला. हा चिनी शब्द जपानमध्ये पोहोचला तेव्हा त्याचा ‘झेन’ असा उच्चार होऊ लागला. गेली आठ-नऊशे शतके ‘झेन’ विचार जपानात विस्तारले. त्यांनी आपल्या मूळ ‘शिंतो’ या प्रतीकाधारित धर्माबरोबर त्याचा स्वीकार केला. पुढे जपानमध्ये अनेक सामाजिक-राजकीय नि आर्थिक बदल होत गेले. ‘झेन’ आचार अथवा झेन समाधीमार्ग जनमानसातून विरू लागला. गेल्या शतकात सुझुकी (मारुतीवाले नव्हे) या तत्त्वलेखकानी ‘झेन’ पद्धतीवर ग्रंथ लिहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर बिथरलेल्या पश्चिमदेशांनी (मुख्यत: पश्चिम अमेरिका) ‘झेन’चा मुक्तमनाने अंगीकार केला. ‘झेन’ गुरू, भिक्खू देशोदेशी प्रवचन करीत प्रवास करू लागले.
आज झेन विचारांना पुन्हा उजाळा मिळालाय आणि झेन समाधी मार्ग शिकवणारी ‘झाझेन’ मंदिरे टोक्योमध्ये दिमाखाने उभी आहेत. स्वानुभवावरून हे जाणवते की अतिशय सुभग आणि सहजसाध्य वाटणारा ‘झाझेन’ मार्ग खडतर आहे. त्याविषयी या कट्टय़ावर पुन्हा गजाली करू.
झेन विचारांची मांडणी ग्रांथिक नाही. त्यावर अधिकृत पोथीस्वरूप पौरुषेय वाङ्मय वा साहित्य उपलब्ध नाही. झेन मार्ग शिकवण्याकरता विविध उपकरणे (टूल्स) आहेत. हे मार्ग रोजच्या जीवनाशी इतके भिडलेले आहेत की ते मूळ झेनमार्ग आहेत याचा पाहणाऱ्याला विसर पडतो अथवा ते माहितीही नसते. झेन म्हणजे काय? ‘दो’ (प्रत्यय-मार्ग) लावून तयार झालेल्या या शिक्षण पद्धती पाहा. चादो-चहा ‘टी’ सेरिमनी (चहा पिण्याची पद्धत) कादो- झेन पुष्प मार्ग, केंदो- झेन तलवार मार्ग, क्युदो- झेन धनुíवद्या, जुदो- झेन स्वसंरक्षण मार्ग, शोदो झेन अक्षरलेखन.
जगण्याच्या प्रत्येक आयामाला झेन मार्ग वळण लावतो. त्याचा अनुभव ‘तिथे आणि तेव्हा’ येत नाही ‘इथे आणि आत्ता’ येतो!
drrajendrabarve@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 1:01 am

Web Title: curiosity indian chemists 2
टॅग Curiosity
Next Stories
1 कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ
2 प्रबोधन पर्व: उपकार, औदार्य आणि त्याग
3 कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ रमेश गणेश देशपांडे
Just Now!
X